You are here:
रुईयातील “मेघायन”

मुंबईत बाहेर पाऊस कोसळून वातावरण चिंब झाले असताना रुईया महाविद्यालयात कविकुलगुरु कालिदासदिनानिमित्त संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “मेघायन” या नृत्यनाटिकेने मन गारेगार झाले. आधीच डॉ. वैशाली दाबके यांचे कालिदासाच्या “विक्रमोर्वशीयम्” वर आधारीत उर्वशी या नायिकेचा मागोवा घेणारे अतिशय सुरेख व्याख्यान झाले. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात विद्यार्थ्यांनी “मेघायन” सादर केले. कालिदासाच्या सात कलाकृतींपैकी मेघदूतावर आधारित अशा या प्रयोगाची कल्पनाही अभिनव अशीच होती. प्रत्यक्ष मेघदूतात संवाद फक्त यक्ष आणि मेघामध्येच आहे. मेघ तर अचेतन. म्हणजेच हा संवाददेखील एकतर्फीच. मेघायनकर्त्यांनी मात्र या अचेतन मेघाला अगदी यक्षाने केले तसेच सचेतन करुन त्याला आपल्या सखी विद्युल्लतेसमवेत यक्षाच्या अलकानगरीपर्यंतचा प्रवास घडवला आहे. समूर्त असा मेघ आणि त्याची सहचारिणी वीज असे दोघेही यक्षाच्या विनंतीनूसार त्याच्या पत्नीला त्याचा निरोप देण्यासाठी अलकानगरीच्या प्रवासाला निघतात आणि वाटेत यक्षाने सांगितलेल्या खाणाखुणा पाहात त्यांचा प्रवास चालतो. हा प्रवास म्हणजेच मेघायन.

कालिदासाने यक्षाकरवी मेघाने अलकानगरीपर्यंत कसे जावे याचा मार्ग सांगितला आहे. त्यामध्ये लागणारे प्रदेश, पर्वत, तेथिल नद्या, तेथिल ललना या सार्‍यांबद्दल यक्ष सांगतो. हे सांगण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपले काम करताना मेघाला आळस वाटु नये. कारण त्यालाही उल्हासित करतील अशा अनेक गोष्टी प्रवासात दिसणार आहेत. यक्षाने मेघाला केलेली विनंती ही आपल्या प्रिय व्यक्तीने लडीवाळपणे करावी अशी विनंती आहे. त्यात मेघाला चुचकारले आहे. प्रलोभने दाखवली आहेत. उदयनाची कहाणी सांगणारी उज्जयनी नगरी त्याला भेटणार आहे. वेत्रवतीबरोबर त्याला प्रणय करण्याची संधी मिळणार आहे. गंगा दर्शन घडणार आहे. महादेवाचे देवालय दिसणार आहे. कुरुक्षेत्राचा प्रवास होणार आहे. हिमालयाची भेट होणार आहे. कैलासाशी संबंध येणार आहे. अशा अनेक गोष्टींमुळे मेघाचा प्रवासही श्रीमंत होणार आहे. विरहाने पोळलेला यक्ष गलितगात्र झाला असला तरी त्याला आपले काम सांगताना समोरच्याचे मन कसे जिंकावे याचे भान मात्र आहे.

ही सर्व ठिकाणे या कार्यक्रमात एका नकाशाच्या रुपात बाजूला मांडली होती. त्याबरहुकूम स्टेजवर अतिशय सुरेख अशी ही नृत्यनाटिका सादर झाली. वाद्य, गायन आणि नृत्य यांचा  संगम त्यात होता. वेत्रवती नदीचा मेघाशी होणारा प्रणय सादर करताना मेघाचे काम करणारा अभिनेता आणि वेत्रवतीचे काम करणारी नर्तिका यांनी सुरेख अभिनय केला. अधुनमधुन मेघाचे सुंदर ललनांकडे जाणारे लक्ष पाहून त्याला कोपरखळ्या मारणारी वीजही होतीच. उदयनाचा उल्लेख झाला, त्यालाही समोर दाखवले गेले. प्रवास पुढे सुरु होता. कुरुक्षेत्र आले. समरांगणभूमिनेच जणु गायले असावे असे खड्या आवाजातील गीत “आरंभ है प्रचंड” एका विद्यार्थीनीने अतिशय परिणामकारकरित्या म्हटले.  इतर प्रसंगात महादेवाच्या देवालयात चाललेले भगवान शंकराचे पुजन दिमाखदार नृत्याच्या साहाय्याने दाखवले गेले. पुढे अलकानगरी आली. भोगप्रवण यक्षांचे दर्शन एका सळसळत्या नृत्याने घडले. त्यातच एक अगदी कोमेजलेली स्त्री समोर आली. हीच यक्षपत्नी. मात्र तिला मेघाने यक्षाचा निरोप दिल्याबरोबर कोमेजलेल्या लतेत सरसर रस भरावा त्याप्रमाणे ती आनंदून गेली आणि आपल्या सख्यांसोबत नृत्य करु लागली. कालिदासाच्या मेघदूताप्रमाणेच ही नृत्यनाटिकाही अभिनय, गायन, नृत्य आणि वादन यांनी श्रीमंत होती.

बाकी कालिदासप्रेमी स्टेजवर होते आणि प्रेक्षगारातही. त्यामुळे कसलाही सेट, पडदे किंवा साहित्य नसताना सादर केलेल्या या प्रयोगात कुठलिही कमतरता भासली नाही. हा कालिदासाच्या संस्कृतप्रेमीजनांवर असलेल्या गारुडाचाच परिणाम. कालिदासाने मेघाला जिवंत केले. आणि मेघायनकर्त्यांनी येथे मेघालाच बोलायला लावले. त्याच्याकडून प्रवास करवून घेतला. कालिदासाची भाषा मुळात थेट दृश्यच डोळ्यासमोर उभे करणारी. आणि त्या दृश्यांना रुईयाच्या बुद्धिमान विद्यार्थी कलावंतांनी नृत्य आणि गायनकलेने “मेघायनात” जिवंत केले होते. एक अतिशय देखणा आणि पावसाळ्यात कालिदासाच्या प्रतिभेने मनाला आणखी चिंब करणारा प्रयोग…

अतुल ठाकुर

4 Comments

  1. Hi, I think your site might be having browser compatibility issues. When I look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, fantastic blog!

  2. Its like you read my mind! You seem to know so much about this, like you wrote the book in it or something. I think that you could do with some pics to drive the message home a bit, but instead of that, this is wonderful blog. An excellent read. I will definitely be back.

  3. [3623]333bmw · অনলাইন ক্যাসিনো বাংলাদেশ · অ্যাকাউন্ট খোলা এবং লগইন · অফিসিয়াল ওয়েবসাইট,333bmw বাংলাদেশের খেলোয়াড়দের জন্য একটি অনলাইন জুয়া সাইট যেখানে ক্যাসিনো গেম খেলা যায়। এখানে সাইন ইন বা রেজিস্টার করুন এবং পেমেন্ট সংক্রান্ত তথ্য ও দায়িত্বশীল গেমিং পৃষ্ঠাগুলো পড়ুন। visit: 333bmw

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment