राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, आणिके काय कोणे, चालावेचिना | (ज्ञानेश्वरी)

ही ज्ञानदेवमहाराजांची ओवी येथे दिल्यावर लेखनाचा उद्देश काय हे खरं तर सांगण्याची गरज उरलेली नाही. अनेक उत्तमोत्तम लेखकांचे लेखन वाचत असताना आपणही तसेच लिहावे असे वाटण्याइतके धाडस माझ्यात नाही. मात्र अनेक विषयांची आवड असल्याने त्या विषयांबद्दल, आसपासच्या परिस्थितीबद्दल, माणसांबद्दल कुठेतरी काहीतरी खरडावे असे मात्र वाटते.

शिवाजी महाराज, टिळक, गांधी, गुरुदेव नरहर कुरुंदकर, पुलं, जीए, मोहम्मद रफी, लता मंगेशकर अशा अनेक व्यक्तींबद्दल मला अतीव आदर वाटतो. त्यांच्यावर लिहिताना लेखन हे किर्तनाच्या पातळीवर गेले आहे असे जर कुणाला वाटले तर ते अगदी खरे आहे. या मंडळींच्या नावाचा कुठेही गजर झाला कि आम्ही टाळ घेऊन हजर असतोच. आवडत्या माणसांबद्दल हात राखून लिहिणे मला जमतच नाही.

आवडत्या माणसांप्रमाणेच आवडते विषयही अनेक आहेत. त्याला कसलिही मर्यादा नाही. त्यातील काही सांगायचे झाल्यास समाजशास्त्र, मानसशास्त्र, कला, योग, तत्त्वज्ञान, महाभारत, भाषाविज्ञान, संशोधन हे सांगता येतील. या विषयांचा कारणापरत्वे अभ्यास सुरु असतो. त्यामुळे त्यासंदर्भात लिहिणे झाले. तेथेही संस्कृतकडे कल झुकलेला आहेच. ही देववाणी खुप आवडती आहे. त्यामुळे संस्कृतबद्दलचे लेखन जास्त आढळण्याची शक्यता आहे.

जुने हिन्दी चित्रपट, जुनी गाणी, हॉलीवूडपट, वेस्टर्नपट, चित्रपट कलाकार, गायक हे आणखी अतिशय आवडतं क्षेत्र. त्याबद्दलही लिहिलं आहे. चित्रपटगीते, चित्रपट, कलाकार, गायक हे सारे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. माणसाला जशी जगण्यासाठी अन्नपाण्याची गरज असते तशी मला या मंडळींची गरज असते. या गायकांच्या, कलाकारांच्या फक्त ऋणात राहणेच शक्य आहे. त्याची फेड मलातरी कुठल्याही जन्मी शक्य नाही इतके यांनी मला भरभरून दिले आहे. घेताना अनेकदा माझीच झोळी तोकडी पडली आहे. हे संकेतस्थळ म्हणजे या मंडळींबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. सौंदर्यासक्ती हा मला माझा स्थायीभावच वाटतो. वेगवेगळ्या माणसांचे, निरनिराळ्या विषयांचे, विविध कलांचे अंतर्बाह्य रुप निरखण्याचा मला छंदच आहे. आणि सौंदर्य कलेत पाहताना मला आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकामधील एक अवतरण नेहेमी आठवते. “विभाति लावण्यमिवाङ्गनासु”. स्त्रीमध्ये लावण्य हे तिच्या अवयवांहून निराळेपणी झळकते त्याचप्रमाणे ध्वनिद्वारे काव्यात निराळा अर्थ झळकतो आणि तोच काव्याचा आत्मा आहे असे आनंदवर्धन म्हणतो. कुठल्याही कलेबद्दल लिहिताना आजतरी माझी हीच भूमिका आहे.

…एकंदरीत अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर योगसूत्रापासून ते कामसूत्रापर्यंत आणि पुन्हा कामसूत्रापासून ते योगसूत्रापर्यंत असा माझा सतत प्रवास सुरु असतो. त्यामुळे पातंजल योगावरील लेखानंतर मला हेलनच्या नृत्याबद्दलही लिहिण्याची ओढ लागते. आणि शृंगाराबद्दल लिहिल्यावर योगनिद्रेबद्दलही लिहावंसं वाटतं. विषयांचे वैविध्य आहे म्हणून येथे विद्वत्तापूर्ण लेखन वाचण्याची अपेक्षा ठेवून जे येतील त्यांना तसे काहीही मिळणार नाही हा इशारा आधीच दिलेला बरा. बरेचसे लेखन अनौपचारिक भाषेत मित्राशी बोलावे तसे आहे. तरीही ते वाचकाला आवडले तर आनंदच वाटेल.

डॉ. अतुल ठाकुर

संपर्क:
dratulthakur1@gmail.com