You are here:
श्रुती, समाज आणि वैदिक संशोधन मंडळ

एखादा दिवस भाग्याचा असतो आणि अचानकपणे आपल्या मनातले प्रश्न सहज सुटतात असे त्या दिवशी झाले. आम्ही सर्व पुण्याच्या वैदिक संशोधन मंडळात जमलो होतो. सर्वजण संस्कृतचे विद्यार्थी, बहुधा मी सर्वात  ‘ढ’ असेन. पण त्या प्राचीन वास्तूत ज्ञानछत्र सुरु असताना आपल्याही झोळीत काहीतरी पडेल या अपेक्षेने गेलो होतो. देणारे भरभरुन देताहेत आणि आपली झोळीच लहान आहे याची खर्‍या अर्थाने जाणीव त्या दिवशी झाली. डॉ. भाग्यलता पाटसकरांना पाहिले. त्याचे बोलणे ऐकले आणि प्रकांड पांडित्य काहीजण अगदी सहजतेने कसे पेलतात ते जाणवले. अतिशय साधे दिसणे आणि देहबोली. मात्र त्यांनी बोलायला सुरुवात केल्यावर आतला जबरदस्त अभ्यास जाणवला. त्यांचे सहकारीदेखिल तसेच नम्र. पाटसकर मॅडमनी आम्हाला संग्रहालयात नेले आणि तेथील काही वस्तु दाखवत त्या बोलु लागल्या. श्रुती शब्दाचा अर्थ त्यांनी तेव्हा सांगितला. त्या म्हणाल्या,” आपले ऋषी मुनि निसर्गाशी इतके एकरुप झाले होते, तादात्म्य पावले होते कि त्यांना निसर्ग करीत असलेले हितगुज ऐकु येत असे. आणि निसर्गाने त्यांच्या कानात सांगितलेल्या गोष्टी वेदात आहेत. म्हणुन त्या “श्रुति”. ऐकल्यावर डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडल्याप्रमाणे झाले. वेद अपौरुषेय कसे, ईश्वराचे निश्वास कसे या सार्‍या शंकांचे एका झटक्यात निरसन झाले.

पुढे त्यांनी यज्ञसंस्कृतीचा समाजाशी कसा संबंध आहे ते विशद करण्यास सुरुवात केली तेव्हा तर त्यांनी आमच्या समाजशास्त्राच्या मुळालाच हात घातला. त्या म्हणाल्या माणुस एखाद्या बेटावर एकटा असेल तर बरीच काही कामे एकट्याने करु शकतो. तो अनेक कामे एकट्याने करील पण यज्ञ ही अशी गोष्ट आहे कि तो ती एकटा करुच शकत नाही. त्यासाठी समाजाची गरज भासतेच. त्यामुळे यज्ञसंस्कृती ही लोकांना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग ठरत असावी असे म्हणण्यास वाव आहे. यज्ञाच्या निमित्ताने माणसे एकत्र येत असावी. माझ्या मनात एक विचार आला, मार्क्सने माणसांचे बुर्झ्वा आणि प्रॉलेटेरीएट असे क्लास असतात असे सांगितले. तर इमाईल डुर्काईमने आणखि खोलात जाऊन क्लास निर्माण होण्याआधी माणसे एकत्र तर यायला हवीत हा प्रश्न उभा केला आणि त्याचे निरसन “सॉलिडॅरिटी” या संकल्पनेने केले. यज्ञामुळे देखिल या एकत्र येण्याच्या विचाराला कुठेतरी पुष्टी मिळते असे मला वाटले. त्यामुळे यज्ञाचा संबंध समाजाच्या एकत्र येण्याशी आहे हे स्पष्टीकरण निदान माझ्यासाठी तरी खुप नवीन होते. आणि पटणारे होते.

आधीच वैजनाथ राजवाडेंसारख्याचे पाय ज्या वास्तुला लागले त्या वास्तुत आम्ही होतो ही जाणीवच कुठेतरी आत खुप नम्र करुन जात होती. त्यात डॉ. पाटसकरांचे बोलणे ऐकत होतो. शंका विचारल्यावर जर माहित नसेल तर त्या सरळ स्वच्छपणे मला माहित नाही असे म्हणत होत्या. डॉ. पाटसकरांच्या साध्या बोलण्याने काही प्रश्न सुटले होते. तर त्यांनी ज्यांना शिकवले असेल त्यांचे भाग्य किती मोठे असेल असे वाटले. अनेकदा असं वाटतं पुन्हा लहान होता यावं, आपले मार्ग आपल्या हाताने आखण्याची ताकद मनगटांना मिळावी आणि अशा विद्वानांच्या हाताखाली शिकण्याची संधी एकवार मिळावी.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment