You are here:
द गुड, द बॅड ऍंड द अग्ली – ब्लांडी – द गुड

वेस्टर्न चित्रपटात मैलाचा दगड ठरलेल्या या सिनेमातील व्यक्तिरेखा गुंतागुंतीच्या आहेत. तसेही सर्जिओ लिऑनीच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम काहीनकाही सांगत असते. प्रत्येक छोटी व्यक्तिरेखा देखील आपली छाप सोडून जाते. मग ब्लांडीसारख्या प्रमुख व्यक्तिरेखेला अनेक कंगोरे असणार हे ओघानेच आले. ब्लांडीबद्दल बोलण्याआधी हे आवर्जून सांगावसं वाटतं की माझ्यामते या चित्रपटातील ज्याला सर्वात कॉंप्लेक्स म्हणता येईल ती व्यक्तिरेखा टूकोची आहे. त्या तूलनेत ब्लांडी सरळसोट आहे. तरीही बारकाईने पाहिले असता त्यालाही कंगोरे आहेतच. चित्रपटात हा तिघांमध्ये “द गुड” आहे. त्याला दिलेल्या या उपाधीबद्दल बरेच काही बोलता येईल.

चित्रपटातील काळ सिव्हील वॉरचा आहे. सगळीकडे अंधाधूंद आहे. त्यात एंजल आय सारखे सैन्यात राहून उजळ माथ्याने वावरणारे पण स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे खलनायक आहेत. तर टूकोसारखे माथ्यावर बक्षीस असलेले गुन्हेगारही आहेत. या पटात या दोघांच्या तूलनेने ब्लांडी हा “द गुड” आहे हे लक्षात घ्यावे लागेल. अन्यथा शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला पकडायचे. त्याच्या डोक्यावर असलेले बक्षीस घ्यायचे आणि नंतर त्याला फाशीची शिक्षा दिली जात असताना पळून जाण्यास मदत करायची हे काम कायदेशीर आहे असे कोण म्हणेल? लिऑनीच्या चित्रपटात संपूर्ण काळी अथवा धवल अशी व्यक्तीरेखा बहुधा नसते. आपण इतरांच्या तूलनेतच काहींना जास्त चांगले तर काहींना जास्त वाईट म्हणू शकतो. समाजातही बरेचदा वास्तव असेच आढळते असे मला वाटते. आपल्या महाभारताचेही वैशिष्ट्य हेच आहे अशीही माझी समजूत आहे.

एका टप्प्यावर ब्लांडीचे आणि टूकोचे फाटते. टूको जास्त लोभी होतो आणि ओसाड वाळवंटात हात बांधलेल्या अवस्थेत ब्लांडी त्याला सोडून निघून जातो. हा या “द गूड” चा बॅड चेहरा आहे. मात्र येथे एंजल आय असता तर त्याने टूकोला ठारच मारले असते असे वाटते. त्यामुळे ब्लांडीने टूकोला निदान जिवंत तरी सोडले म्हणून तो “द गूड” आहे. ब्लांडीला “द गूड” म्हणण्याचे आणखी एक कारण त्याला इतरांबद्दल सहानुभूती आहे. मरणाच्या दाराशी पोहोचलेल्या अधिकाऱ्याला तो युद्धात मदत करतो. शेवटी अगदी मरणपंथाला पोहोचलेल्या एका तरुण सैनिकाच्या अंगावर आपला ओव्हरकोट टाकतो. त्याला आपल्या सिगारेटचा झुरका ओढू देतो. दुसरा झुरका घेतल्यावर तो तरुण विझून गेलेला असतो. अतिशय हृद्य अशा या प्रसंगात ब्लांडी मूळात कसा आहे हे आपल्याला दिसून येते.

बाकी ब्लांडी हा “द गूड” आहे म्हणजे तो धर्मराज युधिष्ठीर नाही. ब्लांडी चलाख, चतूर आणि बुद्धिमान आहे. तो तसा नसता तर त्याचे चांगुलपण अळणी झाले असते. काहीही न करणारी सभ्य माणसे जगात असतातच. त्यांचा कुणाला त्रास नसतो. पण त्यांच्यामुळे कुणाचा काडीचा फायदाही होत नाही. हे लोक असून नसून सारखेच. ब्लांडी “द गूड” आहे कारण त्याला दुष्टांचा काटाही काढायचा आहे. त्यासाठी तो जुने वैर विसरून लोभी टूकोशी हातमिळवणी करायलाही तयार आहे. शिवाय ऐनवेळी एंजलआय समोर उभा ठाकल्यावर त्याच्या डोक्यात एंजलआयला पराभूत करण्याचा प्लानही तयार आहे. ब्लांडी हा या चित्रपटातल्या महाभारतातला कृष्ण आहे. टूकोला एकदा मित्र मानल्यावर तो टाकत नाही. मिळालेल्या संपत्तीमधील टूकोचा अर्धा वाटा तो बाजूला काढतो. फक्त शेवटी त्याच्याशी खोडकरपणे वागतो आणि आपल्या चेहऱ्यावर हसू फुलते
.
लियॉनीच्या तिन्ही डॉलर चित्रपटात क्लिंट इस्टवूडने एकंदर सभ्य माणूस साकारला असला तरी ब्लांडीला वेगळ्या शेडस आहेत. एंजलाआयच्या हाती सापडल्यावरदेखील आपल्याला खजिन्याचे रहस्य माहित असल्याने हा आपल्याला मारणार नाही हे त्याला चांगले ठावूक आहे. शिवाय टूकोपेक्षा ब्लांडी चलाख आहे हे एंजल आयलाही ठावूक आहे. हा सारा हिशेबीपणा इस्टवूडने त्याच्या मिस्किल हास्यात दाखवला आहे. त्याचे सिगार पेटवणे, किंचित बसकट पण ठाम आवाजात बोलणे,तो बोलत नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरील रेषनरेष बोलत असते. क्लिंट इस्टवूडने साकारलेली ही व्यक्तीरेखा त्याच्या एकंदरीत सिनेकारकिर्दीतील एक अतिशय महत्वाचा टप्पा मानता येईल. तो टूकोसारखा व्रात्य नाही, एंजलआय सारखा भयंकर नाही. तो शुभंकर आहे. सौम्य आहे. म्हणूनच त्या वैराण वेस्टच्या कठोर पार्श्वभूमीवर त्याच्यात मानवतेचा ओलावा दिसला की आपल्यालाच गारवा लाभल्यासारखे वाटते.

अतुल ठाकुर

5 Comments

  1. I’ve been trying a few different sites lately, but the experience here is surprisingly smooth. The payouts are fast and the interface is very user-friendly. Highly recommend r888bet for anyone looking for a reliable spot.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment