अनेकदा आपण फारशा अपेक्षा न ठेवता काही गोष्टी फक्त आपल्या उद्देश्यपूर्ती करता शिकायला जातो आणि कसलिही कल्पना नसताना आपल्यासमोर निरनिराळ्या रत्नांनी भरलेली अलिबाबाची गुहा उघडते. मुंबई विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागाचा मला आलेला अतिशय सुखद अनुभव हा असा आहे. संस्कृतचा अभ्यास सुरु असताना लिंग्विस्टीक्सबद्दल जाणून घेण्याची गरज भासू लागली. भाषेचा सर्व अंगांनी अभ्यास करावा आणि त्या योगे एखाद्या संकल्पनेचा निरनिराळ्या दृष्टीकोणातून विचार करता यावा इतकाच उद्देश ठेवून मी एक दिवस लिंग्विस्टीक्स विभाग गाठला. आज मी हे निश्चितपणे म्हणू शकतो की हा एक अचूक निर्णय ठरला. कारण या विभागातून मला भरभरून मिळाले. माझीच झोळी तोकडी पडत होती हे माझ्या लक्षात आले होते. यानंतरचा या विभागातील आजवरचा प्रवास हा फक्त आनंदाचाच ठरला.
आम्ही तेथे भाषेचे अनेक पैलू अभ्यासले. Phonetics, Phonology, Morphology, Syntax, Semantics, Pragmatics, Sociolinguistics अशा अनेक अंगांनी आम्हाला भाषेचा अभ्यास करण्यास शिकवले गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या बोली भाषांवर, मातृभाषांवर काम करण्यास प्रोत्साहन दिले जात होते. त्यामुळे मी बरेचदा वाडवळी भाषेचा आधार घेऊन काम करीत होतो. या शिवाय कोकणी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विभागाने गोव्यात फिल्ड ट्रिप काढली होती. तेथे घराघरात जायचे प्रश्न विचारायचे, भाषेबद्दल माहिती जमवायची, त्या भाषेचा भाषाशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करायचा हा एक श्रीमंत करणारा अनुभव होता. या व्यतिरिक्त विभागाने अनेक सेमिनार्स, वर्कशॉप्स, तज्ञांची व्याख्याने ठेवली होतीच. एकंदर अभ्यासक्रम भरगच्च होता. गंमत म्हणजे हे सारे सांभाळत होते फक्त तीन प्राध्यापक. यापूर्वी प्राध्यापकांचे काही कडवट अनुभव गाठीशी असल्याने मी या बाबत जरा सावधच असतो पण येथेही या विभागाने चांगल्या अर्थाने धक्का दिला.
या आकाराने छोट्या असलेल्या विभागाचे आमच्यावेळी प्रमुख होते डॉ. अविनाश पांडे सर. अविनाश सरांनी आम्हाला Semantics आणि Pragamatics शिकवले. इतका गहन आणि तांत्रिक विषय हसतखेळत शिकवून समजून देण्याची दुर्मिळ हातोटी त्यांच्याकडे आहे. छोटी छोटी उदाहरणं देत विनोदाची पखरण करीत त्यांचे शिकवणे चालते. शिवाय ते पारंपरिक पद्धतीपेक्षा अगदी वेगळा विचार करून काही गोष्टी शिकवतात. त्यामुळे विषय नुसताच कळतो असे नव्हे तर त्यात गोडी निर्माण होऊन पुढे त्याचा अभ्यास करण्याची इच्छाही निर्माण होते. आम्हाला Phonetics, morphology आणि syntax शिकवले डॉ. रेणुका ओझरकर यांनी. काटेकोरपणा या शब्दात मला त्यांच्या शिकवण्याचे वर्णन करता येईल. त्यांच्या तासाला बेसावध राहून चालणार नाही. विषयाचे प्रचंड ज्ञान आणि निरनिराळ्या भाषांच्या उदाहरणाने मुद्दा समजावून देण्याची पद्धत हे त्यांच्या शिकवण्याचे वैशिष्ट्य. तांत्रिक विषय मला किचकट वाटत. मात्र रेणुकामॅडममुळे मी त्यातूनही सुखरुप पार पडलो. आज भाषेतील तांत्रिक संकल्पना समोर आल्या की माझ्या समोर रेणुका मॅडमचा आदर्श असतो. वाटतं त्यांच्यासारखी या विषयावर आपली हुकुमत असायला हवी.
त्यानंतर आम्हाला sociolinguistics शिकवलं ते अर्चना थूल मॅडमनी. माझ्या समाजशास्त्राच्या पार्श्वभूमीमुळे या विषयावर माझे विशेष प्रेम. अर्चनामॅडमनी या विषयाचे असंख्य पैलू दाखवले. या विषयाचा अफाट आवाका मर्यादित तासांच्या अभ्यासक्रमात मांडणे सोपे नव्हते. पण ते त्यांनी यशस्वीपणे करून दाखवले. शिकवण्याच्या सुरेख पद्धतीव्यतिरिक्त या तिन्ही प्राध्यापकांचं मला जाणवलेलं विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे आम्ही कधीही त्यांना संपर्क करून त्यांचा सल्ला विचारु शकत होतो. आम्हाला त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याला कसलाही मज्जाव नव्हता. आपापल्या विषयात तज्ञ असूनही जमिनीवर पाय घट्ट असलेले विद्वान पाहण्याची मला सवय नसल्याने मी या विभागात रुळून गेलो. पुढे तेथून अभ्यासक्रम संपवून बाहेर पडल्यावर देखील विभागाशी संपर्क ठेवला. काल रेणुका मॅडमचे नवीन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाबद्दलचे मेल आले आणि या साऱ्या आठवणी ताज्या झाल्या. भाषाशास्त्रातील अलिबाबाच्या गुहेचा “तिळा उघड” हा मंत्र या विभागाने मला दिला. त्यासाठी या विभागाबद्दल मला अतिशय कृतज्ञता वाटते.
अतुल ठाकुर
(या विभागाची संपूर्ण माहिती https://www.mumbailinguisticcircle.com/ या संकेतस्थळावर मिळू शकेल)
भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, एक समृद्ध अनुभव
3 Comments
Browsing 911betbr.net. Not bad if you’re into sports betting. Seems like they got solid odds on a few things. Give it a look 911betbr
Heard some buzz about 9apisocasino. Apparently they got some exclusive slots you can’t find anywhere else. Might be worth checking out for something new. Give it a shot 9apisocasino
So I just checked out brazino777online.net and it’s got a real authentic vibe. The graphics are cool and the bonuses looks great. See for yourself brazino777online