You are here:
सूर निरगस हो…

रविवारी आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळाचा मेळावा होता. माझ्यासाठी यावेळचे खास आकर्षण होते शुभार्थींनी केलेले नृत्य. याबद्दल अगदी आधीपासून ऐकले होते. ऋषिकेश पवार हे या नृत्याचे वर्ग निःशूल्क घेत असतात. आणि त्यामुळे अनेकांना चमत्कार वाटावा असे फायदे झालेले ऐकले होते. स्वतः ऋषिकेश पवार दुसरीकडे व्यस्त असल्याने त्यांची भेट त्या दिवशी झाली नाही. मात्र त्यांचे सहकारी तितक्याच समर्पित भावनेने काम करताना पाहिले आणि वाटलं या एकंदर उपक्रमाविषयी थोडी माहिती घ्यावी. शोभनाताईंनी तन्वी हेगडे यांचा नंबर दिला. तन्वी यांच्याशी बोललो आणि काही वेळातच लक्षात आले की या उपक्रमाचा आवाका फारच मोठा आहे. आमच्या मंडळामुळे मला फक्त पार्किन्सन्सबद्दलच ठावूक होते. पण त्यांची संस्था निरनिराळ्या वयोगटातील निरनिराळ्या समस्या असणाऱ्यांसाठी काम करत असते. पार्किन्सन्स ही त्यातील एक समस्या. अनेकदा अशा गोष्टींबद्दल ऐकलेले असते पण प्रत्यक्ष पाहण्याचा परिणाम वेगळाच होतो.

त्या दिवशी आमच्या शुभार्थींच्या नृत्याचा कार्यक्रम डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. दोन ज्येष्ठ शुभार्थीं  मागे बसले होते. आणि बाकी सर्व पुढे होते. काहीच्या शरीराला कंप होता. पण “सूर निरागस हो” ने सुरुवात झाली आणि सर्व सभागृह भारावल्यासारखे झाले. मला सर्वात आवडला तो शुभार्थींच्या चेहऱ्यावरील आनंद. आपण स्टेजवर येऊन नृत्य करु शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो आणि पाहणाऱ्यांना आनंद देऊ शकतो ही भावनाच मुळात फार समाधान देणारी होती. तन्वी यांच्याशी बोलताना त्या म्हणाल्या की संगीताची जादू अशी असते की ते सुरु झालं की माणसाची पावले, शरीर नैसर्गिकरित्याच ताल धरु लागतात. माणसाच्या या उपजत प्रवृत्तीचा वापर करुन या कार्यक्रमाचे संगीत निवडले होते. आम्ही प्रेक्षागारात बसलेली माणसेही त्या तालात गुंगून गेलो होतो. येथे नुसते हातवारे नव्हते तर काही स्टेप्सही होत्या, जागेवरुन हलणे होते, मान डोलावणे होते, दोन्ही बाजूला झुकणे होते, वळणे होते. आणि हे सारे एका तालात, लयीत बांधलेले होते.

तन्वींसारखे त्यांचे शिक्षक समोर उभे राहून त्यांच्या सोबत नृत्य करीत होते. हे पाहताना पार्किन्सन्स मुळे सुरुवातीला शरीर आणि मन दुबळं झालेल्या त्या शुभार्थींमध्ये हे नृत्य कसं औषधाप्रमाणे काम करत असेल हे लक्षात आलं. मूळात शरीराला कंप, किंवा फ्रिजिंगमुळे हालचालींवर आलेली मर्यादा, त्याचा मनावर झालेला विपरीत परिणाम, त्यामुळे आलेले नैराश्य, या नैराश्यामुळे पुन्हा वाढलेला आजार अशा विषारी चक्रात माणसे अडकतात आणि त्यांना त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसतं. शेवटी ही माणसे समाजात मिसळणे सोडून देतात. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे असे म्हणतात. समाजापासून दूर राहून, एकटेपणाने आजाराच्या तीव्रतेत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या साऱ्यांच्या मूळाशी जाऊन हा नृत्योपचार काम करतो असे मला वाटते. सर्वप्रथम काय होते? तर ही माणसे घराबाहेर पडून या नृत्यवर्गाला जातात. म्हणजे समाजात वावरु लागतात. कोविड पासून हे वर्ग ऑनलाईन सुरु आहेत. म्हणजे ही माणसे आपल्या बिछान्यातून उठतात आणि आपल्या नैराश्याच्या कोशातून बाहेर पडण्यास सुरुवात करतात हे नक्की.

पुढे क्लासमध्ये जाऊन काय करायचं असतं? तर नृत्य. आणि नृत्य म्हणजे फक्त आणि फक्त आनंद. अगदी प्राचीन आदिवासी जमातींमध्येही नृत्य आढळतात. मानवाची आनंदाचा आविष्कार करण्याची ती एक अतिप्राचीन पद्धती आहे असे मला वाटते. आमचे शुभार्थी तेथे जाऊन मनसोक्त नाचतात. अनेकदा धडधाकट माणसे नाचायला लाजतात. पण नृत्य हे तुम्हाला मोकळे करते. येथे तर आजाराचे सावट मनावर पडलेले असते. असे असताना हा नृत्योपचार शरीर आणि मन या दोघांवरही दुहेरी काम करतो. हालचालींमुळे शरीराला व्यायम घडतो. वापरात नसलेले स्नायु पुन्हा कार्यरत होऊ लागतात. घाम आल्याने उत्साह वाढतो. आणि नृत्यामुळे मन उल्हासित होते. भीती, चिंता, नैराश्य पळून जाते. आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळात या नृत्योपचाराने अक्षरशः चमत्कात घडल्यासारखे अनुभव सांगितले जातात. नैराश्यामुळे घरात दडलेली माणसे बाहेर पडू लागतात, पुन्हा जीवनाचा आनंद घेऊ लागतात. याचे श्रेय या उपचारांइतकेच ऋषिकेश पवार यांच्या सहकाऱ्यांनाही जाते हे लक्षात घेतले पाहिजे.

ऋषिकेश पवार जेव्हा आमच्या ऑनलाईन सभेत आले होते तेव्हा सर्वांना काकू, मावशी , काका असे संबोधून बोलत होते. अतिशय सकारात्मक असे त्यांचे बोलणे होते. हे देखील एक प्रकारे औषधासारखेच काम करते. शुभार्थींच्या मर्यादांसकट त्यांचा स्वीकार करून ही मंडळी त्यांच्याकडून नृत्य करून घेत असतात. मेळाव्यातदेखील तन्वी यांच्या सोबत अजून दोन सहकारी होते. आणि मला सर्वात जास्त भावली ती त्यांची आपुलकी. आपल्या घरातील आजी आजोबा, काका, मामा, मावशी यांच्या सोबत वावरल्यासारखे हे सगळे प्रेमळ सहकारी शुभार्थींमध्ये वावरत होते. नृत्य म्हणजे आनंद घेणे आणि आनंद देणे हे त्या दिवशी माझ्या लक्षात आले. आम्ही पाहणारेदेखील आनंदून गेलो होतो. पार्किन्सन्स हा वाढत जाणारा आजार आहे असे म्हणतात. पण त्यावेळी आमच्या शुभार्थींच्या चेहऱ्यावर फक्त नृत्याचा आनंदच होता. या नृत्याने ही शुभार्थी मंडळी पार्किन्सन्सवरच स्वार झाली होती. पार्किन्सन्स मध्ये फ्रिजिंगचा त्रास होतो म्ह्णतात. पण आजच्या नृत्याने आमच्या शुभार्थींनी खुद्द पार्किन्सन्सलाच फ्रिज करून टाकले असे मला वाटले.

अतुल ठाकुर

(हे नृत्योपचार पुण्याच्या संचेती हॉस्पिटल आणि ऋषिकेश पवार यांच्या Centre Of Contemporary Dance हे संस्था यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत निःशूल्क घेतले जातात. या लेखासाठी ऋषिकेश पवार यांची सहकारी तन्वी हेगडे यांची मदत झाली आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment