You are here:
समाजशास्त्राच्या चष्म्यातून संस्कृत शिकताना

शाळेत संस्कृत होतं आणि महाभारताची गोडी अगदी लहानपणापासून लागली होती. माझ्या संस्कृत आवडीचं बीज कदाचित महाभारताबद्दलच्या प्रेमातही असेल. पण पुढे योगाबद्दल गाढ ममत्व निर्माण झालं. स्वामी विवेकानंदांचं पातंजल योगदर्शन वाचण्याचा प्रयत्न केला. कोल्हटकरांचं पातंजल योगदर्शन समोर होतं.  फारसं काही कळत नव्हतंच. पण योगाच्या अभ्यासातून संस्कृत भाषेशी अनुबंध निर्माण झाला. योगदर्शनाची सूत्रमय भाषा होती. कमीत कमी शब्दात भरपूर आशय ओतायचा हे तर सूत्रांचे लक्षण. त्यामुळे त्यावर अधिकारी विद्वानांची भाष्ये वाचायला हवी. केव्हातरी पुढे असे वाटु लागले की आपल्याला ही सूत्रे मूळात संस्कृत भाषेत कळायला हवीत. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरु केला. काही वर्गांना दाखल झालो. पण त्यावेळी आयुष्यात कसलिही अनुकूलता नव्हती. प्रत्येक स्तरावर सतत संघर्ष सुरु होता. त्यामुळे धरसोड फार झाली. बरं आदर्श म्हणून समोर फार मोठी माणसे होती. राजकारणाच्या धकाधकीत ओरायन आणि आर्टीक होम इन वेदाज हे संशोधनपर लेखन करणारे लोकमान्य समोर होते. तुरुंगात गीतारहस्य लिहिलेल्या टिळकांच्या फार पूर्वीपासून प्रेमात पडलो होतो. नेमस्तपणे हिंदू धर्माचा अभ्यास करणारे गांधी आवडत होते. एक्स रे प्रमाणे जुन्या संस्कृत ग्रंथांच्या अंतरंगात शिरून त्यावर भाष्य करणारे नरहर कुरुंदकर तर गुरुस्थानीच वाटतात मला. अशा थोर माणसांच्या साहित्याचा अभ्यास करताना संस्कृत भाषेचे दर्शन अधूनमधून घडत होतेच. जेव्हा थोडी अनुकूलता लाभली तेव्हा रितसर मुंबई विद्यापिठात संस्कृतच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र तेव्हा पूर्वीप्रमाणे माझी पाटी कोरी नव्हती. मी समाजशास्त्रात एमए झालो होतो आणि त्याच विषयात माझी पिएचडीची तयारीही सुरु होती. माणसाचा एक पिंड असतो. एकेकाच्या मनाची एक विशिष्ट घडण असते असे मला वाटते. समाजशास्त्र हे मला फार मानवले होते. स्वभावाला पटणार्‍या अनेक गोष्टी तेथे दिसल्या होत्या आणि अभ्यासायला मिळाल्या होत्या. त्यामुळे माझी मूळ शैक्षणिक घडण ही समाजशास्त्रात झाली. संस्कृतचा अभ्यास करताना पुढे हा समाजशास्त्राचा चष्मा काढणे मला शक्य नव्हते आणि खरं सांगायचं तर मला तसं करायचंही नव्हतं. मात्र माझी नाळ समाजशास्त्राशी जुळली होती याचा अर्थ त्या शास्त्रात सांगितलेला प्रत्येक शब्द मला शिरोधार्य होता असे नव्हते. समाजशास्त्रातील विद्वानांबरोबर माझे अनेक ठिकाणी मतभेद होते. संस्कृत शिकतानाही यावेगळे काही घडेल असे वाटले नव्हते. पण काहीतरी वेगळे घडले.

मी संस्कृत भाषेच्या प्रेमात होतो. पण त्या भाषेत लिहिला गेलेला प्रत्येक शब्द किंवा प्रत्येक मत हे मला पटत होतेच असे नाही. पण समाजशास्त्रात जसे माझे शिक्षकांशी वाद झाले आणि काही सन्माननीय अपवाद वगळता समाजशास्त्रातील काही जणांबद्दल माझ्या मनात तिटकारा निर्माण झाला तसे मात्र संस्कृत शिक्षकांबद्दल कधीही झाले नाही. याचे कारण ही सर्व मंडळी संस्कृतच्या गाढ प्रेमात होती. प्रेमात पडलेली माणसे पाहण्यातदेखिल आनंद असतो अशासारखे पुलंचे वाक्य कुठेतरी वाचलेले आठवते. त्याचा पुरेपूर प्रत्यय संस्कृत शिकताना आला. मला सायणाचार्याच्या नुसत्या उल्लेखाने गहिवरणारे शिक्षक भेटले, कालिदासाचे शाकुंतल मूर्तिमंत समोर उभे करणारे शिक्षक भेटले, कौटिल्य अर्थशास्त्र शिकवताना देशप्रेमाने भारून गेलेले शिक्षक भेटले, वेदान्तासारखा गहन विषय शिकवताना आपण जणूकाही हेरकथा वाचत आहोत असा फिल देणारे आणि त्यातले कूट प्रश्न उलगडून तो विषय अत्यंत रसमय करणारे शिक्षक भेटले, व्याकरणाची भीती पार पळवून नेणारे शिक्षक भेटले, आणि माझ्यासाठी अलंकारशास्त्राचा खजिना खुला करणारे शिक्षक भेटले. हे सारे संस्कृतप्रेमी होते. देता किती घेशील दो कराने अशी माझी अवस्था झाली होती. ही माणसे भरभरून देत होती आणि माझीच झोळी तोकडी पडत होती याची नम्र जाणीव मला झाली होती. अशावेळी या संस्कृतप्रेमीजनांबरोबर संवाद साधून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचा मी परिपाठ ठेवला. मी भाषेच्या प्रेमात होतो आणि भाषा शिकण्यासाठी आलो होतो. त्यात लिहिले गेलेले तत्त्वज्ञान हा सध्या तरी माझ्या समोर विषय नव्हता. पुढे काव्यशास्त्रासारख्या विषयावर प्रेम जडले. मग आनंदवर्धनाच्या ध्वनिसिद्धान्ताने खेचून नेले. माझ्यासाठी तर अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखे झाले. मनाची प्रवृत्ती सुरुवातीपासून कला आणि रसाकडेच होती. आता त्यातच डुंबण्याची संधी मिळाली होती. ती सोडून मी नसत्या गोष्टींबद्दल वाद घालण्याचा करंटेपणा संस्कृत शिकताना केला नाही. संस्कृतात लिहिला गेलेला प्रत्येक शब्द हा प्रमाण न मानताही मला भाषेचा अभ्यास करता येत होता. पूर्वी होऊन गेलेले सारे काही परिपूर्ण आहे असा माझा समज नव्हता तरीही मला संस्कृत भाषेवर प्रेम करता येत होते आणि इतके माझ्यासाठी पुरेसे होते.

मात्र संस्कृतचे माझे शिक्षण हे जितके या प्रेमळ शिक्षकांकडून घडले तितकेच जी निरनिराळी व्याख्याने ऐकली त्या व्याख्यात्यांकडूनही घडले. अनेक विद्वानांना ऐकले. षडदर्शनातील एकेक दर्शनांवर हुकूमत असणार्‍यांना ऐकायला मिळाले. विस्मय वाटावा अशा प्रतिभेचा बुद्धीचा अविष्कार पाहायला मिळाला. या सर्वांबद्दल काही मत व्यक्त करण्याची माझी योग्यता आणि पात्रता नाही याची जाणीव तेव्हापासून आजतागायत आहे त्यामुळे पदरी पडले, जे समजले ते घेत गेलो आणि अभ्यास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. बाकी संस्कृत विषयात जी काही फार थोडी विदेशी मंडळी ऐकली त्यांचा माझ्यावर फारसा प्रभाव पडला नाही हेही येथे नमुद करावेसे वाटते. मात्र हे माझ्या विचारसरणीमुळे घडत असावे. समाजशास्त्र शिकत असतानादेखिल अनेक सिद्धान्त भारतातील परिस्थितीला कितपत लागु होतात हे तपासून पाहण्याची एक सवय जडली होती. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करताना अस्सल या मातीत रुजलेले तत्त्वज्ञान समोर आले, त्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. समाजशास्त्रात समाजाची कार्यपद्धती अभ्यासण्याची संधी मिळाली. मानसशास्त्राच्या अभ्यासात मनाचे कार्य कसे चालते ते पाहिले पण कुठल्याही प्रसंगी मी कसे वागावे याचे मार्गदर्शन मात्र संस्कृतनेच केले. त्यामुळे संस्कृतचा पुढे आणखी अभ्यास करण्याची ओढ लागली. अलंकारशास्त्रामुळे काही काव्यांचा, नाटकाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि आपण फक्त तत्त्वज्ञान पाहात बसलो पण काव्यशास्त्राचं पाणीही प्रचंड खोल आहे हे लक्षात आलं. भामहा पासून ते दण्डी, वामन, आनंदवर्धन, मम्मट ते अगदी विश्वनाथापर्यंत सर्व विद्वानांनी यावर प्रचंड काम करून ठेवलं आहे ते दिसलं. आणि त्यावरही अभिनवगुप्तासारख्या प्रकांडपंडितांनी टीकाग्रंथ लिहिले आहेत, ते ही एक फार मोठे अभ्यासाचे क्षेत्र आहे हेही लक्षात आलं. ज्ञानाचा असा विराट पसारा आणि अफाट, अजस्र विस्तार हा या देववाणीमुळे मला पाहायला मिळाला. या अथांगसागरात फक्त नखं मिजवायची संधी मिळाली तरी मला कृतकृत्य वाटेल अशी आजही माझी नम्र समजूत आहे.

पुढे समाजशास्त्रातील प्रबंध पूर्ण झाला आणि मी त्यातच पुढे आणखी संशोधन करायचे ठरवले. पुण्यातील मुक्तांगण हे सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्र हे माझ्या संशोधनाचा केस स्टडी होते. तेथे गांधीच्या आश्रमजीवनपद्धतीचा आणि गांधी तत्त्वांचा व्यसनमुक्तीसाठी उपचार म्हणून समावेश केला गेला आहे. त्यामुळे पातंजल योगसूत्रातील यम नियम वेगळ्या रुपात तेथेही भेटले. पुन्हा तेथेही संस्कृतशी नाळ जुळली. माणसाच्या मनाचा अभ्यास भारतातही प्राचीन काळापासून सुरु आहे हे लक्षात आले. संस्कृतातील सुभाषिते ही व्यसनमुक्तीसाठी एखादे स्लोगन असावे तशी उपयोगी पडू शकतील अशी जाणीव झाली. पुन्हा पातंजल योगसूत्र अभ्यासावे ही उर्मी नव्याने उसळून आली. आता तर माझ्या पुढच्या संशोधनाचा पाया असलेल्या  ज्या संकल्पना आहेत त्यात योग, भाषाविज्ञान हे विषय असल्याने संस्कृतचा अभ्यास हा माझ्या जीवनशैलीचा एक भागच बनणे आवश्यक आहे याची जाणीव नव्याने झाली आहे. अर्थात हा प्रवास अगदी सोपा आणि सरळसोट नव्हता. संस्कृतकडे काही ज्ञानशाखांमधले विद्वान वेगळ्या नजरेने पाहतात. अनेकदा भाषेला गरज नसताना राजकारणाचा रंग चढतो. मात्र संस्कृत भाषा आणि संस्कृत भाषा वापरणारी माणसे या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत हे मी मनाशी अगदी पक्के ठसवून घेतल्याने या गोष्टींचा कधी त्रास झाला नाही. त्यामुळे माझे संस्कृतवरचे प्रेम नुसते अबाधितच राहिले नाही तर दिवसेंदिवस वाढत गेले.  या सार्‍याचे श्रेय माझ्या संस्कृत शिक्षकांना आहे हे मला प्रांजळपणे नमुद करावेसे वाटते. आज संशोधन करताना संस्कृतमधील अनेक क्षेत्रे खुणावत आहेत. त्यात योग आणि भाषा विज्ञान तर आहेच, शिवाय पूर्वमिमांसा आहे, वेदातील काही सूक्तं आहेत, वेदान्तातील काही भाग आहे, आमच्या काव्यशास्त्रातील तर बर्‍याच गोष्टी माझ्या संशोधनाला उपयुक्त ठरतील अशा आहेत. याशिवाय उपनिषदांमधील काही भाग आहे, साहित्यशास्त्र आहे, किंबहूना प्राचीन संस्कृत वाङमयात जेथे जेथे म्हणून मनाचा विचार केला गेला आहे तेथे काही क्षण थबकून मला काहीतरी महत्त्वाचे सापडेल का ते पाहावे लागणार आहे.

या प्रवासात जी शिदोरी आहे ती माझ्या संस्कृत शिक्षकांनी मला दिली आहे. मी त्यांच्याकडून नुसतं संस्कृतच शिकलो असं नाही तर व्याकरणाच्या अभ्यासात  शिस्त कशी असते आणि ती तुम्हाला तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातही बाणवता येते हे एका शिक्षकाने मला शिकवले. एखाद्या विषयाचा ध्यास घेणारी माणसे काय चमत्कार करु शकतात हे एका शिक्षकाने दाखवून दिले. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास वेगळ्या शास्त्राच्या दृष्टीकोणातूनही करता येतो हे एका शिक्षकाकडून मी शिकलो. एकाच श्लोकाचा किती निरनिराळ्या तर्‍हेने अभ्यास करता येतो हे याचे प्रात्यक्षिक एका शिक्षकाने करुन दाखवले. यातील अनेक शिक्षक माझ्यापेक्षा वयाने लहान होते. या लेखाच्या निमित्ताने माझ्या सर्व शिक्षकांना नम्रपणे वंदन करण्याची संधी मला घ्यावीशी वाटते. संशोधनाचा पुढचा प्रवास आनंदाचाच होणार आहे याची खात्री आहे कारण जेथे संस्कृतातील रत्नेच वेचायची आहेत तेथे त्याचा शीण होणारच कसा?

अतुल ठाकुर

1 Comment

  1. hey there and thank you in your information – I’ve certainly picked up anything new from proper here. I did however expertise a few technical issues the usage of this website, since I skilled to reload the website many occasions prior to I may get it to load properly. I had been puzzling over if your web host is OK? Not that I am complaining, but slow loading cases times will very frequently have an effect on your placement in google and could harm your high-quality rating if advertising and ***********|advertising|advertising|advertising and *********** with Adwords. Anyway I am including this RSS to my email and can glance out for much more of your respective intriguing content. Ensure that you update this again soon..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment