तुम्ही धार्मिक असलात तर तुम्ही विज्ञाननिष्ठ असूच शकत नाही असं विधान अलिकडेच कुणीतरी केलं. मला पूर्वी अशी विधानं खुप विचार करायला लावीत. आपण कसे आहोत? वगैरे वगैरे. पण आता लक्षात आलं आहे. आपण नुसते धार्मिकच नाही तर चक्क श्रद्धाळू आहोत. आपण कुठला गुरु केला नसला तरी आपला देवावर विश्वास आहे. आपण पुजापाठ करीत नसलो तरी रस्त्यात मंदिर दिसलं की आपला नमस्कार घडतो. आयुष्यात असे काही योगायोग घडलेत की त्याचं विज्ञाननिष्ठ स्पष्टीकरण देणं मला जमलं नाही. त्यामुळे कुठेतरी श्रद्धा आहे. पण संशोधनाच्या बाबतीत जोपर्यंत सत्याची चाड आहे, पुराव्याचं महत्त्व आहे आणि पुरावा मिळाल्यास माझ्या सार्या श्रद्धा मी गुंडाळून बाजूला ठेवू शकतो तोपर्यंत मला वरील विधानाचे कसलेही दडपण वाटत नाही. वाडवळीचं फिल्डवर्क सुरु करताना असेच काही योगायोग घडले. त्या दिवशी एका शाही लग्नाला हजर राहायचं होतं. सकाळी मामाकडे उतरलो. तेव्हा कधी नव्हे ते अचानक गावच्या एका देवळात जाणे घडले. कित्येक वर्षात तेथे गेलो नव्हतो. माझ्या दिवंगत आजीची आठवण या देवळाशी निगडीत होती. लहानपणच्या आठवाणींनी हुरहुर लावली. त्यानंतर लग्नघरी गेलो. दणक्यात खर्च केलेल्या लग्नातल्या श्रीमंतीचा अनुभव घेऊन केळव्याच्या डॉ. स्मिता पाटील यांना भेटण्यासाठी दुपारी निघालो. स्मिताताईंनी दुपारी साडेतीनची वेळ दिली होती.
केळवा स्टेशनबाहेर रिक्शात बसलो. रिक्शावाल्याला स्मिताताईंचं घर माहित होतं. त्याने शेवटच्या स्टॉपनंतर फक्त दोन मिनिटे चालावं लागेल असं सांगितलं. केळव्यात रिसॉर्टसचं पेव फुटलं आहे असं नातेवाईकांकडून ऐकून होतो. रस्त्याला त्याची एक झलक मिळाली. बाकी गाव मुंबईच्या जवळ असूनही उंच इमारती फारशा दिसल्या नाहीत. पुढे गेल्यावर हिरवागार प्रान्त सुरु झाला. शेवटच्या स्टॉपवर रिक्शा थांबली. आणि काय आश्चर्य समोर चक्क शितलादेवीचे देऊळ होते. इतकी वर्षे अनेकांकडून या देवळाबद्दल फक्त ऐकले होते. पण आज देवीने जणू काही स्वतःच बोलावले. सातआठशे वर्षापूर्वी प्रतापबिंब राजाने या देवीची स्थापना केली असे म्हणतात. त्या राजाबरोबर आमचे क्षत्रिय पूर्वज येथे आले. ती महिकावती नगरी म्हणजे माहिम. आणि केळवे म्हणजे पुराणातील कदलीवह नगरी. रामायणातील अहिरावण महिरावणाची महिकावती ती हीच. आणि त्याच्या तावडीतून हनुमंताने रामलक्ष्मणाची सुटका केल्यावर दोघेही विसाव्यासाठी थांबले ती कदलीवह नगरी म्हणजे केळवे. या देवळात रामाने बांधलेले रामकुंड आहे. वाडवळी भाषेचा अभ्यास करताना हे सारे उल्लेख अपरिहार्य आहेत. त्यामुळे सुरुवात देवीच्या दर्शनाने केली. फुले नारळ विकत घेऊन आत गेलो. देवीचे दर्शन घेतले. हिस्टॉरिकल लिंग्विस्टीक्सचा अभ्यास करताना उपयोगी पडेल असे देवीचे महात्म्य सांगणारे छोटेखानी पुस्तक देवळातून विकत घेतले. देवीनेच एकाअर्थी वाडवळी फिल्डवर्कची सुरुवात करून दिली होती.
स्मिताताईंच्या घरी आलो. देवळापासून अगदी जवळच बंगला होता. आमच्या बाजूला गावी दुपार म्हणजे संपूर्ण शुकशुकाट. मला सवय असल्याने काही वाटले नाही. दिलेल्या वेळेआधीच आलो होतो. घराची दारे खिडक्या बंद होती. बेलही वाजत नव्हती. थोडावेळ तसाच बाहेर बसलो. त्यानंतर काहीवेळाने स्मिताताई घरी आहेत कि नाहीत अशी शंका आली. म्हणून कुणालातरी विचारावं म्हणून बाहेर पडलो. एक दोन बंगले सोडून एका बंगल्याचे दार उघडे होते. मुंबई असती तर कदाचित हे धाडस मी केले नसते. आत शिरलो. एक गृहस्थ बाहेर ओटीवर बसले होते. त्यांना नमस्कार करून येण्याचे कारण संगितले. त्यांनी आत बोलावून बाजुला बसवले. मी त्यांच्याशी सहज माझ्या वाडवळीच्या अभ्यासाविषयी बोललो. आणि सिसिलिया कार्व्हालो यांनी संपादित केलेल्या, विद्यापिठाने लावलेल्या “वाडितल्या वाटा” या पुस्तकासंदर्भात मी स्मिताताईंना भेटायला आलो आहे असे सांगितले. आणि काय आश्चर्य? ते गृहस्थ म्हणाले “त्या पुस्तकात माझी कविता आहे”. हे गृहस्थ म्हणजे वाडवळीतले प्रसिद्ध कवी “आरेम” निघाले. मग काय प्रत्यक्ष फिल्डवर्कला तेथेच सुरुवात झाली. आप्पांनी माझ्या सार्या प्रश्नांना यथोचित उत्तरे दिली. आपल्या खोलीत नेले. त्यांच्या पुस्तकांची माहिती दिली. मोठमोठ्या लोकांबरोबर आप्पांचे फोटो होते. त्यात एक फोटो पुलं बरोबरचा होता. तो पाहून तर आप्पांबद्दल अधिकच जवळीक वाटू लागली. आप्पा साहित्य आणि तत्सम संस्थाच्या मोठमोठ्या पदांवर काम करतात. अनेक साहित्यिक त्यांच्या घरी येऊन गेले आहेत. आप्पांचे वाडवळीवरचे चिंतन ऐकून आणि एकंदरीत त्यासंदर्भातील सामाजिक घटनांबद्दलचे त्यांचे आकलन पाहून त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही यावर विश्वासच बसत नाही. आपण फारसे शिकलेले नाही हे त्यांनीच मला सांगितले. निघताना आप्पांनी त्यांचे एक पुस्तक भेट म्हणून दिले. त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करून मी निघालो. आप्पांची भेट हा मला शुभशकूनच वाटला.
स्मिताताईंकडे आलो. प्रथमदर्शनीच त्यांच्या अतिशय सौम्य व्यक्तीमत्वामुळे माझे दडपण निघून गेले. त्या पालघर कॉलेजमध्ये मराठीच्या प्राध्यापिका होत्या. आता निवृत्त झाल्या असल्या तरी ही मंडळी कार्यरत असतात. त्यामुळे वेळ न घालवता मुद्द्यालाच हा घालून मी माझी माहिती सांगितली आणि माझ्या शंकाही त्यांच्यासमोर ठेवल्या. स्मिताताई उत्तम शिक्षिका असणार. त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. त्या सविस्तर बोलत होत्या. त्यामुळे कुठलाही मुद्दा राहून जात नव्हता. भाषेचा मुद्दा हा समाजाशी निगडीत असतो आणि आम्ही दोघेही वाडवळी समाजाचे असल्याने काही गोष्टी स्पष्ट बोलणे अवघड ठरु शकते. मात्र स्मिताताईंनी कुठलेही उत्तर टाळले नाही. त्या आपल्या विचारांत अतिशय स्वच्छ होत्या. त्यांचे पती आणि मुलगा दोघेही डॉक्टर आहेत. मध्येच त्यांचे पती आत आले. ताईंनी माझी त्यांची ओळख करून दिली. आणि काय आश्चर्य, ते आमच्याच चिंचणी गावचे निघाले. आमचे दूरचे नातेही निघाले. डॉक्टरही अतिशय सौम्य व्यक्तिमत्वाचे. त्यांनी वाडवळीबद्दल जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा लिंग्विस्टीक्समध्ये ज्याला लॅग्वेज काँटॅक्ट, लॅग्वेज शिफ्ट, लॅंग्वेज अॅट्रीशन म्हणतात ते काय असावं याचा अंदाज मला आला. पाटीलसाहेबांनी अतिशय प्रांजळपणे आपला गावाशी सततचा संबंध न राहिल्याने आपल्याला आता वाडवळी अस्खलित बोलता येत नाही असे सांगितले. त्यांची दवाखान्यात जाण्याची वेळ झाली होती. त्रेचाळीस वर्षे वैद्यकिय प्रॅक्टीस करणार्या माणसाने मला सोशियोलिग्विस्टीक्स म्हणजे प्रत्यक्षात काय असतं याची चूणून दाखवून दिली होती. त्यांच्या पायाला हात लावून त्यांची आशीर्वाद घेतले आणि पुन्हा स्मिताताईंबरोबर गप्पा सुरु झाल्या.
स्मिताताईंनी त्यांच्या बहिणीसोबत वाडवळीतील दुर्मिळ अशी शंभर गाणी मिळवून एकत्र केली आहेत. त्याचं पुस्तकही छापलं आहे. वाडवळीत लेखी साहित्य नाही. त्यामुळे हे काम फार मोठं आहे. गाणी मिळविताना आलेले त्यांचे अनुभव ऐकताना मी भाषाविज्ञानाच्या दृष्टीने विचार करू लागलो. इतर अनेक बोलीभाषांमधील शब्द या गाण्यांमध्ये मिसळलेले होते. त्यामुळे फक्त वाडवळी भाषेतीलच शब्द असलेली गाणी निवडताना त्यांना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या असतील. वाडवळी मॉर्फॉलॉजी, फोनॉलॉजी, सिमॅंटिक्स या गोष्टी त्यांना कळत नकळत लक्षात घ्याव्या लागल्या असतील. म्हणजेच वाडवळी वर्णोच्चार, शब्द, त्यांचे प्रत्यय, त्यांचे अर्थ अशा अनेक बाबींचा विचार करून त्यांना हे अवघड काम पार पाडावे लागले असेल. या गाण्यांबद्दल बोलताना एकदाच त्यांनी एक ओळ म्हणून दाखवली आणि त्यांचा खडा आवाज लक्षात आला. क्षणभरातच अगदी वाडवळ वातावरणात घेऊन जाणारा आवाज. केव्हातरी स्मिताताईंच्याच तोंडून ही गाणी ऐकायला हवी असे वाटून गेले. पुढे ही गाणी मिळविण्यासाठी त्यांनी केलेली भटकंती, वाडवळीच्या अभ्यासासाठी केलेले प्रयत्न, विद्यापिठातील पुस्तकाबद्दलचे आपले मत, ख्रिस्ती बांधवांनी वाडवळीसाठी चालवलेले प्रयत्न, सध्या वाडवळीसंदर्भात इतरत्र चाललेले काम अशा अनेक विषयांवर स्मिताताई बोलल्या. वाडवळीच्या ज्ञानाचा प्रचंड साठा त्यांच्याकडे होता. माझीच झोळी तोकडी पडत होती याची जाणीव मला झाली.
दुपार सरून संध्याकाळ होऊ लागली. माझ्या गाडीची वेळ झाली. शेवटी वाडवळीचे काम करताना कुठल्याही राजकारणात न अडकता आपण फक्त निष्ठेने आपले काम करत राहावे आणि ते कसे करावे याचा कानमंत्रही स्मिताताईंनी दिला. मी निघायच्या वेळी आत जाऊन त्यांनी एक पुस्तक आणले आणि माझे नाव त्यावर लिहून मला भेट दिले. हे वाडवळीतील शंभर गाण्यांचे पुस्तक होते. स्मिताताई निरोप देण्यासाठी बाहेर आल्या होत्या. सुरुवात शितलादेवीच्या पाया पडून झाली होती. निघताना स्मिताताईंच्या पायाला हात लावून निघालो. वाडवळीच्या अभ्यासासाठी या देवीचा आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून त्यांचेच पुस्तक मिळाले होते. आजचा दिवस सुरेख अशा योगायोगांचाच होता.
अतुल ठाकुर
वाडवळी फिल्डवर्क, लिंग्विस्टीक्स आणि योगायोग
3 Comments
Groupbl555barcarat is intriguing. Been diving into the baccarat. It depends on you what you will get you. groupbl555barcarat
Hey everyone, brt 365’s got a nice ring to it! Gave it a look, and it’s not too shabby. If you are up for wagering, then brt 365 is a good place to be.
Alright, hiii88 on my radar now! Worth checking out. You might find what you are looking for here hiii88