राजेश खन्ना गाण्याचं सोनं करतो याबद्दल दुमत नसावे. अर्थात मी त्याच्या सोनेरी काळाबद्दल बोलतोय. गंमत म्हणजे त्याला नृत्याचे अंग नव्हते. तरीही त्याच्या विशिष्ट स्टेप्स खुप लोकप्रिय झाल्या. इतक्या की राजेश खन्नाची नक्कल करणारे त्या पद्धतीने नाचून दाखवतात. बाकी काकाचे ते तसे नाचणेही मस्त वाटते. त्याच्यावर प्रेम करणारी माणसे त्याचे नाचणे, त्याचे हातवारे, त्याचे काहीवेळा काही अक्षरे लांबवत बोलणे यावरही खुप प्रेम करतात. पावसाचे दिवस आहेत. त्यादिवशी गाणी ऐकत, पाहात असताना मुद्दाम १९७४ सालच्या “अजनबी” सिनेमातील “भीगी भीगी रातों में” लावले आणि घरातल्या घरात पावसाने चिंब झाल्यासारखे वाटले.
गाण्यात सोबतीला झीनत आहे. आणि पाऊस. आणि तिने घातलेला गुलाबी ड्रेस. यावर हिन्दी चित्रपटात मुरलेल्या चाणाक्ष प्रेक्षकांना वेगळ्याने काही सांगण्याची गरज नाही. ओलेती झीनत दिसलीय सुरेख. बाकी हा माझा मागासलेपणा असेल कदाचित. पण मला या नायिकांबद्दल खुप प्रेम आहे. झीनत काय, हेलन काय, यांनी शृंगार पडद्यावर रंगवला पण त्यांना पाहून कधीही किळस वाटली नाही. उत्तान हावभाव आणि त्यामुळे निर्माण होणारी शिसारी ही आताच्या काळातल्या “आयटेम” साँग्जची देणगी आहे अशी माझी समजूत आहे. झीनतच्या शरीराकडेच जास्त पाहिले गेले आणि तिच्यातल्या अत्यंत गुणवान अशा अभिनेत्रीकडे दुर्लक्ष झाले असेही मला वाटते.
गाण्याच्या सुरुवातीलाच विजेच्या कडकडाटाने घाबरून झीनत राजेशखन्नाला घट्ट मिठी मारते आणि पंचमदाची सुरेख धून सुरु होते. नायकाला पावसात भिजायचे आहे. खरं तर तिलाही त्याच्याबरोबर पावसाचा आनंद घ्यायचाय. पण विजेची भीती वाटते. गडगडाटाची भीती वाटते. आणि संकोचदेखिल वाटतो आहे. पण तो मात्र खुलेपणाने बाहेर येऊन कोसळत्या पावसात उभा राहिल्यावर ती देखिल मागे सरत नाही. कारण पावसाने वस्त्रे अंगाला चिकटून तिचे सौंदर्य अधोरेखित झाले आहे याची तिला कल्पना आहे. त्यामुळे तो आपल्यासाठी आणखी वेडा होणार आहे हेही ती चतूर रमणी जाणून आहे. “अंबर खेले होली ऊईमा भीगे मेरी चोली, हमजोली…” असे शब्द आनंद बक्षींनी उगाचच लिहिलेले नाहीत.
राजेश खन्नाचं देखणेपण आणि त्याने पावसात मनमुक्तपणे केलेला अभिनय आनंद देऊन जातो. तो त्याच्या विशिष्ट पद्धतीने पावसाचा जूण मनमुराद आनंद घेत आपल्या नायिकेवरोबर नाचलाय. पाहिलं की असं वाटतं शेवटी कसदार अभिनय असणे हेच महत्त्वाचे. बाकी नृत्य, अॅक्शन, शरीरसौष्ठव या सार्यातलं नैपूण्य या नंतरच्या गोष्टी. त्यातच किशोरच्या परकायाप्रवेशाचा अनुभव देणार्या आवाजाची जोड आहे. त्यामुळे गाण्याचा परिणाम आणखी गडद होतो. झीनतला चपखल बसेल असा आवाज लताने वापरला आहेच. पण त्यात पावसात भिजलेली तरुणी गात आहे अशी अनुभूती आणणे हे फक्त एक लताच करु जाणे. नायिका तर ओलेती आहेच पण तीचा आवाजही पावसाने जणु चिंब झाला आहे असेच वाटते.
गाण्याबद्दल विचार करताना देवलांच्या संगीत मृच्छकटिकची आठवण झाली.
आणि पुढील ओळी आठवल्या.
तेची पुरुष दैवाचे | धन्य धन्य जगिं साचे ||
अंगे भिजली जलधारांनी | ऐशा ललना स्वये येऊनी |
देती आलिंगन ज्यां धावुनि | थोर भाग्य त्यांचे ||
गाण्याचा आस्वाद घेताना दिसतं की या गाण्यातल्या नायकाला ते थोर भाग्य लाभले आहे.
अतुल ठाकुर
भीगी भीगी रातों में…
3 Comments
Alright, so na99club’s got a decent vibe. I mean, it’s not the best I’ve seen, but it’s not the worst either. Solid enough to give it a shot, especially if you’re bored and looking for something new. na99club
So I used novibetlogin to get into NoviBet… process was smooth, no issues. I’d recommend sticking with reliable sites or you’d have issues bruh. Here is the proper link though novibetlogin to make sure you get in the right spot.
I gave i88casino a whirl the other night. Not gonna lie, some of the graphics were pretty slick. Payouts were decent too. Take a look: i88casino.