व्यसनमुक्तीसाठी योगाभ्यास कितपत उपयोगी पडू शकेल यावर मतमतांतरे असू शकतात. मात्र मुक्तांगणमध्ये योगाभ्यास हा व्यसनमुक्तीतील उपचारांचा एक भाग आहे आणि तो तेथे नियमितपणे घेतला जातो अशी माझी माहिती आहे. व्यसनाचे असंख्य पैलू पाहताना, त्यांचा अभ्यास करताना हे जाणवते की व्यसनात दीर्घ काळ घालवलेली माणसे शारिरीक आणि मानसिक स्तरावर खचलेली असू शकतात. त्यांना या दोन्ही स्तरांवर निरोगी होण्यासाठी योगाभ्यासाची मदत होऊ शकेल अशी माझी प्रामाणिक समजूत आहे.
बाहेर असंख्य तर्हेचे व्यायाम आणि साधने उपलब्ध असताना योगाभ्यासाचीच शिफारस आम्ही का करीत आहोत असा प्रश्न येथे काहींना पडण्याची शक्यता आहे. त्या प्रश्नाचे उत्तर असे की योगाभ्यासाची सुरुवात ही अगदी साध्या सोप्या आसनांपासून होते. जी कमकुवत शरीराला सहजपणे झेपेल अशी असते. दुसरे म्हणजे योगाभ्यासाला थोडासा निवांत वेळ, एक सतरंजी, एक टॉवेल आणि योगाभ्यास करण्याची इच्छा इतक्याच गोष्टींची आवश्यकता असते. तिसरे म्हणजे योगाभ्यास हा इतर साधनासारखा खर्चिक नाही. तो तज्ञ मार्गदर्शकाच्या हाताखालीच शिकावा हे खरे असले तरी तुम्ही तो एकदा नीट शिकून घरी देखिल करू शकता.
येथे कुठल्याही तर्हेने इतर साधनांपेक्षा योग श्रेष्ठ कसा हे सांगण्याचा प्रयत्न नाही. मी योगाची शिफारस करण्याचे एकमेव महत्त्वाचे कारण म्हणजे माझा त्याबाबतचा एक विद्यार्थी म्हणून किंचित अभ्यास आहे. शिवाय व्यसनामुळे अशांत झालेले मन ताळ्यावर आणण्यासाठी त्यातील संथ हालचाली पूरक ठरु शकतील असे मला वाटते. योगाभ्यास हा फक्त व्यसनी माणसासाठीच उपयुक्त आहे असे नव्हे तर तो व्यसनी माणसाच्या घरच्या लोकांनादेखिल तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकेल. म्हणूनच ज्याप्रमाणे व्यसन हा कुटुंबाचा आजार आहे असे म्हटले जाते त्याचप्रमाणे योग हे कुटुंबाचे औषध आहे असे म्हटले पाहिजे असे मला नम्रपणे म्हणावेसे वाटते.
अतुल ठाकुर
योगाभ्यासाची आवश्यकता