You are here:
योगवासिष्ठ आणि समुपदेशन

योगवासिष्ठातील दैव आणि पौरुष प्रयत्नाचे वर्णन मुमुक्षु प्रकरणात आले आहे. त्यात निरनिराळ्या उदाहरणांच्या सहाय्याने पौरुषप्रयत्न कसा वरचढ असतो हे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अनेकदा असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात असे दृष्टांत, उपमा यांचा सढळ हस्ते वापर केला जावा. जरी योगवासिष्ठ हे प्रामुख्याने अद्वैत तत्वज्ञान प्रस्थापित करत असले आणि मनोनाश हा त्याचा उद्देश असला तरी त्यात अनेक गोष्टी असा आहेत ज्या समुपदेशनात वापरता येतील. ज्याला आपण नशीब म्हणतो ते देखील पूर्वजन्माचे कर्मच असते असे सांगून दैववादाचा त्यात निकाल लावला आहे. आणि या जन्मातील कर्माचा जोर वाढवल्यास आधीच्या जन्मातील कर्माचा प्रभाव जो दैवाच्या रुपाने आपल्याला अनुभवास येत असतो तो नाहीसा करता येतो असे म्हणून योगवासिष्ठकारांनी फार मोठी आशावादी झेप घेतली आहे असे मला वाटते.

प्राक्तन म्हणजे आधीचे कर्म आणि आजचे प्रयत्न यांची सातत्याने दोन मेंढ्याची टक्कर व्हावी अशी टक्कर चाललेली असते. त्यात जो वरचढ ठरतो तो जिंकतो. असे मुमुक्षु प्रकरणात स्पष्टपणे नमुद केले आहे. आमच्या समुपदेशन क्षेत्रात बहुतेकदा कुठल्यातरी अदृष्य शक्तीच्या प्रभावाखाली वावरत असल्याप्रमाणे माणसे आपल्या समस्यांचे वर्णन करत असतात. उदाहरण द्यायचं झालं तर व्यसनाचं देता येईल. बहुसंख्य व्यसनी माणसे पुन्हा व्यसन सुरु झालं की जणु ते आपोआप सुरु झालं या सूरात बोलतात. इतकी वर्ष काही नव्हतं अचानक पुन्हा सुरु झालं. मात्र खोदून खोदून विचारलं तर खरं कारण कळतं. हे कारण लक्षात आलं तर घसरगुंडी होण्याचा एक मार्ग बंद करता येतो. आणि येथे पौरुष प्रयत्नांची आवश्यकता असते.

या ठिकाणी योगवासिष्ठातील मुमुक्षु प्रकरणाचा फार चांगला उपयोग होईल असे वाटते. योगवासिष्ठकार अतिशय चिकाटीने आणि आक्रमकपणे पौरुष प्रयत्नांचा पुरस्कार करताना दिसतात. त्यात दिलेले दृष्टांत, उदाहरणं ही माणसाला कृती करायला प्रेरीत करु शकतात असे मला वाटते. एखादा माणुस राजमार्गावरून जात असताना हत्ती त्याच्या गळ्यात माळ घालतो आणि त्या दरीद्री माणसाला राजा बनवले जाते हे त्याचे दैव नसून पूर्वायुष्यातील सत्कर्म आहे असे योगवासिष्ठकार म्हणतात. आणि त्याच वेळी जर नगरातील लोकांनी प्रयत्न करून असा पण ठरवला नसता, हत्तीची व्यवस्था केली नसती तर हा परिणाम दिसलाच नसता असेही ते अधोरेखित करतात. पूर्वायुष्यातील कर्माला प्राक्तनाचे रुप देऊन, दैवाच्या आश्रयावर विसंबून राहून, फारसे काही न करणाऱ्या लोकांवर योगवासिष्ठकारांनी कठोर टीका केली आहे.

हे सारे आताच लिहिण्याचे कारण सध्या मुंबई विद्यापिठात योगशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणे सुरु आहे. आणि त्या निमित्ताने योगाच्या काही प्राचिन ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. पूर्वी हे ग्रंथ वाचताना फक्त योगाचाच विचार मनात असे. आता मात्र मानसशास्त्राची पार्श्वभूमी डोक्यात असताना या ग्रंथांतील तत्वांचे नवनवीन अर्थ लक्षात येऊ लागले आहेत. त्यांचा वापर रोजच्या समुपदेशनात करणे आणि त्याचा परिणाम पाहणे हे रोचक ठरु शकेल असे मला वाटते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment