You are here:
अविस्मरणीय गाणी, विस्मृत चेहरे – तुम कितनी खुबसूरत हो, ये मेरे दिल से पूछो…

किरणकुमारला तसा विस्मृत चेहरा म्हणता येणार नाही. पण नायक म्हणून सुरुवात केलेल्या या अत्यंत गुणी अभिनेत्याला हिन्दी चित्रपटसृष्टीत तेरी नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांनी फारसे स्विकारले नाही हे मान्य करावे लागेल. उंचीपुरी देहयष्टी, सशक्त अभिनय असलेला हा माणुस पुढे दुसर्‍या खेळीत खलनायक म्हणून नावारुपाला आला. किरणकुमार नायक म्हणून लोकांना फारसा ठावूक नसेल म्हणून विस्मृत म्हणायचं इतकंच. पण त्याला मिळालेलं हे किशोरचं गाणं बाकी शंभर नंबरी सोनं आहे. आणि यात किशोरने लावलेला आवाजही जबरदस्त आहे. अगदी वेगळा प्रकार.  वेगळाच फोर्स जाणवतो या गाण्यात. बहुधा कुठल्याशा लेडिज हॉस्टेलखाली किरणकुमार मजनू बनून हे गाणे गात आहे. लैला आत आहे पण गाण्याचा आवाज ऐकून बाहेर येते. १९७२ सालच्या “जंगल मे मंगल” चित्रपटातील ही अगदी कोवळी, नवथर तरुणी रिनाराय फार सुरेख दिसली आहे.

बाकी किशोरसाहेब एकटे प्रेमाचा राग आळवत आहेत आणि आग चार दिलांना लागली आहे हे एक दुर्मिळ दृश्य या गाण्यात पाहण्यासारखे आहे. किरणकुमार तर आर्जवच करायला आला आहे. त्याचे आर्जव स्विकारुन रिना राय बाहेर येऊन त्याच्या हृदयाची कैफियत ऐकते आहे. लाजरे स्मित चेहर्‍यावर ठेवून. ती गॅलरीत येऊन उभी राहते ती गॅलरी फार उंच नाही. नायक सहज गाताना जवळ येऊन तिचा हात धरतो आणि नायिका धरलेला हात तसाच ठेवते. म्हणजे दोनो तरफ बराबर की आग लगी हुई है…पण या तरूण जोडप्याला मात देईल असे देखणे दृश्य दुसरीकडे दिसते आहे ते मात्र या गाण्याचा हायलाईट म्हणता येईल असे आहे. समोरासमोरच्या खिडकीत प्राण आणि सोनिया सहानी या दोन प्रौढांमध्येही काहीतरी उमलले आहे. आणि खरं सांगु का प्रेमात पडलेले हे प्रौढ जोडपेच मला या तरुणाईपेक्षा जास्त आवडले.

दाढी लावलेला प्राण एरवी भुवई उचलली की समोरच्या माणसाची शिकार करेल असं वाटतं पण येथे प्राणासाहेबांचीच शिकार झाली आहे. मोठा काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेली सोनिया सहानी सुरेख दिसली आहे. काहीवेळा तर तरुण रिनाराय पेक्षाही जास्त आव्हान देणारी. गाण्याच्या शब्दाशब्दाला या प्रेमिकांचे प्रेम उचंबळून येत आहे जे प्राणने फक्त चेहर्‍यावरच्या हावभावांनी आणि अगदी माफक हालचालींनी अत्यंत परिणामकारकरित्या दाखवले आहे. तो खिडकीच्या एका बाजूला रेललेला असतो. काहीवेळाने बाजू बदलतो. आत्यंतिक प्रेम उचंबळून आल्यावर काय करु काय नको असं होऊन जातं. प्राणने ते साध्या हालचालींनी दाखवलं आहे. सोनिया सहानी अतिशय संयत आहे. फक्त मुद्राभिनय आणि डोळ्यांच्या हालचाली. बाकी काही नाही. तिच्या सुंदर चेहर्‍यावर प्रेमात पडलेल्या प्रौढेचा संकोच थेट दिसतो. पुलंनी कुठतरी म्हटल्याचं आठवतंय. प्रेमात पडलेली माणसं नेहेमी सुंदरच दिसतात. तसेच हेही दोघे देखणे दिसतात.

या गाण्यालाही जोरकस चाल दिली आहे शंकर जयकिशन यांनी. मला काहीवेळा हे गाणे ऐकताना कुठलीतरी पाश्चात्य सुरावट ऐकल्यासारखे वाटते. का ते कळत नाही पण या गोड चालीत काहीतरी वेगळेपणा निश्चित आहे. आणि अशा चाली फारशा दिसतही नाहीत. शब्दही जबरदस्तच. दोन नावे आहेत. एक हसरत जयपुरी आणि दुसरे नीरज. हे गाणे कुणाच्या नावावर आहे ते कळले नाही. पण त्यामुळे आस्वादात मात्र फरक पडत नाही. कभी दूर जाके लूटा, कभी पास आके लूटा, ये सितम किया जो तुमने, मुझे मुस्कुराके लूटा… निव्वळ हास्याने लुटणारी प्रेयसी असल्यावर माणसाला आणखी काय हवे?

अतुल ठाकुर

#kishorekumar #shankarjaikishan #atulthakur

1 Comment

  1. I do trust all of the ideas you have introduced to your post. They are really convincing and will definitely work. Nonetheless, the posts are very quick for newbies. May you please lengthen them a bit from subsequent time? Thanks for the post.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment