लिंग्विस्टीक्सचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि लक्षात आले की मराठीशिवाय आपल्याला जवळची आणि आयुष्यभर अभ्यास करता येईल अशी एक भाषा आहे ती म्हणजे वाडवळी. आधी “घरकी मुर्गी दाल बराबर” या न्यायाने या भाषेचे महत्त्व वाटले नव्हते. जन्मल्यापासून पहिली सात वर्षे ही भाषा ऐकली. ही आमच्या वाडवळी समाजाची भाषा. पुढे काही कोसागणिक होणारे तिच्यातील बदल, तिची वैशिष्ट्ये जाणवू लागली. मात्र तिच्यात अभ्यासाच्या किती जबरदस्त शक्यता आहेत हे मात्र लिंग्विस्टीक्सचा अभ्यास सुरु केल्यावरच जाणवले. साधारणपणे वसईपासून ते बोर्डीपर्यंत बोलली जाणारी ही भाषा. खुद्द वसईत भाषावैविध्य खुप आहे. समाजागणिक भाषा बदलते. वसईत बोलली जाणारी वाडवळी ही केळवा माहिम, माकुणसार, चिंचणी तारापूर आणि बोर्डी यापेक्षा वेगळी आहे.
भाषेचा अभ्यास करु लागल्यावर एरवी माहित नसलेल्या भाषेतील खाचाखोचा दिसु लागतात हे तर खरेच पण त्याबरोबरच माहित असलेल्या गोष्टींबाबतीतही नव्याने नवल वाटु लागते. हे नवल वाटणे फार आनंदाचे असते. वाडवळी ही माझी भाषा आणि माझे लहानपण या भाषेच्या संगतीत गेले. आमचे गाव चिंचणी, गुजरातला जवळ असलेले. त्यामुळे आमच्या बाजूला बोलल्या जाणार्या वाडवळी भाषेतले गुजराती शब्द आज नव्याने निरखताना आश्चर्य वाटते. बेन, बा, बंधू असे नात्याना सूचित करणारे शब्द किंवा घणा म्हणजे खुप या अर्थीचा शब्द असे अनेक शब्द मी गावी असताना ऐकले. आम्ही इथे तिथे ला “अटे तटे” म्हणत असु पण आमच्या कडे जेव्हा आमची केळवा माहिम परिसरातील नातेवाईक मंडळी येत ती “ऐला तैला” म्हणत. आज वाडवळीचा भाषा विज्ञानाच्या दृष्टीने अभ्यास करताना असे शब्द मुद्दाम अधोरेखित करावे लागतात. आम्ही पाहण्याला “पाव, पावते” म्हणतो तर माहिमकडची माणसे “बगिते” म्हणतात. आमची नकार घंटा “नी” ने वाजते तर माहिमकडली मंडळी “नय” म्हणतात.
असे बारिकसारिक फरक आहेतच शिवाय भौगोलिकदृष्टीने भाषेत ज्याला “बॉरोड” वर्ड्स म्हटले जाते त्यामुळेही बराच फरक पडला आहे. वसईत बोलल्या जात असलेल्या वाडवळीत पोर्तुगीज शब्द बरेच आढळतात. तर चिंचणी तारापूर परिसर गुजरातच्या जवळ असल्याने तेथिल वाडवळीत काही गुजराती शब्दांचा वापर केलेला दिसतो. भाषेच्या फरकाबरोबरच प्रान्तागणिक लग्नविधी आणि अंत्यविधींमध्येही निरनिराळ्या ठिकाणी काही फरक जाणवतो. बाकी जागतिकीकरणामुळे म्हणा किंवा सभ्यतेच्या कल्पनांमुळे म्हणा वाडवळी आता सुशिक्षितांमध्ये फारशी बोलली जात नाही हे जाणवते. घरातल्या घरात वाडवळी बोलणारी मंडळी बाहेर एकदम मराठीवर येतात. आताची पिढी कदाचित इंग्रजी बोलत असेल.
या भाषेचा अभ्यास सुरु करताना काही ज्येष्ठ मंडळींना मी भेटलो. तेव्हा एका जोडप्याबद्दल असे ऐकले की जे दोघेही शिक्षक असून एकमेकांशी वाडवळीत संवाद साधत होते. पण अशी उदाहरणे फार आढळली नाहीत. काही मंडळी शिक्षण आणि कामानिमित्त मुंबईकडे सरकली आणि त्यांचा गावाशी असलेला संबंध जरी टिकला असला तरी भाषेशी असलेला संबंध तुटला. फार पुर्वी म्हणजे शंभरदिडशे वर्षापूर्वी जेव्हा बाटवाबाटवीच्या प्रकारांची भीती होती तेव्हा वसईहून आमचे पूर्वज मुंबईत म्हणजे गिरगावात येऊन राहिले त्यांचा या भाषेशी काहीही संबंध राहिला नाही. खरेखोटे देव जाणे पण असे म्हणतात की विहिरीत पाव टाकून बाटवण्याचे प्रकार घडत. त्यासाठी माणसे जागा जमिनी सोडून मुंबईला निघून आली. आता काळ बदलला. गंमत म्हणजे आता रोज सकाळी पावाशिवाय चालत नाही.
या भाषेचा लिंग्विस्टीक्सच्या दृष्टीने अभ्यास करायचा म्हणजे नुसतं व्याकरणच नाही तर त्यात असलेले विशिष्ट स्वर, व्यंजने, त्यांचे आघात, शब्दांचे प्रत्यय, त्यांचे अर्थ, काल, लिंग, वचन, म्हणजेच मॉर्फोलॉजी, फोनॉलॉजी, सिंटेक्स, भाषेचा समाजशास्त्रानूसार अभ्यास अशा अनेकानेक अंगांनी तिचा विचार करावा लागणार आहे. वाडवळी बोलताना काही ठिकाणी “स” च्या ऐवजी “ह” चा केलेला वापर (सांगा ऐवजी हांगा) तर काहीवेळा “च” ऐवजी “स” चा केलेला वापर असे अनेक बदल लक्षात घ्यावे लागणार आहेत. ते कदाचित भाषाविज्ञानाच्या काही नियमानूसार घडत असतील तर तसे शोधून काढावे लागेल. शिवाय तीस, चाळीस, पन्नास वर्षापूर्वीची वाडवळी आता बोलली जात नसेल. काही शब्द लुप्त झाले असतील. त्याचीही नोंद करावी लागेल. हा अभ्यास करताना भाषेच्या आणि समाजाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाजु विसरता येणार नाहीत.
अकराव्या बाराव्या शतकात प्रताप बिंब राजाने महिकावती येथे आपली राजधानी वसवली. हेच आताचे केळवे माहिम. हा राजा जेथून प्रवास करून येथपर्यंत आला त्या वाटेवर कदाचित या भाषेच्या खुणा मिळु शकतील. या राजाने आपल्या बरोबर जी क्षत्रिय कुळे आणली होती तेच योद्धे जेथे कायमस्वरुपी राहिले आणि पुढे यांनी नांगर हाती धरून शेती करण्यास सुरुवात केली. वसई ते बोर्डीपर्यंतच्या या निसर्गसौदर्याने नटलेल्या भागात भाजीपाला, शेती हा या लोकांचा मुख्य व्यवसाय होऊन राहिला. “वाडीवाले” म्हणून वाडवळ असाही या शब्दाचा एक उगम सांगितला जातो. या समाजातील एक विद्वान श्री. अशोक सावे यांनी सर्वप्रथम या भाषेचा अभ्यास केला. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची अशी राजवाडेंची “महिकावतीची बखर” प्रसिद्ध आहे ज्यात या समाजाची माहिती मिळते.
आज असे लक्षात आले आहे की वाडवळीचा विस्तार आणि व्याप प्रचंड आहे. कारण वसई भागात बोलल्या जाणार्या वाडवळीवर पोर्तुगीज भाषेचा खुपच प्रभाव आहे. त्यातील काही शब्द अगदी माझ्या गावपर्यंतही पोहोचले आहेत. भोक या अर्थी वापरला जाणारा बुराक हा शब्द पोर्तुगीज भाषेतला आहे आणि तो आम्ही गावाकडे वापरतो. वसईकडच्या भागात बोलली जाणारी वाडवळी त्यावरील पोर्तुगीज भाषेच्या संस्कारामुळे वेगळी वाटते. शिवाय ख्रिश्चन बांधव बोलत असलेल्या वाडवळीवर वेगळ्या संस्कृतीच्या प्रभावामुळेही वेगळी छटा आहे. मात्र वसई काय किंवा केळवा माहिम चिंचणी काय, तसे आम्ही समुद्र किनार्यावरचे लोक. माझ्या गावी तर एक रस्ता ओलांडला की समुद्रच. पण किनारपट्टीपासून त्यामानाने दूर असलेल्या माकुणसार आणि त्या पट्ट्यांमधल्या गावामध्ये बोलल्या जाणार्या वाडवळीला आणखी वेगळी छटा आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या भागातील वाडवळी भाषेचे हेलसुद्धा वेगवेगळे आहेत.
त्यामुळे वाडवळीचा अभ्यास करायचा तर या भाषेवर झालेले इतर भाषांचे संस्कार तपासावे लागतील. तेथे सोशियोलिंग्विस्टीक्सचे सहाय्य घ्यावे लागेल. त्यातील निरनिराळे हेलकावे ही लक्षात घ्यावे लागतील. त्यानंतर भाषाविज्ञानातील फोनेटिक्स, मॉर्फॉलॉजी, सिंटॅक्स यांच्या माध्यमातूनही हा अभ्यास करावा लागेल. या शिवाय सिमँटिक्ससारख्या इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेतच ज्या लक्षात घेतल्याशिवाय या भाषेच्या व्याकरणाचा अभ्यास पूर्ण होणार नाही. वाडवळीचे हे काही मैलांवर बदलत जाणारे रुपडे तीवर झालेल्या विविध भाषासंस्कारांमुळे अतिशय देखणे झाले आहे. या विविधरंगी भाषेच्या असंख्य पैलुंचा अभ्यास करताना भाषाविज्ञानाचाही आपोआपच अभ्यास होऊन जाईल अशी माझी समजूत आहे. अशा भाषेचे संस्कार अगदी लहानपणापासून माझ्यावर झाले ही आता मला देवीची माझ्यावर झालेली मोठी कृपाच वाटते. आणि त्यामुळे वाडवळीचा अभ्यास हा माझ्यासाठी कधीही न आटणारा आनंदाचा झरा झाला आहे.
अभ्यासासाठी ही भाषा निवडताना माझ्यासाठी काही गोष्टी अनुकूल आहेत हे माझ्या लक्षात आले. ही भाषा मला नीट कळते आणि काही महिने प्रयत्न केल्यास मी पुन्हा बोलु शकेन असा विश्वास वाटतो ही एक जमेची बाजु. ज्या समाजाची ही भाषा आहे त्या वाडवळी समाजाचा मी एक घटक आहे ही दुसरी जमेची बाजु. आणि या भाषेच्या अभ्यासासाठी ज्या भाषेच्या व्याकरणाची (पाणिनी) आवश्यकता आहे त्या संस्कृतशी माझी तोंडओळख आहे, तिजवर माझे प्रेम आहे ही महत्त्वाची अशी तिसरी जमेची बाजु.
आता या जमेच्या बाजु जशा सांगितल्या तसे खाचखळगेही सांगावे लागतील. समाज काय आणि भाषा काय, यांचा अभ्यास करणार्याला अपरिहार्यपणे राजकारणाला तोंड द्यावं लागतं. भाषा ही थेट सत्ता आणि सामर्थ्याशी संबंधित अशी गोष्ट आहे. भाषिक सामर्थ्याचा निरनिराळ्या हेतूंसाठी वापर करणारी माणसं जगभर आढळतात. मला काही वेगळा अनुभव येईल असे मानण्याची आवश्यकता नाही. सुदैवाने माझी पार्श्वभूमी समाजशास्त्राची असल्याने या सार्याला तोंड देण्यासाठी मी तसा तयार आहे. थोडक्यात काय तर अभ्यासाला सुरुवात करताना बरीचशी उत्सुकता, थोडा सावधपणा आणि खुपखुप आनंद अशी सध्या परिस्थिती आहे.
अतुल ठाकुर
(लेखासोबत दिलेला फोटो हा मी एकदा आमच्या गावी चिंचणीला गेलो असताना काढला होता. हे गावचे शिवमंदिर असून श्रीमंत पेशवे चिमाजीअप्पा यांनी वसईच्या स्वारीच्यावेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते.)
वाडवळी भाषा आणि लिंग्विस्टीक्स (भाषाविज्ञान)
5 Comments
Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with a few pics to drive the message home a little bit, but instead of that, this is fantastic blog. A great read. I’ll definitely be back.
Super easy to navigate and the customer support is actually helpful. Definitely a top-tier choice for gamers. Give pkbuji999 a try!
Five stars for the payout speed. I got my winnings much faster than I expected. krwin999 is definitely a trustworthy choice.
The excitement here is on another level. Great selection of games and the mobile version works like a charm. Check out pkbetmgm now.
Great website. Lots of helpful info here. I’m sending it to several friends ans also sharing in delicious. And of course, thanks in your effort!