तात्पुरती मलमपट्टी
व्यसनमुक्ती संदर्भात माणसे फोन करायला लागल्यापासून ठळकपणे जाणवला तो लोकांचा उपचारांच्या संदर्भातला अक्षम्य ढिलेपणा. कुठल्यातरी गुढ मार्गाने व्यसन बंद होईल या आशेने माणसं वैज्ञानिक उपचार सोडून बाकी सारे काही करून पाहतात. एकाने मला तीर्थक्षेत्री गेल्याने व्यसन सुटते असं म्हणतात मग मी करून पाहू का? मी म्हटले पहा करुन. यावर आणखी काय उत्तर देणार? माळ घालत्यावर अनेकजण व्यसन सोडतात असे ऐकले आहे. ज्यांना त्या मार्गाने जायचे असेल तरी हरकत नाहीच नाही. कोणत्या उपायाने का होईना व्यसन सुटल्याशी कारण. मात्र बहुसंख्य माणसे औषध मागतात जे व्यसनी माणसाच्या नकळत जेवणातून देता येईल. याबद्दल अनेक गैरसमज आहेत. ही औषधे फक्त मानसोपचारतज्ञ देऊ शकतात. आणि ती देताना फार विचार करावा लागतो कारण ती सर्वांना झेपत नाहीत. त्याची रिऍक्शन येऊन गंभीर प्रसंग उद्भवू शकतो. शिवाय औषध बंद झाले की व्यसन सुरु होऊ शकते. खरं तर व्यसनाकडे नेणाऱ्या स्वभावावर उपाय केला पाहिजे. सर्दी खोकल्या प्रमाणे एखादे किरकोळ औषध घेऊन व्यसन बंद होईल असे अनेकांना वाटते. मी औषध देत नाही इतकंच काय मला औषध माहितही नाही असे म्हटले की अनेकजण हिरमुसतात आणि पुन्हा फोन करत नाहीत. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनाला किती वर्षे झाली हा प्रश्न विचारला की अनेक बायका ते कॉलेजपासून पितात पण गेले चार वर्ष प्रमाण वाढलंय. चार वर्ष हा व्यसनाच्या दृष्टीने मोठा कालावधी म्हटला पाहिजे.