You are here:
अशोकराव

आपल्या माणसाबद्दल लिहायला कुठल्या निमित्ताची गरज कशाला हवी? ज्या माणसाबद्दल मनात तुडूंब प्रेम आहे त्याच्याबद्दल लिहावं असं वाटलं आणि हा लेख लिहायला घेतला. अशोकरावांची माझी ओळख एका साईटच्या निमित्ताने झाली. प्रत्यक्ष भेट फार नंतर झाली. पण आम्ही अनेक वर्षे एकमेकांना ओळखत असल्याप्रमाणे काही दिवसांतच आमच्यात स्नेह निर्माण झाला आणि तो दिवसेंदिवस वाढतच गेला. आजतर अशोकरावांच्या स्नेहाचं ऋण डोक्यावर बाळगून फिरण्यात धन्यता मानावी अशी माझी परिस्थिती आहे. कसलिही ओळखदेख नसताना या माणसाने माझ्यावर नुसतं भरभरून प्रेमच केलं नाही तर भरभरून दिलंही. मी अनेक ठिकाणी लिहित असतो. अनेकांना ते आवडतं. मला लिहितं करण्याचं सारं श्रेय अशोकरावांना आहे.

अशोकरावांची आणि माझी ओळख झाली आणि आमची मैत्री झाली याचे एक अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे आम्हा दोघांना असलेले जीएंबद्दलचे प्रेम. जीए हा आमच्यातील समान दुवा. मी जीएंवर लिहू लागलो. अशोकरावाचे कौतूकपर अभिप्राय त्यावर येऊ लागले आणि मला लेखन करण्यात उत्साह वाटू लागला. पुढे पुढे तर अशोकरावांचा अभिप्राय नसेल तर चुकल्यासारखे वाटू लागले. बाकी अशोकरावांच्या पोटात अपार माया आहे. माझे सर्वच लेखन त्यांना आवडले असेल असे नाही पण त्यांनी नेहेमीच माझे भरभरून कौतूक केले. कालांतराने अशोकराव हे जीएंच्या बैठकीतले होते हे कळल्यावर तर अशोकरावांना नेहेमीच एक जास्तीचा दंडवत माझ्याकडून घातला गेला. अशोकराव आणि माझ्यातील आणखी एक समान दुवा म्हणजे चित्रपट प्रेम.

चित्रपटातील गाण्यांवर मी जेव्हा केव्हा लिहिले अशोकरावांनी त्यावर भरभरून प्रतिसाद दिला. अशोकरावांचे प्रतिसाद म्हणजे पशापशांनी ओटी भरावी आणि ती तुडुंब भरून वाहावी असे असतात. काहीवेळा तुमच्या लेखापेक्षा त्यांचा कौतुकाचा प्रतिसादच मोठा असतो हे त्यांचे चाहते नक्की मान्य करतील. बाकी अशोकरावांचा प्रतिसाद मूळ लेखनाला श्रीमंत करणारा असतो हे नक्की. ज्याला चार चांद लावणे म्हणतात तसे त्यांचे प्रतिसाद असतात. भरपुर माहितीने भरलेले आणि अभ्यासपूर्ण असे त्यांचे प्रतिसाद आले की आपल्या लेखनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

मूळात अशोकरावांमध्ये एक संशोधक दडलेला आहे असं मला फार पूर्वीपासून वाटतं. जिज्ञासूंनी त्यासाठी त्यांचे लेख आणि प्रतिसाद खरोखरच काळजीपूर्वक वाचावेत. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासातील स्त्रियांवर फार पूर्वी एक लेखमाला केली होती. त्यावेळीच या माणसाशी कधीही बरोबरी करता येणार नाही. त्यांच्या छायेखाली राहण्यातच सुख आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. अशोकरावांचाअभ्यास विविध क्षेत्रातला आणि सखोल आहे. त्यांची लेखणीही या क्षेत्रांमध्ये आनंदाने विहार करीत असते. त्या विषयांमध्ये काय नाही हाच प्रश्न आहे. जगातील सर्व भाषांमधील चित्रपट, संगीत, कलाकार, यावर ते लिहितात. इंग्रजी साहित्याचा त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान अशा कुठल्याही विषयावर ते बोलू लिहू शकतात. आधुनिक समस्यांबद्दल त्यांना ज्ञान आहे. अशोकरावांचे मूळ लेखन म्हणजे खोल खोल पाणी. जितके जास्त खोल जाऊ तितकी रत्नं हाताशी लागतात.

अशोकरावांचे चाहते, त्यांचे मानसपुत्र, मानसकन्या जगभर पसरलेल्या आहेत. त्यांच्याशी त्यांचा कायम संवाद सुरु असतो. अशोकरावांनी कौतूक केले म्हणजे आपल्या कामाचे सार्थक झाले अशीच त्यांची भावना असेल याबद्दल मला खात्री आहे. अशोकरावांचा एक महत्वाचा गुण म्हणजे आपल्याला आवडले त्याची दुसऱ्याजवळ शिफारस करणे. त्यात माणसांचाही समावेश होतो. पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या डॉ.शोभनाताई तीर्थळी यांच्याशी माझी ओळख त्यांच्यामुळेच झाली आणि मला एक नवा परिवार मिळाला. अशोकरावांशी प्रत्यक्ष बोलणे म्हणजे आपले शिक्षण असते. पण त्यात उपदेश कधीही नसतो. अतिशय रंजकपणे, मित्राशी बोलावे असे ते बोलतात. पण त्यांचे ज्ञानच इतके आहे की त्या साध्या बोलण्यातूनही खूप काही पदरात पडते. त्यांच्याशी वॉटसॅपवर माझा सातत्याने संपर्क असतो. माझ्या दोनचार वाक्यांवर त्यांचा दीर्घ प्रतिसाद येतो आणि मलाच खजील झाल्यासारखे वाटते. अशोकराव काय, शोभनाताई काय फार मोठी माणसे. सारे काही भरभरून माझ्या झोळीत घालतात. आपलीच झोळी तोकडी पडते याची मला जाणीव आहे.

अशोकरावांकडून एक अतिशय महत्वाची गोष्ट मी शिकलो. ती म्हणजे प्रतिसादाची सभ्य भाषा आणि संयतपणा. त्यांच्या भाषेकडे पाहून कुणी वेडंवाकडं बोलणारच नाही. मला त्यांच्यासारखा संयम बाळगणं नेहेमीच जमतं असं नाही. पण माझा तो प्रयत्न मात्र असतो. अशोकरावांकडे मिळमिळीत अवघे टाकोन देण्याची सुंदर हातोटी आहे. आम्ही पातंजल योगसूत्र वाचणारे उपेक्षेबद्दल फक्त बोलतो. पण अशुभाची उपेक्षा करून पुढे कसे चालावे हे अशोकरावांनी असंख्यवेळा त्यांच्या लेखना, वर्तनातून दाखवून दिले आहे. त्यामुळे अशोकराव अजातशत्रू आहेत असे म्हटल्यास वावगे होऊ नये. मात्र असे असले तरी माझी त्यांच्याबद्दल काहीएक तक्रार देखील आहे.

एक अगदी जुनी तक्रार म्हणजे अशोकराव फार कमी लिहितात ही. त्यांचे बरेचसे लेखन हे इतरांच्या लेखनावर प्रतिसादाच्या स्वरुपाचे असते. त्यांचे स्वतःचे असे लेख क्वचित येतात. त्यातून असंख्य शक्यता त्यांनी दाखवलेल्या असतात आणि त्यात विचारांना जबरदस्त चालना मिळावी असा आशय ठासून भरलेला असतो. त्यामुळे त्यांनी लिहिते व्हावे ही विनंती. दुसरी तक्रार म्हणजे अशोकराव तब्येतीची पुरेशी काळजी घेत नसावेत असे मला नेहेमी वाटते. आपल्या मानसपुत्र आणि कन्यांसाठी तरी त्यांनी आपल्या प्रकृतीला जपायला हवे असे मला त्यांना आवर्जून सांगावेसे वाटते. अशोकराव आमच्यासाठी एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे आहेत. कधीही त्या दाट सावलीत जाऊन विसावा घ्यावा आणि ताजेतवाने झाल्यावर पुढे चालू लागावे. हा वृक्ष नेहेमीच हिरवागार राहावा अशीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. त्यांचे जगभरचे चाहते माझ्या म्हणण्याला होकार देतील याची मला खात्री आहे.

अतुल ठाकुर

6 Comments

  1. Registration took less than two minutes and my welcome package landed in my account before I could blink. The game filters make it super easy to find what I want and the withdrawal limits actually match what working players need. Clean layout and zero drama on payouts. bdmcw777

  2. I am so glad I discovered phcc6ph9 because it takes the guesswork out of finding a reliable gambling hub. The customer team is always ready to help and the game library keeps getting better with regular updates. If you want a platform that puts player satisfaction first without any of the usual headaches, this one is a solid pick. phcc6ph9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment