You are here:
योग आणि व्यसनमुक्ती – १ – एका शक्यतेची ओळख

मुक्तांगणमध्ये योगाभ्यास हा व्यसनमुक्तीतील उपचारांचा एक भाग म्हणून रुग्णमित्रांकडून करवून घेतला जातो. मुक्तांगणच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट या स्वतः योगाभ्यास करीत. या लेखमालेत आपल्याला योगाभ्यास हा रुग्णमित्रांसाठी कसा उपयोगी पडू शकेल ते पाहायचं आहे. व्यसन आणि व्यसनमुक्ती या दोन्ही गोष्टी ज्याप्रमाणे अनेकपदरी आहेत त्याचप्रमाणे योगाभ्यासाचेही अनेक पदर आहेत, योगाभ्यासाच्या अनेक परंपरा आहेत. नवनवीन गोष्टी योगाभ्यासात समाविष्ट झाल्या आहेत. कालानुरुप योगाभ्यास करण्याचे स्वरुपही बदलत चालले आहे. इंटरनेटवर योगाभ्यास कसा करावा याचे असंख्य विडियोज उपलब्ध आहेत. पुस्तके तर यापूर्वीपासूनच लोकांना माहित आहेत. तर येथे नवीन काय असणार हा प्रश्न अनेकांना पडण्याची शक्यता आहे.

येथे योगाभ्यास हा व्यसनमुक्तीच्या दृष्टीकोणातून पाहिला जाणार आहे ही महत्त्वाची गोष्ट. योगाभ्यासामुळे व्यसनमुक्तीला कशी मदत होऊ शकेल याची शक्यता आपण पडताळून पाहणार आहोत. योगाभ्यास हा पुस्तके वाचून किंवा विडियोज पाहून करु नये असे मला वाटते. याचे कारण एक छोटेसे उदाहरण देऊन स्पष्ट करतो. समजा तुम्ही पर्वतासन करीत आहात. त्यात पद्मासनात बसून दोन्ही हात नमस्कार मुद्रेत ठेवून डोक्याच्यावर नेऊन ताणायचे असतात. कदाचित ही कृती तुम्ही करु शकाल. पण हात डोक्यावर नेऊन ताणल्यावर ते शेवटपर्यंत एकमेकांना जोडून ठेवले पाहीजेत, हात वर ताणले गेल्यावर नकळत माणसे भुवया वर ताणतात. त्यामुळे कपाळावर अनावश्यक तणाव येतो. म्हणून भुवया शिथिल ठेवाव्या लागतात. हे अशासारखे बारकावे सांगायला आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्या सूक्ष्म गोष्टी पाळता आहात की हे पाहायला तेथे योगशिक्षकाचीच गरज असते.

या सुक्ष्म गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि योगाचे पूर्ण फायदे मिळण्यासाठी त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे योगाभ्यास हा तज्ञ शिक्षकाच्या मार्गदर्शनाखालीच करावा असे मला वाटते. या लेखमालेत आपण फक्त पारंपरिक योगाभ्यासाबद्दलच चर्चा करणार आहोत. त्यात ज्या नवनवीन गोष्टींचा भरणा झाला आहे त्या टाळणार आहोत. या लेखमालेच्या योगाने आपल्या मुक्तांगणमित्रांना प्रेरणा मिळून त्यांनी जवळपासच्या योगवर्गात जाऊन जर नियमित योगाभ्यास सुरु केला तर या लेखमालेचा उद्देश सफल झाला असे आम्हाला वाटेल.  

आपला

अतुल ठाकुर

7 Comments

  1. Hi, I think your site might be having browser compatibility issues. When I look at your website in Safari, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, fantastic blog!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment