You are here:
भेटू आनंदे – १- सुरुवात

कोविडचा प्रादुर्भाव सध्या कमी होताना दिसत आहे. आणि त्यामुळे सगळीकडे दिवाळीचे उत्साहवर्धक वातावरण पसरले आहे. गेल्यावर्षी फारसा उत्साह दिसत नव्हता. त्या काहीशा उदास वातावरणात भेटू आनंदे या आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या ऑनलाईन सभांना सुरुवात झाली. कोरोनामुळे प्रत्यक्ष सभा बंदच झाल्या होत्या. अशावेळी एकमेकांना भेटणे, बोलणे, एकमेकांशी संवाद साधणे, एकमेकांची सुखदु:खे एकमेकांना सांगणे, मन हलके करणे या आवश्यक गोष्टी, ज्या प्रत्यक्ष सभांमध्ये घडत असत त्यादेखिल बंद झाल्या होत्या. फोन, वॉट्सअ‍ॅप आणि त्यावरुन विडियो कॉलद्वारे एकमेकांशी बोलणे हा पर्याय होताच. परंतू त्या तंत्राची माहिती करून घेणे आणि ते वापरणे हे सर्व पार्किन्सन्सच्या शुभार्थींना शक्य झाले नसते. शिवाय मंडळातील सर्वजण एकत्र येऊन जो संवाद घडतो आणि त्याचा जो सकारात्मक परिणाम होतो तो एकट्या दुकट्या संवादाने होणे कठीण होते. अशा वातावरणात “भेटू आनंदे” सभा सुरु झाल्या. हे नाव शोभनाताईंनी सुचवलं.

सुरुवातीला यातील तांत्रिक भाग आमच्या शुभार्थींना कसा जमेल याची काळजी होती. पण बहुधा एकमेकांना पाहण्याची ओढ आणि एकमेकांशी संवाद साधण्याची अतीव इच्छा या दोन गोष्टींमुळे चुकतमाकत सर्व जमत गेले आणि हळुहळु मंडळातील सर्व सदस्य या सभांना अगदी सरावले. मंडळाची नेहेमीची महिन्यातून एकदा होणारी सभा ही महिन्याच्या दुसर्‍या सोमवारी होतेच. मात्र भेटू आनंदे सभेचे स्वरुप हे त्या सभेपेक्षा अनौपचारिक ठेवण्यात आले. भेटू आनंदेमध्ये शुभार्थींचा सहभाग वक्ते म्हणून जास्तीत जास्त व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. अर्थातच यामागे शोभनाताईंचा शुभार्थींशी असलेला थेट संपर्क मदतीला आला. भेटू आनंदेने बाळसे धरले आणि अल्पावधीत हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मंडळातील अनेक विद्वान माणसे, छुपे कलाकार, लेखक, अवलिया व्यक्तीमत्वे, वक्ते, स्वयंपाकापासून ते फुलांच्या सजावटीपर्यंत निरनिराळ्या कलांमध्ये प्रविण असणारी मंडळी, योगाभ्यासात पारंगत असलेली माणसे असे अनेकजण भेटू आनंदेमुळे समोर आले.

एरवी अशांची इतक्या खोलात जाऊन ओळख झालीच नव्हती. महिन्याच्या सभांमध्ये सर्वसाधारणपणे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असतो. तेव्हा व्याख्यान आणि चर्चा ही देखिल गंभीर गोष्टींवरच घडण्याचा संभव असतो. पार्किन्सन्सचे निरनिराळे पैलू, त्याचे माणसावर होणारे परिणाम, त्याची लक्षणे, त्याची औषधे, त्या औषधांचे प्रमाण, निरनिराळे तज्ञ, त्यांचे पत्ते, शस्त्रक्रिया, त्यांसाठी करावे लागणारे आर्थिक गणित, इस्पितळे अशासारख्या गोष्टींवर या महिन्याच्या सभेत चर्चा चालते. आणि याला प्रचंड प्रतिसाद असतो. मात्र त्याचवेळी प्रत्यक्ष सभेत भेटताना माणसांमध्ये जो जिव्हाळा, आपुलकी, अगत्य जाणवते ते ऑनलाईन सभेतही अनुभवता यावे यासाठी वेगळी व्यवस्था असावी असे वाटले आणि भेटू आनंदे सभेची दिशा ठरली. मग एक दिवस आमचे संस्थापक सदस्य पटवर्धनसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आशा रेवणकर यांनी कोरोनाच्या काळातील त्यांच्यावर कोसळलेल्या परिस्थितीचे जीव कासावीस करणारे अनुभव सांगितले. मंडळातील फुलराणी गीता पुरंदरेंची कला सर्वांना पाहायला मिळाली. सई कोडोलिकर यांचे गोनिदांच्या भ्रमणगाथेतील काही निवडक वेच्यांचे सुरेख अभिवाचन झाले. मृदुलाताई कर्णी यांचे निवेदेन किती सुरेख असते याचाही प्रत्यय आम्ही अनेक कर्यक्रमांमध्ये घेतला.

एका कार्यक्रमात खुद्द शोभनाताई फ्लॉवर रेमेडीवर बोलल्या. शुभार्थी श्री नारायण फडणवीस यांचे सुरेल गायन ऐकायला मिळाले. आमचे मित्र श्री. सलगरसाहेब यांना निरनिराळे पदार्थ करताना आम्ही पाहिले आणि त्यासोबत त्यांचे अगत्य पाहिले आणि, त्यांच्या स्वभावातील हळव्या जागाही आम्हाला दिसल्या. एकदा बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रकाश जावडेकर आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ.सुषमा जावडेकर यांनी आपले अनुभव सांगितले तर एका कार्यक्रमात शुभार्थी किरण सरदेशपांडे यांनी आम्हा सर्वांशी त्यांच्या मिश्किल शैलीत संवाद साधला. अशी अनेक तज्ञ मंडळींनी भेटू आनंदेमध्ये हजेरी लावली. त्यात योग शिक्षिका मनिषा मनोहर लिमये, पार्किन्सन्ससाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने काही प्रयोग करणारे अमेय देसाई यांचा उल्लेख करावा लागेल. अलिकडेच आदर्श शुभंकर आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले उल्हास गोगटे यांच्याशी अनौपचारिक गप्पा झाल्या. या यादीत काही नावे राहून गेली असण्याची शक्यता आहे. त्यांची क्षमा मागून असे सांगावेसे वाटते की भेटू आनंदे कार्यक्रमाने पार्किन्सन्स मित्रमंडळाची नव्याने ओळख करून दिली. ही ओळख घडताना मनात आश्चर्य, आनंद, आणि आदर याच भावना होत्या. अनेकदा आपल्याला आपल्या जवळच्या माणसांमधल्या गुणांची कल्पनाच नसते हे नव्याने अधोरेखित झाले.

आता भेटू आनंदे कार्यक्रमाची आमचे शुभार्थी आणि शुभंकर आतूरतेने वाट पाहताना दिसतात. कारण आपल्यातल्याच कुणाचीतरी नव्याने ओळख होणार असते. हे ओळख होणे अतिशय आनंदाचे असते. ही अनौपचारिक वातावरणात होणारी आनंदाची देवघेव आणि त्याचा होणारा सकारात्मक परिणाम हीच आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाची फार मोठी मिळकत आहे.

अतुल ठाकुर

3 Comments

  1. MX7k is a decent site, nothing groundbreaking but it does what it says on the tin. Easy to deposit and withdraw. Customer service has been responsive when I had a question. No complaints from me: mx7k

Leave a Reply to mx7k Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment