You are here:
Inception आणि योगवासिष्ठ

योगवासिष्ठाच्या उत्पत्ती प्रकरणातील लवण राजाची गोष्ट वाचली आणि Inception या गाजलेल्या चित्रपटाची आठवण झाली. खरं तर असं अनेकदा होतं. हॉलिवूडचे सायन्स फिक्शन्स पाहिले की आपल्या संस्कृत ग्रंथामधला कुठलातरी संदर्भ मिळतो. या लवण राजाची कथा म्हणजे स्वतःच एक मिस्टरी आहे. हा राजा दरबारात बसलेला असताना एक गारुडी येऊन आपली जादू पाहण्याची विनंती करतो. राजाने परवानगी दिल्यावर तो गारुडी मोराच्या पिसाऱ्याने तयार केलेला पंखा राजासमोर फिरवतो आणि राजाची तंद्री लागते. त्याला दिसते की राजसभेत एक उत्तम सुलक्षणी घोडा घेऊन एक इसम आला आहे आणि तो राजाला त्यावर स्वार होण्याची विनंती करत आहे.

राजाला घोडा आवडलेला असतो. आणि तो त्यावर स्वार होऊन भरधाव वेगाने बाहेर पडतो. राजाचा या घोड्यावर कसलाही ताबा राहात नाही. आणि तो घोडा राजाला अपरिचित अशा प्रदेशात नेऊन सोडतो. तेथे भुकेने अतीव्याकुळ झालेला राजा अन्नाच्या बदल्यात चांडाळ कन्येशी विवाह करतो. पुढे तो तेथेच रमतो. त्याला मुले होतात. साठ वर्षे उलटतात. आणि त्या प्रदेशात दुष्काळ पडतो. एके दिवशी अगदीच वाईट परिस्थिती आली असताना अन्नासाठी आता चांडाळ बनलेला हा लवण राजा मुलांना घेऊन बाहेर पडतो. पण अन्न मिळत नाही. त्याचा अतिशय लाडका असलेला धाकटा मुलगा अन्नावाचून तडफडू लागतो. शेवटी आपणच मरावे आणि आपले मांस त्याला खायला मिळावे या विचाराने राजा अग्निकुंड तयार करून त्यात उडी मारणार इतक्यात…

राजदरबारात तो एकदम जागा होतो…

सुरुवातीला आपण कुठे आहोत त्याला काहीच कळत नाही. काही क्षण तो आपल्या मंत्र्यांनाही ओळखत नाही. हळूहळू तो भानावर येतो. मंत्री सांगतो की गेल्या चार घटका तुम्ही भानावर नव्हता. इथे राजा अपरिचित प्रदेशात अनेक वर्षांचा संसार करून झालेला असतो. इथपर्यंत मला ख्रिस्टोफर नोलान च्या Inception ला ही कथा समांतर जाते असं वाटतं. योगवासिष्ठातली ही कथा मात्र याच्याही फार पुढे निघून जाते. पुढे राजाच्या मनात येतं की आपल्याला ते सर्व इतकं खरं वाटलं होतं. तर एकदा त्या बाजूला जाऊन तो प्रदेश पाहायला काय हरकत आहे? असा विचार करून तो सैन्यसह निघतो.

पुढे त्या प्रदेशात गेल्यावर आश्चर्य म्हणजे त्याला ओळखीच्या खुणा दिसतात. त्याला आपलं घर दिसतं. आणि त्याची सासू दिसते जी राजाला ओळखत नाही पण आपल्या जावयाबद्दल सांगते. ती चांडाळ बनलेल्या राजाचीच कथा असते. म्हणजे राजाने स्वतः अनुभवलेली ही घटना खरोखर घडून गेलेली असते. हे वाचून माझ्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या. या सगळ्यांची संगती कशी लावायची? योगवासिष्ठात मनाच्या सामर्थ्याचं वर्णन पानोपानी आहे. मन काहीही करू शकतं. मनच सारं काही आहे. हे जगत मनातून निर्माण झालं आहे आणि मनोनाश हा त्यातून सुटण्याचा उपाय आहे असं योगवासिष्ठ सांगतं.

अशा अनेक कथा योगवासिष्ठात आहेत. त्यावर केव्हातरी लिहेन. पण वरील कथेची तुम्ही संगती कशी लावाल ते नक्की लिहा.

अतुल ठाकुर

6 Comments

  1. Thank you for sharing superb informations. Your site is very cool. I am impressed by the details that you’ve on this website. It reveals how nicely you understand this subject. Bookmarked this web page, will come back for more articles. You, my pal, ROCK! I found simply the information I already searched all over the place and simply couldn’t come across. What a perfect site.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment