किशोर कुमार बद्दल मला नेहेमी एक गोष्ट महत्वाची वाटते कि जी गाणी त्याला मिळाली त्यातला काव्यगुण लक्षात घेतला तर तो रफीला मिळालेल्या एकाचढ एक गाण्याच्या तुलनेत कमी होता. किशोरला अगदी नंतरच्या काळात गुलजार सारखा प्रतिभावंत गीतकार मिळाला. तरीही त्याची गाणी लोकप्रिय झाली यातच किशोरदांचं यश आहे असं मला वाटतं. याबद्दल भिन्न मते असु शकतात पण रफीकडे किंवा तलतकडे असलेल्या गझल किंवा इतर अनेक क्लासिक म्ह्टली जाणारी गीते बाजुला ठेवली कि उरलेली उडत्या ठायीची गाणी किशोरच्या वाट्याला आली. तरीही त्याने ती लोकप्रिय केली. गाईड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. “दिन ढल जाये”, “क्या से क्या हो गया” च्या तुलनेत “गाता रहे मेरा दिल” हे श्रवणीय वाटलं तरी काव्य यादृष्टीने बरोबरीचं ठरेल का?. शायरीच्या बाबतीत जुन्या संगितकारांनी किशोरचा फारसा विचार केलेला दिसत नाही. ते क्षेत्र बहुतांशी रफीने व्यापलेले आहे. अमिताभच्या सुपरस्टारपदात किशोरचा वाटा आहेच. मात्र “कभी कभी” च्या तरल गीतांसाठी मुकेशला बोलावलं गेलं आणि किशोरच्या वाट्याला आलं ते “प्यार कर लिया तो क्या”. सारखं गाणं.
त्रिमुर्तीमधील राजसाहेब मुकेशच्याच आवाजात गायिले. दिलीप साहेबांनी रफीच पसंद केला. शेवटच्या काळात सगीनासाठी दिलिपसाहेब एकदाच “साला मै तो साहाब बन गया हे किशोरच्या आवाजात पडद्यावर गायिले. किशोरची क्लासिक म्ह्टली जाणारी बहुतेक गाणी ही प्रथम देव आनंदने पडद्यावर गायिली त्यानंतर काही प्रमाणात राजेश खन्नाने. पण तरीही “हम बेखुदीमें तुमको पुकारे चले गये” हे देवसाठी रफीच गात होता. काकासाठी अगदी उडत्या चालीतले “गुलाबी आंखे जो तेरी देखी” हे पुन्हा रफीचंच. “कही दूर जब दिन ढल जाये” साठी काकाल आवाज दिला मुकेशने. “जिंदगी कैसी है पहेली” साठी मन्नाडे. किशोर कुठेही नाही. अमिताभला मिळालेली किशोरची गाणी कितीही लोकप्रिय असली तरी ती अगदी वेगळ्या प्रकारची आहेत. म्हणजे राजेश खन्नाचे “चिंगारी कोई भडके” किंवा आंधीमधले “तुम आ गये हो” च्या शेजारी “खईके पान बनारस वाला” ठेवता येईल का?. इतर अतिशय महत्वाची गणली जाणारी किशोरची गाणी खुद्द किशोरने स्वतःच पडद्यावर गायिली आहेत. त्यात “पायलवाली देखना”, “अगर सुनले तो इक नगमा”, “मेरे मेहबुब कयामत होगी”, “ठंडी हवा ये चांदनी सुहानी”, “अजनबीसे बनके करो ना किनारा”, “कोई लौटादे मेरे बीते हुए दिन”, “हवाओं पे लिख दो”, “जीवन से ना हार जीने वाले” अशी अनेक.
पुढे काही क्लासिक गणली गेलेली गाणी ही नायक म्ह्णुन हिन्दीत फारसे न गाजलेल्या लोकांच्या पदरी पडली. त्यात “तुम कितनी खुबसुरत हो” (किरण कुमार), “चंदा कि किरनोंसे लिपटी हवाये” (बलदेव खोसा), “ये वोही गीत है”, “समा है सुहाना सुहाना” (जलाल आगा) ही काही त्यातील लोकप्रिय गाणी आहेत. आघाडीच्या नायकांनी किशोरचा आवाज कितीही वापरला तरी दिलिपचं रफी बरोबरचं किंवा राज कपूरचं मुकेशबरोबरीचं सातत्य हे ज्या प्रकारचं होतं तसं किशोरच्या बाबतीत फारसं कुणाचंही झालं नाही. त्यामुळे झालं हे की “पल पल दिल के पास”, ” देखा है जिंदगी को कुछ इतना करीब से” “हम बेवफा हरगीज न थे” सारखी जबरद्स्त गाणी धर्मेंद्र साठी गाऊन देखिल किशोर हा धर्मेंद्रचा आवाज होऊ शकला नाही. “मुसाफिर हूं यारों” गावूनही जितेंद्र म्हणजे किशोर कुमारच असं समिकरण झालं नाही. “रुख से जरा नकाब हटा दो” हे रफीच गायिला. फार काय अनेक गाणी ऋषी कपूरसाठी गावुनही पुन्हा “दर्दे दिल, दर्दे जिगर” रफीकडेच गेलं. अमिताभच्या वाट्याला काही क्लासिक म्हणवली जाणारी गाणी आली. “रिमझीम गिरे सावन”, ” हर हसीं चिज का मै तलबगार हुं”, “तुम भी चलो हम भी चलें यासारखी. काही प्रमाणात “अभिमान” चित्रपटाचा अपवाद वगळला तर बाकी सगळा मामला “खईके पान बनारसवाला” आणि “जहां चार यार मिल जाये” वालाच होता.
हे सारं विवेचन यासाठी कि महत्वाचा म्हटला जाईल असा नायक देव आनंदचा अपवाद वगळता हाताशी नाही. अशा परिस्थितीत किशोरकुमार त्या काळात टिकुन राहिला आणि त्या कालावधीत महत्वाची, क्लासिक म्ह्टली जाणारी गाणी त्याने गायिली. पुढे राजेश खन्नाचे “मेरे सपनों कि रानी” युग आले. त्यातल्या किशोरच्या लोकप्रियतेत त्याकाळच्या तरुणाईचा हात होता हे नाकारता येणर नाही. त्यामुळे गीतांमध्ये शायराना अंदाज आणि तत्सम गोष्टी फारश्या नसल्या (गुलजारचा सणसणीत अपवाद वगळता) तरी किशोरच्या आवाजातील तरुणाईचा जोश, सत्तरच्या दशकातील बदलणार्या परिस्थितीचे चित्रपटात पडलेले प्रतिबिंब आणि त्याला चपखल न्याय देणारा तरुण सळसळत्या रक्ताचे प्रतिनिधित्व करणारा, काहीसा बिनधास्त, हॅपि गो लकी, कलंदर, मर्दाना असा किशोरचा आवाज त्या पिढीने उचलुन धरला. तेव्हाही “परदा है परदा” रफीच गात होता. “मै पल दो पल का शायर हुं” मुकेशसाठी लिहिलं जात होतं तरीही किशोर नुसता टिकला नाही तर त्याच्या वावटळीत रफीसारखे भले भले मागे पडले. या सार्यांमध्ये किशोरला मिळालेल्या पंचमदा सारख्या संगीतकाराचा आणि गुल्जार सारख्या प्रतिभावंताचा हात आहे हे कुणीही नाकारणार नाही. मात्र हे किशोरच्या प्रचंड गुणवत्तेचं यश आहे असं मला निश्चितपणे वाटतं.
अतुल ठाकुर
#kishorekumar #atulthakur
किशोरकुमार…एक आकलन
1 Comment
Lovely just what I was searching for.Thanks to the author for taking his clock time on this one.