
मनापासून – १ – मानसोपचाराचा मागोवा
मानसशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून मानसोपचारांबद्दल कुतुहल होतंच. पुढे व्यसनमुक्तीक्षेत्रात काम करु लागल्यावर आणि मानसशास्त्रात शिक्षण झाल्यावर हे कुतुहल आणखी वाढीला लागलं. यशावकाश सीबीटी म्हणजे Cognitive behavioural Therapy चे शिक्षण घेतले. आणि मानसोपचारांचे दार किलकिले झाले. मानवी स्वभावाचा चिवटपणा आणि तो बदलणे किती कठीण आहे याचा अंदाज व्यसनमुक्तीक्षेत्रात काम करताना आलाच होता. मात्र त्या दुर्घट स्वभावावर मात करुन मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक मनोविकाराला आळा घातलात हे पाहिले आणि या एकंदर उपचारांचे महत्व लक्षात आले. “मनापासून” या लेखमालेत मानसोपचारांची माहिती देण्याचा मानस आहे. आपल्याकडे मनाच्या आजारांवर इलाज करताना प्रामुख्याने औषधे आणि समुपदेशन अशा दोन उपाययोजना केल्या जातात. त्यापैकी औषधे हे मानसोपचारतज्ञ (सायकियाट्रीस्ट) देतात. जो मी नाही. समुपदेशन हे सायकॉलॉजीस्ट करतात जो मी आहे. त्यामुळे या लेखमालेत औषधांबद्दल चर्चा नसेल. हे आधीच सांगण्याचे कारण बहुसंख्य लोकांना कोणत्या आजारावर औषधं कोणती आहेत हे जाणून घेण्यामध्येच रस असतो. कारण समुपदेशन हा दीर्घकाळ चालणारा, धीर आणि चिकाटी यांची मागणी करणारा उपाय आहे. इतका धीर सर्वजण दाखवू शकत नाहीत. मानसोपचार घ्यायचे म्हणजे आपण वेडे आहोत का असा गैरसमज असण्याचे दिवस मागे पडले असले तरी या क्षेत्राबद्दल अजूनही अनेक समजूती अशा आहेत ज्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येतात आणि माणसे दुःख सहन करत राहतात. अनेकांना मनोविकार म्हणजे सर्दी तापासारखाच आजार वाटतो. गोळ्या घेतल्या की काम झालं. औषधे ही तुम्हाला भानावर