गुलजारच्या प्रतिभेबद्दल माझ्यासारख्याने काय बोलावं? पण त्याच्या प्रतिभेइतकीच त्याच्यातील प्रयोगशीलताही मनाला खुप भावते. निदान तिन गाणी मला अशी माहित आहेत ज्यात त्याने इतर कवींच्या ओळी घेऊन जबरदस्त गीतं दिली आहेत. “नमकीन” मधील “राहोंपे रहते है, यादोंपे बसर करते है” या सुंदर गाण्याच्या शेवटचे “खुश रहो अहले वतन, हम तो सफर करते है” हे सुप्रसिद्ध क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचे आहे. “मौसम” मधील “दिल ढूंढता है फिर वोही फुरसत के रातदिन” या ओळी चक्क गालिबच्या आहेत. आणि “जिहाले मिस्किन माकुन बा रंजिश” अमिर खुस्रोचे आहे. दुधात साखर मिसळून आधिच मधूर असलेल्या दुधाचे माधुर्य आणखी वाढावे अशी किमया या ओळींनी केली आहे हे नक्की. पैकी या लेखात आज “जिहाले मिस्किन बद्दल बोलायचं आहे.
या गाण्याचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल हे मला स्त्यांच्या सुरेल संगीताव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीसाठी ग्रेट वाटतात. या जोडीने अगदी “दोस्ती”,”पारसमणी”पासुन ते अलिकडल्या “गुलामी” पर्यंत अनेक सुरेल गाणी दिली. सतत, सर्वकाळ हिन्दी चित्रपटसृष्टीत टिकुन राहणं हे सोपं काम नाही. वर्षाला एखाद दुसरा चित्रपट एक्सक्लुजिवली करुन त्यात उत्तम संगीत देणे वेगळे आणि नव्या जुन्या सर्व संगीतकारांच्या स्पर्धेत नुसतेच टिकणे नव्हे तर त्यांना पुरुन उरणे देखिल वेगळेच. असे आणखि उदाहरण “मै शायर बदनाम” सारखे गीत लिहिणार्या आनंद बक्षीचे. पण तो वेगळा विषय आहे. “गुलामी” मधील “जिहाले मिस्किन मा कुन बा रंजीश, बाहाले हिजरा बेचारा दिल है”(माझ्याकडे असे परक्या नजरेने पाहु नकोस्….प्रियकराच्या वियोगाने माझे बिचारे हृदय आधीच पोळलेले आहे, त्या जखमा अजुनही ताज्या आहेत) हे माझे आवडते गाणे. गुलजारने पहिल्या दोन ओळी अमीर खुस्रोच्या काव्यातुन घेऊन त्यावर आपले गीत लिहिले आहे. एका विशिष्ठ ठेक्यात बांधलेल्या या गीताला एलपीने लोकसंगीताची आठवण यावी असा साज चढवला आहे.
“गुलामी” चित्रपटच सुरेख होता. गावातील जाती व्यवस्थेवर आधारीत सशक्त कथा आणि त्याला राजस्थानमधील वाळवंटाची कठोर आणि रोखठोक पार्श्वभूमी. त्यातून जेपी दत्ता म्हणजे वाळवंट कुशलतेने चित्रित करणारा दिग्दर्शक. या गीतात दिसतात ती खेडवळ माणसे. अस्सल राजस्थानी वेशात सुरेख दिसणारी अनीता राज. आपल्या चालीत देखिल फौजीचा रांगडेपणा उभा करणारा मिथुन आणि गाणे सुरु झाल्यावर त्याच्या स्वरांनी न राहवुन त्यावर झुलणारी नर्तकी. येथे मिथून चक्रवर्ती या वेगळ्याच असलेल्या रसायनाबद्दल बोलल्याशिवाय राहवत नाही. हा माणुस मृगयासारखा कलात्म चित्रपट करतो. सुरक्षा सारख्या देमार चित्रपटात गममास्टर जी नाईन म्हणून आला तरी त्याच्यावर प्रेक्षक फिदा असतात. आणि अग्निपथमधे तो नारळपाणीवाला म्हणून बच्चनलाही टक्कर देतो. सायंकाळच्या वेळी राजस्थानमधील वातावरणाच्या पार्श्वभुमीवर लताच्या स्वरात सुरेल ललकारी सुरु होते. आणि ती बंजारा स्त्री त्यावर डोलु लागते. त्यानंतर अगदी तिच्याच तालात रांगडा फौजी मिथुन देखिल दोन पावले टाकुन जातो. बाकी मिथूनचे ते डफ स्मोर दुसर्याकडे फेकून अचानक तालावर नाचायला सुरुवात करणे अगदी आवर्जून बघण्याजोगे. ज्यांना सिनेमागृहात प्रेक्षक नक्की कधी बेभान होऊन शिट्ट्या वाजवतात हे पाहायचं असेल त्यानी हा काही सेकंदाचाच सीन नक्की पहावा. मला नेहेमी वाटतं या गाण्यात मिथून नाचायला लागल्यावर प्रेक्षकांपैकी अनेकांना उठून नाचावसं वाटलं असेल. मात्र अनीता राजचा चेहरा अजुनही गंभीरच असतो. शेवटी “तुम्हारे सीनेसे उठता धुंवा, हमारे दिलसे गुजर रहा है” अशी तिच्या प्रियकराने तिला खात्री पटवुन दिल्यावर तिची कळी खुलते. त्यातही मिथूनचे “कोई शक?” तर भन्नाटच.
लताचा आवाज या सायंकाळच्या कातर वेळेला एक वेगळेच परिमाण देतो. “वो आके पहलु मै ऐसे बैठे के शाम रंगीन हो गयी है” एखाद्या बंजारा स्त्रीचा अगदी मोकळा ढाकळा आवाज ऐकल्यासारखे वाटते. अगदी असाच अनुभव पुढे अनेक वर्षानी “रुदाली” आणि “लेकीन” मध्ये देखिल आला. शब्बीरकुमारने गाणं नीट पेललं आहे. त्याला फार गळ्यात पडल्याप्रमाणे लाडे लाडे गाऊ दिलं नाही हे आपलं सुदैवच. पण हे गाणं रफीसाठीच होतं असं वाटल्याशिवाय राहवत नाही. मला तर हटकुन “निसुलताना रे” ची आठवण होते. बाकी लताला गाण्यात ऐकताना अनेक वर्षांची तपश्चर्या आणि निसर्गदत्त देणगी यांचा संगम यामुळे गाताना जी सहजता येते तिचा होतो. बंजारा स्त्रीचे मोकळे गाणे आणि नृत्य करणे, आसपासचा तितकाच मोकळा निसर्ग याला लताच्या सहतेने आणखी वेगळ्या उंचीवर नेले आहे. उत्तम संगीत, सुरेख गीत, त्याला पार्श्वगायकांनी दिलेला सुरेल स्वर, कलाकारांनी दिलेली अप्रतिम साथ, हे सारं गारुड समर्थपणे चित्रित करणारा दिग्दर्शक असा अपुर्व योग या गाण्यात जुळुन आला आहे. हे गाणं कुठेही सुरु झालं तरी पाय क्षणभर थबकतात. लताचे स्वर मोहीनी घालतात. आणि आपणही हळुहळु गुणगुणु लागतो..”जरा जरासी खिली तबियत जरासी जरासी गमगीन हो गयी है…
अतुल ठाकुर
#lata #atulthakur
जिहाले मिस्किन माकुन बा रंजिश…
3 Comments
Heard about alibaba88 slot game on bet88goldenhour.com. Gave it a spin and it’s actually kinda fun! Pretty colorful and the bonus rounds kept me hooked. Give it a try!: alibaba88 slot game
Jilibetagent is doing its thang! Got hooked up with a sweet deal through them. Easy to navigate and they were super helpful. Definitely recommended if you’re looking for something reliable. Check this out: jilibetagent
Alright, gave okkingbet a look and the selection of games is pretty impressive. Found some new favorites already. Worth checking out if you’re looking to switch things up. Find out more: okkingbet