You are here:
हम तेरे प्यारमें सारा आलम…

“दिल एक मंदिर”, दिग्दर्शक श्रीधर यांचा एक झपाटुन टाकणारा चित्रपट. अतिशय सशक्त कथा. पतीला असाध्य कोटीतला आजार जडलेला आणि समोर डॉक्टर म्हणुन पुर्वाश्रमीचा प्रियकरच उभा. त्याच्या मध्ये सापडलेली नायिका. तिची कुतरओढ. “याद न जाये बीते दिनोंकी” असे आर्तपणे आळवत अजुनही तिच्यातच गुंतलेला डॉक्टर. आणि जगण्याची आशा सोडलेला “बुलावा आ गया” म्हणून  ऑपरेशन थियेटरमध्ये जाण्याची तयारी करणारा आणि तेथुन परत येण्याची खात्री नसलेला पती. त्याने तिला आपल्या बंधनातुन मोकळे केले आहे. आणि तेव्हाच नायिका आपल्या भावना बोलुन दाखवते आहे “हम तेरे प्यारमें सारा आलम…”

दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडलेल्या स्त्रीची सारी वेदना या गाण्यात उतरली आहे. हसरत जयपुरींचे काव्य या वेदनेला आणखी गडद करते.

पंछी से छुड़ाकर उसका घर, तुम अपने घर पर ले आये
ये प्यार का पिंजरा मन भाया, हम जी भर-भर कर मुस्काये
जब प्यार हुआ इस पिंजरे से, तुम कहने लगे आज़ाद रहो
हम कैसे भुलायें प्यार तेरा, तुम अपनी ज़ुबाँ से ये न कहो
अब तुमसा जहां में कोई नहीं है, हम तो तुम्हारे हो बैठे
तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ

प्रेमाचा झाला तरी तो पिंजराच. पुर्वीच्या मोकळ्या आभाळाची पक्ष्याला आठवण होत नसेल काय? हा गुढरम्य प्रश्न कवीने तसाच अनुत्तरीत टेवला आहे. आणि आता तर त्या पिंजर्‍याचीच इतकी सवय झालीय की स्वातंत्र्याची भीती वाटु लागलीय. एकंदरीत नायिकेची व्यथा तिच्या सुरुवातीच्या आयुष्यालादेखिल स्पर्श करते आहे.

शंकर जयकिशन ऐन भरात असतानाचे संगीत. आणि त्यांनी लताच्या आवाजातल्या तीव्रतेचा केलेला चपखल वापर. “तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ” गाताना, पतीने आशा सोडली, आपल्याला आधीच स्वतःपासुन वेगळे केले याचे दु:ख स्वरात नुसते उचंबळुन येते. हा चमत्कार फक्त लताच करु शकते.

श्रीधर यांच्या दिग्दर्शनात अनेक सुंदर जागा त्यांनी घेतलेल्या असतात. गाण्याच्यावेळी तर ते खासच दिसुन येते. “जब प्यार हुआ इस पिंजरे से”, ही ओळ येताना कॅमेरा हळुवारपणे पलंगाच्या गजांच्या अलिकडे ठेवला आहे. त्यातुन पिंजर्‍याचे प्रतिक सुरेख उभे केले आहे आणि त्यानंतर “तुम कहने लगे आज़ाद रहो” म्हणताना कॅमेरा राजकुमारवर येतो. गाण्यात पुढे “हम प्यार के गंगाजल से बलम जी, तनमन अपना धो बैठे” म्हणताना मीनाकुमारीच्या डोळ्यांतुन आसवे वाहु लागतात आणि पडद्यावर अश्रुंमधुन पलंगावर बसलेला हताश राजकुमार पाहायला मिळतो.

राजकुमारने संपूर्ण गाण्यात कसलिही आशा नसलेला आणि शेवटची तयारी केलेला पती उभा केला आहे. त्याने लहानसहान हालचालींमध्ये ते सहजपणे दाखवुन दिलंय. त्याच्या चेहर्‍यावर ते कारुण्य सुरुवातीपासुन दिसुन येतं. जणुकाही तो मनोमन तयारी करतो आहे आपल्या पत्नीपासुन दुर जाण्याची. सुरुवातीलाच गाणे ऐकताना त्याच्या भावना उचंबळुन येऊ लागतात. श्वास जोरात चालताना, नाकपुडी किंचित फुलवुन राजकुमारने मनातली आंदोलनं छान दाखवलीत.

या गाण्यात मीनाकुमारीने मुर्तीमंत वेदना व्यक्त केली आहे. गाण्याची अगदी सुरुवातीलाच तिने जो ‘लूक’ दिला आहे तो तिची सारी वेदना दाखवणारा. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत तिच्या चेहर्‍यावरची रेष न रेष फक्त तिचे दु:खच व्यक्त करत राहते. एकाच रंगाच्या अनेक छटा दिसाव्यात त्याप्रमाणे गाण्याच्या अर्थागणिक ती आर्तता निरनिराळ्या प्रकारे तिच्या चेहर्‍यावर व्यक्त होत राहते. त्यात निराशा आहे, पतीने आधीच स्वतःला दुर केल्याचे दु:ख आहे, अगतिकता आहे. “शेवटच्या क्षणी आता मला दुर लोटु नकोस” अशी आर्तपणे केलेली आळवणी आहे. या गाण्याची नायिका मीनाकुमारीच. गाण्याबरोबरच तिची आर्तता, दु:ख वाढत जातं आणि शेवटी तिच्या हृदयाचा बांध फुटतो…

अतुल ठाकुर

5 Comments

  1. [3352]nagawin1tqx লগইন এবং অ্যাপ ডাউনলোড | বিকাশ ক্যাসিনো গেম,nagawin1tqx login করুন এবং অ্যাপ ডাউনলোড করে উপভোগ করুন মোবাইলে অনলাইন স্লট গেম। বিকাশ দিয়ে ক্যাসিনো ডিপোজিট করে আজই খেলা শুরু করুন। visit: nagawin1tqx

  2. [1675]G088 – Đăng nhập tải app và chơi game nổ hũ đổi thưởng,Truy cập g088 để đăng nhập và tải app nhanh chóng. Trải nghiệm game nổ hũ đổi thưởng hấp dẫn và tìm hiểu cách nạp tiền qua Momo đơn giản. Chơi ngay hôm nay! visit: g088

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment