काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही. या लेखात त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. रफीसारखा प्रचंड गुणवत्तेचा गायक सर्वसाधारणपणे चार दशकं हिन्दी चित्रपट संगीताच्या सिंहासनावर विराजमान होता हे चटकन सुचणारं कारण असलं आणि त्यात तथ्य असलं तरी तेवढं पुरेसं नाही. कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. या तिघांनीही रफीसमोर आपापली वेगळी साम्राज्यं उभारली आणि त्या साम्राज्यांचे ते शेवटपर्यंत सम्राट राहीले. नावाजलेल्या संगीतकारांनी रफीसमोर, रफी ऐन भरात असताना मन्ना डे, मुकेश व तलत यांना अविस्मरणीय गाणी दिलेली आहेत. खरंतर त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यात रफीलाही प्रवेश नव्हता असं म्हटल्यास वावगं ठरु नये. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात मन्ना डे, दर्दभर्या गीतांत मुकेश आणि गझलमध्ये तलत यांना दुसरा पर्याय नव्हताच. महेंद्र कपुरचं यातिघांप्रमाणे रफीसमोर वेगळं साम्राज्य निर्माण झालं नाही. रफी, किशोर, मुकेश हे अनुक्रमे दिलीप, देव व राज या दिग्गजांसाठी गायिले. हा योग महेंद्र कपुरच्या भाग्यात नव्हता. महेंद्र कपुरची अप्रतिम गाणी ही सुनील दत्त (गुमराह, हमराज), शशी कपुर (वक्त, प्यार किये जा), राजेंद्र कुमार (गीत, संगम), विश्वजीतसाठी (किस्मत), होती. अर्थातच ही यादी आणखि वाढवता येईल पण त्यात ते त्रिकुट नसणार. शेवटी दिलीपकुमार जेव्हा “रामचंद्र कह गये सिया से” हे महेंद्र कपुरच्या आवाजात गाऊ लागला तेव्हा उशीर झाला होता. महेंद्र कपुरवर शिक्का बसलाच असेल तर तो मनोजकुमारचा आवाज म्हणुन. “मेरे देश की धरती” हीट झाल्याने महेंद्र कपुर आणि देशभक्तीपर गाणी हे जणु समिकरणच बनलं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रामप्रहरी महेंद्र कपुरचा आवाज दुमदुमु लागला. “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन घेण्याची पाळी आली. ते ही यश निर्भेळ नव्हतंच. “जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा” हे फार पुर्वी रफी गाऊन गेला होता. शिवाय मनोज कुमारला दिलीप, राज आणि देव आनंदचं ग्लॅमर कधीही लाभलं नाही.
आम्ही महेंद्रकपुरच्या प्रेमात केव्हा पडलो ते नीट लक्षात नाही पण बहुधा “तुम अगर साथ देनेका वादा करो” या गाण्यापासुन. “चलो इकबार फिरसे” मनात रुजायला थोडासा वेळ लागला. “ऐ जाने चमन तेरा गोरा बदन” खुप आवडतं. विशेषतः “ऐ हुस्ने बेखबर” पासुनची सुरुवात खासच. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराची गाणी गावी ती महेंद्र कपुरनेच. “ऐ जाने चमन” आहेच. शिवाय “दिल लगाकर हम ये समझे”, “मेरा प्यार वो है के”, “किसी पत्थरकी मुरत से मुहब्बत का इरादा है”, “यारों कि तमन्ना है”, “तुम्हारा चाहनेवाला, खुदा की दुनिया में”, “जिसके सपने हमे रोज आते रहे”, “इन ह्वाओं मे इन फिजाओं में”, “झुके जो तेरे नैना”, “तेरे प्यार का आसरा चाहता हुं”, “तुम अगर साथ देनेका वादा करो”, “आ भी जा आ भी जा”, “मेरी जान तुमपे सदके एहेसान इतना करदो”, “छोडकर तेरे प्यार का आलम”, “आजकी मुलाकात बस इतनी”, “हमने जो देखे सपने”, “धडकने लगी दिलके तारों की दुनिया”, “आखोंमे कयामत के काजल”, “रफ्ता रफ्ता वो हमारे” पासुन ते अगदी अलिकडल्या “ये पहले प्यार की खुशबु” पर्यंत अशी कितीतरी अप्रतिम गाणी महेंद्र कपुर गाऊन गेला आहे. महेंद्र कपुरच्या आवाजाची जातच मुळी प्रियकराचं आर्जव, आर्तता आणि समर्पणाची भावना घेउन येते असं मला वाटतं. मात्र इतर काही गाण्यांचा वेगळ्याने विचार व्हायला हवा. काही चिंतन करायला लावणारी गाणी महेंद्र कपुरने गायिली आहेत. दोन उदाहरणं मला चटकन आठवतात. “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “संसार की हर शय का” ही अनुक्रमे “हमराज” व “धुंद” मधील गाणी. दोन्ही चित्रपट काहीश्या चाकोरीबाहेच्या “बोल्ड” विषयावरचे. दोन्ही बी. आर. चोप्राचेच. बी. आर. चोप्रा, साहीर लुधियानवी आणि महेंद्र कपुर या टीमने दिलेली गाणी ही मनोजकुमार, महेंद्र कपुर, कल्याणजी आनंदजी पेक्षा मलातरी फार उजवी वाटतात. देशभक्तीची भावना हा काही चांगल्या गाण्याचा निकष होउ शकत नाही. आणि भलत्या बाबतीत भावनावश होण्यात अर्थही नाही. बाकी बी. आर. चोप्राने महेंद्र कपुरला शेवटपर्यंत साथ दिली. मला तर “अथ श्री महाभारत कथा” फार आवडायचं. विशेषतः एपिसोड संपताना “भारत कि ये काहानी सदीयों से है पुरानी” या ओळींनी केलेली सांगता तर छानच होती. त्यानंतर “चलो इकबार फिरसे”, “आप आये तो खयाले दिले नाशाद आया” यासारख्या गाण्यांवर बोलावं लागेल. अगदी नवीन वाटेवरची ही गाणी आहेत प्रेयसी आता दुसर्याची झालेली आहे पण सूडाची भावना नाही. वैफल्याचा तळतळाट नाही. कुठल्याही तर्हेचा उरबडवेपणा तर नाहीच नाही. अतिशय समंजस, प्रौढ, प्रगल्भ भाव या गाण्यांमधुन व्यक्त होतो. “निकाह” च्या “बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी” मध्ये जुना महेंद्र कपुर पुन्हा त्याच तेजाने तळपला होता. महेंद्र कपुरच्या हिर्यामोत्यांचा असा हिशोब दिल्यावर मला “ठंडे ठंडे पानी से” सारख्या गाण्यांचा फारसा विचार करावासा वाटत नाही.
महेंद्र कपुरच्या गायकीला न्याय दिला असेल तर तो दोघांनी. एक संगीतकार रवी आणि दुसरा ओ.पीं. नैयर. बी. आर. चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे. ओ.पी ने दिलेल्या संगीतात “किस्मत” चित्रपटातील गाणी आजदेखिल महेंद्र कपुरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये गणली जातात. “आखों मे कयामत के काजल” सारखं अप्रतिम गाणं ओ.पी ने या चित्रपटात दिलं. मात्र अभिनेता विश्वजीतला या गाण्यांचं चीज नाही करता आलं. दिलीपकुमार सारखे अभिनेते उत्कृष्ट गाण्याला त्याच तोडीचा अभिनय करुन गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत असत. याबाबतीत महेंद्र कपुर दुर्दैवीच म्हणायला हवा. जिज्ञासुंनी “लाखों है यहां दिलवाले” सारखं गाणं जरुर पाहावं. पडद्यावर हे गाणं गाताना विश्वजीतने गिटारचा वापर एखाद्या हत्यारासारखा करत, कंबर, मान आणि तंगड्या नको तिथे हलवुन गाण्याचं पार मातेरं करुन टाकलं आहे. गाणं एकीकडे आणि विश्वजीतसाहेब भलतीकडे असा प्रकार या गाण्याच्या नशीबी आलाय. रफीलाही त्याच्या अनेक उत्कृष्ट गाण्यांसाठी भारतभुषण, प्रदिपकुमारसारख्या अभिनेत्यांसाठी गावं लागलं. हे अभिनेते अभिनयात ग्रेट नसतीलही पण रफीच्या गाण्यांचे त्यांनी असे बारा वाजवले नाहीत. कुठेतरी मला महेंद्र कपुरच्या अपयशात त्याला पडद्यावर त्याच तोडीचे कसलेले अभिनेते मिळाले नाहीत हे देखिल कारण महत्त्वाचं आहे असं वाटतं. येथे महेंद्र कपुरच्या काही मर्यादांही विचार करावा लागेल. यात दुमत होण्याची शक्यता आहे. रफीचा आवाज दिलीप, देव, धर्मेंद्र, शम्मी कपुरला फीट्ट बसला. मुकेश तर राज कपुरचा दुसरा आवाजच बनुन गेला. मन्नाडेचा सुद्धा आवाज राज कपुरला चपखल बसला. राजेश खन्ना आणि किशोर कुमारने एक नवीन युगच चित्रपट सृष्टीत आणलं. महेंद्र कपुरच्या बाबतीत आवाज चपखल बसण्याचं उदाहरण दिसुन येत नाही. मनोजकुमारचा अपवाद देखिल सणसणीत म्हणता येणार नाही. मुकेश (दिवानोंसे ये मत पुछो), रफीने (भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जाये) मनोजकुमारसाठी काही अजरामर गाणी गायिली आहेत. मला महेंद्र कपुरचा आवाज हा नेहेमी शुचिर्भुत, शुद्ध, सुस्नात असाच वाटला. त्यात किशोरकुमारच्या आवाजातलं सळसळतं तारुण्यं, टारगटपणा, रफीची धार येण्याचा संभव कमी त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं. तलत जेव्हा “जाये तो जाये कहां” म्हणु लागतो, किशोर जेव्हा “मै शायर बदनाम” म्हणत अयशस्वी कवीची वेदना बोलुन दाखवतो, रफीच्या तोंडुन जेव्हा “याद ना जाये बीते दिनों की” बाहेर पडतं तेव्हा सारं वातावरणच झाकोळुन गेल्यासारखं वाटतं. ही किमया महेंद्र कपुर कडुन फारशी घडलेली नाही. मुकेश तर या क्षेत्रातला राजाच. त्याच्याबद्दल काय बोलणार? मात्र याला महेंद्र कपुरची तीन गाणी अपवाद आहेत. एक “संबंध” चित्रपटातलं “अंधेरे में जो बैठे है”, दुसरं “संगम” चित्रपटातलं “हर दिल जो प्यार करेगा” आणि तिसरं मनोजकुमारच्या “रोटी कपडा और मकान” मधलं “और नही बस और नही” . या गाण्यातला प्रचारकी थाटाचा भाग सोडल्यास “कोई आग मचल जाये, सारा आलम जल जाये” या ओळी महेंद्र कपुरने अशा तर्हेने म्ह्टल्या आहेत कि जाळुन टाकणार्या थंडगार अॅसिडचा स्पर्श त्या ओळींना झाल्यासारखा वाटतो.
महेंद्र कपुरच्या मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल स्वतंत्र लिहावं लागेल. त्याचे मराठी उच्चार इतके उत्कृष्ट होते कि मुळात एक अमराठी माणुस मराठी गाणं गातोय असं कधी वाटलंच नाही. “सुर तेच छेडीता”, “सांग कधी कळणार तुला”, “हे चिंचेचे झाड दिसे मज”, “रात्रीस खेळ चाले” पासुन ते ” ती येते आणिक जाते” पर्यंत कितीतरी ग्रेट गाणी महेंद्र कपुरच्या नावावर आहेत. मात्र येथे महेंद्र कपुरला गृहीत धरलं गेलं असं मला वाटतं. घरकी मुर्गी दाल बराबर या न्यायाने प्राचीन काळापासुन मराठी गात असलेला महेंद्र कपुर जणु काही विसरलाच गेला आणि “शोधीसी मानवा राऊळी मंदीरी” ने मराठीतही रफी युग आणलं. रफीची मराठी गाणी गुणगुणताना लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागु लागली. पुढे “आश्विनी ये ना” ही आरोळी ठोकुन किशोर कुमारने येथे प्रवेश केला तेव्हा ” माझ्यापासुन दुर नको जाउ गंगुबाय” हे अस्सल गावरान ठेक्यात दादांच्या चित्रपटात अनेक वर्षे गाणारा महेंद्र कपुर आमच्या खिजगणतीतही नव्हता. रफी, किशोरचं अमराठी म्हणुन मराठीत जेवढं उदंड कौतुक झालं तेवढं महेंद्र कपुरचं कधीही झालं नाही असा तर माझा आरोपच आहे. या लेखाचा प्रपंच महेंद्र कपुरच्या गाण्यांची जंत्री देण्यासाठी केलेला नाही. बरीचशी चांगली गाणी राहुन गेल्याचा संभव आहे. या गुणी गायकाच्या कारकिर्दीचा एका विशिष्ठ दॄष्टीकोणातुन मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. महेंद्र कपुर प्रति रफी झाला नाही याचं दु:ख नाही. मात्र या अतिशय गुणी गायकात तलत, मुकेश, मन्ना डे सारखं साम्राज्य निर्माण करण्याची कुवत नक्कीच होती. महेंद्र कपुरचं असं वेगळं साम्राज्य झालं नाही याचंच फार वाईट वाटतं. मर्यादा सर्व गायकांना होत्या. पण त्यांना त्यांच्या आवाजाला सजेशी गाणी दिली गेली. महेंद्र कपुरच्या आवाजाला खुलवणारी गाणी रवी, साहीर, ओ.पी. नेच दिली. ती परंपरा पुढे चालली नाही. “और नही बस और नही, गम के प्याले और नही” हा मला महेंद्र कपुरचा आक्रोशचं वाटतो. केव्हातरी मी आठवणीने “दिल लगाकर हम ये समझे” हे माझं अत्यंत आवडतं गाणं लावतो. कानावर मोरपीस फिरवल्यासारखं होतं. पण मनात आत कुठेतरी “और नही बस और नही” म्हणणार्या महेंद्र कपुरचं दु:ख विसरता येत नाही.
अतुल ठाकुर
और नही बस और नही…
3 Comments
Yo, just checked out bet29. Pretty slick site, easy to navigate. Odds seem decent. Gonna throw a few bucks down and see what happens. Fingers crossed! Good luck to all out there!
Alright, gave a18bets a shot. The sportsbook is pretty comprehensive, lots of options. Depositing was smooth, which is always a plus. Hope the withdrawals are just as easy! Will update if I win big!
Hey, just registered at 138bets. So far, so good. They’ve got a welcome bonus that looks pretty tempting, so I’m gonna take advantage of that. Let’s see if I can turn that into some real cash!