You are here:
एक आगळावेगळा प्रोत्साहन सोहळा…

एखाद्या कार्यक्रमाला गेल्यावर स्टेजवर असणारी सर्व मंडळी आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तबगारी केलेली असणं हा एक दुर्मिळ योगायोग. त्या दिवशी उज्वलाताईंनी सरस्वतीदेवी विद्याविकास ट्रस्टच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि तेथे हा योग जुळून आला. उज्वलाताई या माझ्या संस्कृतच्या शिक्षिका. संस्कृत व्याकरणाची भीती त्यांनी माझ्या मनातून घालवली आणि या देववाणीबद्दल गोडी निर्माण केली म्हणून माझा एक दंडवत नेहेमी त्यांना असतोच. आजही संस्कृतमध्ये मी “ढ” च आहे. पण प्रयत्न केल्यास ही भाषा जाणून घेऊ शकेन असा आत्मविश्वास उज्वलाताईंनी मला दिला.

हॉलवर गेलो, काहीवेळाने कार्यक्रम सुरु झाला. तर तेथे होते डॉ. निलेश जोशी. संस्कृत आणि भाषाविज्ञान या विषयातील नामांकित विद्वान. त्यानंतर आल्या होत्या डॉ. मंजुषा कुलकर्णी. पुन्हा संस्कृतमधील पंडिता. अध्यक्षस्थानी होते श्री. निलेश देसाई. समाजकार्य शास्त्रातील उच्च विद्याविभुषित आणि मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात काम करणारे कार्यकर्ते. या जिल्ह्यात मी माझ्या एमेच्यावेळी जाऊन आलो होतो. म्हणून याही क्षेत्राबद्दल आपुलकी. शिवाय समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून जवळीक. शिवाय स्टेजवर बसल्या होत्या तरुणांनाही लाजवणाऱ्या ऐंशी वर्षाच्या श्रीमती विणाताई गोडबोले. ज्यांनी पीनकोडचा शोध लावला त्या आर.बी. बेलणकर यांच्या या कन्या.त्याही  पुन्हा संस्कृत पंडिता. देववाणी मंदिर संस्थेच्या अध्यक्षा आणि गीर्वाणसुधासारख्या दर्जेदार त्रैमासिकाच्या संपादिका.

अशी दणदणीत माणसं स्टेजवर आल्यावर मी अगदी गारेगार झालो होतो. आता फक्त एकच आवडीचे क्षेत्र असे उरले होते ते म्हणजे संगीत ज्याच्याशी थेट संबंध असलेले अजुनतरी कुणी स्टेजवर दिसत नव्हते. जणु त्याची पुर्तता करण्यासाठीच की काय महदाश्चर्य म्हणजे श्री. आप्पा वढावकर, या ज्येष्ठ संगीत संयोजकांचे आगमन झाले आणि चित्र पुर्ण झाले. या कार्यक्रमात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पण आर्थिक अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि निरनिराळी समाजोपयोगी कामे करणाऱ्या संस्थांना मदत नव्हे तर प्रोत्साहन दिले जाते. हे प्रोत्साहन धनादेशाच्या स्वरुपात असते. कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या उज्वलाताईंनी आधीच ही मदत नव्हे तर प्रोत्साहन आहे हे सांगून संस्थेची भूमिका स्पष्ट केली. मदत शब्दामागे दाता आणि याचकाची भूमिका असते. येथे तर परिस्थितीशी झुंज घेणारे खंदे वीर आणि संस्था होत्या. त्यांना प्रोत्साहनच दिले जाते. अशांसाठी मदत हा शब्द योग्य नव्हताच.

तेथे कोण आले नाही? या संस्थेच्या प्रोत्साहनातून सीए झालेला विद्यार्थी होता, इंजिनियरींग केलेला विद्यार्थी होता, सागर रेड्डींसारखे अनाथ मुले अठरा वर्षांची झाल्यावर ज्यांना कुणी नसते अशांसाठी काम करणारी माणसे होती. शालेय विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे आईवडील बारीकसारीक कामे करून घर चालवत होते. अशांना पुढील शिक्षण घेण्यासाठी धनादेशाच्या रुपात प्रोत्साहन दिले जात होते. त्यातील काहींनी तर दुर्दैवाने कोरोनात आपल्या पालकांपैकी एकाला गमावले होते. प्रोत्साहन दिल्या जाणाऱ्या संस्थांची कामंही अफाट होती.

कुणी आडगावात, जेथे धड रस्ते नाहीत, वीज नाही, आधुनिक सुखसोयी नाहीत अशा भागांमध्ये आदिवासी आणि वंचित समाजासाठी काम करीत होते. आश्चर्य म्हणजे मुंबईच्या ऐन श्रीमंतांच्या गणल्या जाणाऱ्या वस्तीतही एक अगदी निम्न आर्थिक स्तर असणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवली जात होती. त्या शाळेचेही प्रतिनिधी आले होते. या शाळेत येणारी मुले मध्येच शाळा सोडू पाहतात कारण त्यांना छोट्यामोठ्या धंद्यात आईवडीलांना मदत करायची असते. जेथे आज हातातोंडाची गाठ पडेल की नाही याचीच खात्री नाही तेथे मोठी स्वप्ने ही मुले पाहणार तरी कशी? पण त्यांच्यासाठीही धडपडणारी माणसे होती आणि त्यांच्या पाठी ही संस्था प्रोत्साहनाच्या रुपाने उभी राहात होती.

माणसे येत होती, धनादेश दिले जात होते. मध्येच माझ्याही हस्ते एका संस्थेच्या प्रतिनिधींना धनादेश देऊन उज्वलाताईंनी माझा मोठाच सन्मान केला. त्यानंतर स्टेजवरील मान्यवरांची भाषणे झाली. योजकस्तत्र दुर्लभः या श्लोकावरील डॉ. निलेश जोशींचे निरुपण माझ्या मनाला स्पर्शून गेले. ते म्हणाले दुसऱ्यांना योग्य कामासाठी लावणे हे कौशल्य खरेच पण आपण स्वतःची योजना कुठे करु शकतो हा विचार जास्त महत्वाचा आहे. हे कुठेतरी मनात ठसलं. समारंभ संपल्यावर लगेचच संस्थेला वेबसाईट तयार करून देण्याची जबाबदारी उज्वलाताईंना सांगून मी स्वतःकडे घेऊन टाकली आणि स्वतःची एका कामावर योजना केली.

सौ सुरेखा जोशी यांच्या सुरेल आवाजात वंदेमातरम झाले आणि कार्यक्रम संपला. जेवल्याशिवाय जायचे नाही असा उज्वलाताईंचा प्रेमळ आग्रह होता. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यांमधून आडगावातून माणसे या कार्यक्रमाला आली होती. त्यांनी जेवूनच गेले पाहिजे या भावनेने संस्थेचे हितचिंतक श्री. राजेंद्र ललाई  यांनी या भोजनाचे आयोजन केले होते. बटाट्याची भाजी, पुऱ्या, मसालेभात, जिलेबी आणि ताक असा थाट पाहून जुन्या सभ्य काळातल्या लग्नसमारंभाची आठवण झाली. अतिशय चविष्ट अशा त्या जेवणाचा आस्वाद घेऊन तेथून निघालो. अजून मोठमोठ्या आश्चर्य वाटणाऱ्या गोष्टी पुढे यायच्याच होत्या. संध्याकाळी उज्वलाताईंशी बोललो तेव्हा त्या म्हणाल्या की आजच्या एका दिवसात कार्यक्रमाला आलेल्या माणसांकडून सत्तर हजार रुपये देणगी जमली होती. आणि आजच्या कार्यक्रमात जवळपास दहा लाख रुपयांचे वाटप झाले होते.

उज्वलाताई पुढे जे म्हणाल्या ते डोळ्यात अंजन घालणारे होते. त्या म्हणाल्या आमच्या संस्थेला देणगी देणारी सर्वच माणसे श्रीमंत असतात असे नाही. चांगल्या कार्याला स्वतःकडचे धन देणे ही एक मानसिकता आहे. त्यांना अशीही माणसे भेटली ज्यांना देण्याची इच्छा आहे पण पैसे फारच कमी असल्याने संकोच वाटतो. त्यांना उज्वलाताईंनी सांगितले तुम्ही दहा रुपये जरी दिले तरी मी घेईन कारण त्यातून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पेन्सीली येतील. अगदी सामान्य परीस्थिती असलेली माणसे संस्थेला एक विशिष्ट रक्कम जणू बॅंकेत बचत करावी इतक्या नियमितपणे दान म्हणून देत असतात. सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटली ती ही की संस्थेवर असलेला समाजाचा विश्वास. त्यामुळे कोरोनासारख्या काळातही संस्थेला धनाची कमतरता पडली नाही आणि संस्थेला कोरोना काळातही आवश्यकता असलेल्यांना भरघोस मदत करता आली. गीतेत भगवंताने योगक्षेमं वहाम्यहम् म्हटले आहे त्याचा अर्थ आता लक्षात आला. समाजाची अनन्य भावाने काळजी वाहणाऱ्या संस्थेचा योगक्षेम समाजच कसा वाहत आहे याचे प्रत्यक्ष दर्शन आज घडले होते.

अतुल ठाकुर

4 Comments

  1. Alright everyone, just checked out smjl and it seems pretty decent. Easy to navigate, and I wasn’t pulling my hair out trying to find what I needed. Hope you guys have the same luck! Check it out here: smjl

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment