लॉकडाऊनच्या काळात घरात बसुन लॅपटॉपवर स्वतःचे नवीन प्रोजेक्ट सुरु करणार्या माझ्यासारख्याला लॅपटॉप बिघडणे परवडणारे नव्हते. डेस्कटॉप असताना तो उघडून काही दुरुस्ती करु शकत होतो. पण लॅपटॉप उघडून काही करणे नको वाटते. माझ्या लॅपटॉपने चार्ज होणे बंद केले आणि मी विचारात पडलो. पाऊस आणि त्यात दुकाने बंद. गोष्ट साधारण महिनाभरापूर्वीची आहे म्हणजे लॉकडाऊन कडक असताना ही घटना घडली. जवळच्या मार्केटमध्ये गेलो ते तो लॅपटॉप पाहून ढेपाळला. मात्र त्याने मासळीबाजारात जा तेथे एक तरबेज मेकॅनिक आहे. खुप फेमस आहे. उभ्या उभ्या तुमचं काम करून देईल. मासळीबाजार माहित होता पण तेथे कोळणी बोंबिल, पापलेट, सुरमईचे तुकडे सरसर कापताना बाजूलाच एखादा हार्डवेयर, सॉफ्टवेयर, सीपीयु अशा भाषेत बोलत असेल हे चित्र कल्पना ताणूनही डोळ्यासमोर येईना.
संभ्रमावस्थेतच बाजारात गेलो. तेथे शुकशुकाट होता. मासळी ठेवण्याची बाकडी एकटीच बापुडवाणी वाटत होती कारण त्यांच्या मागे त्या खमक्या कोळीणी नव्हत्या. कसलं चैतन्यच नव्हतं तेथे. मग विचार केला कदाचित मासळीबाजार हा लॅंडमार्क म्हणून सांगितला असेल. म्हणून जरा आधुनिक वाटणार्या पुढच्या इमारतींमध्ये जाऊन आलो. पण कुणालाच काहीच माहित नव्हते. बहुतेक ठिकाणी मास्क लावलेली माणसे वावरत होती. एकंदरीत वातावरण उदासवाणे तरी होते किंवा मलाच उदासवाणे वाटत होते. शेवटी पुन्हा बाजारात आलो. एका ठिकाणी फक्त एकावेळी एकच माणूस आत जाऊ शकेल अशी अरुंद गल्ली होती. त्या गल्लीत शिरलो.
आत एकजण अगदी छोट्या पत्र्याच्या दुकानात शिलाईचे काम करीत बसला होता. नकाराची अपेक्षा ठेवतच कंप्युटर मेकॅनिकबद्दल चौकशी केली. आणि अहो आश्चर्य! तो त्याचा भाऊच निघाला. पण आज तो आला नाही हे शुभ वर्तमान त्याने दिले. पण टेलर भावाला मेकॅनिक भावाची काळजी असावी. त्याणे स्वतः फोन करुन त्याला कुणीतरी कंप्युटर रिपेयरींगसाठी आले आहे असे भावाला कळवले आणि मलाही त्याचा नंबर देऊन त्याला फोन करण्याचे सुचवले. नशीब हे की तो यायला तयार झाला आणि पंधरावीस मिनिटांच्या अंतरावरच तो राहात होता. आता वाट बघणे आले. समोर गल्लीबाहेर एक गॅरेज होते तेथे उभा राहिलो. एकदोन वेळा त्याला फोनही केला. पंधरा मिनिटात येतो म्हणाला. गॅरेजमध्ये काम करणार्यांपैकी काहीजण मास्क लाऊन होते तर काही करोना नावाची गोष्ट अस्तित्वातच नसल्यासारखे वागत होते. थोड्याच वेळात फोन आला की मी आलो आहे तुम्ही आत या. पुन्हा गल्लीत गेलो. तर एक मध्यमवयीन गृहस्थ मास्क घालून समोर उभा होता.
आता मी माझं दुकान उघडणार नाही हे दुसरे शुभ वर्तमान त्याने मला देऊन मला थेट मासळी बाजारातच नेले. आणि तेथे एका टपरीवजा शेडमध्ये बसून त्याने माझ्याकडे लॅपटॉप मागितला. मला क्षणभर काही कळेचना. पण त्याच्याकडे एक पिशवी होती. त्यात त्याची सगळी हत्यारे होती. मी लॅपटॉप त्याच्या हातात दिला. शेजारी आणखी एक माणुस होता. त्याचा दोस्त असावा. त्याच्यासाठी ते नेहेमीचेच असावे. “अरे चष्मा डालके काम कर” तो दुसरा गृहस्थ म्हणाला. म्हणजे आमचे मेकॅनिकसाहेब चष्मा बहुधा घरी विसरुनच आले होते. आता मला लॅपटॉप नीट होईल याची खात्री वाटेना. पण साहेबांनी हा हा म्हणता लॅपटॉप उघडला. कसली तरी वायर आतून खेचून काढली. मी त्याचा मोबाईल धरून प्रकाशयोजना सांभाळत होतो. बघतो तर त्याने चक्क त्याच्या पिशवीतून सॉल्डरींग करण्याची हत्यारं काढली आणि खेचलेली वायर पुन्हा चिकटवून टाकली. पुन्हा इथलं काही तरी काढ त्यात करंट पास होतो का बघ असं त्याचं चाललं होतं.
साधारणपणे अर्ध्या तासाने मला माझा विंडोस्क्रिन दिसला आणि त्या मासळीबाजारातच मला आनंदाने उड्या मारावेसे वाटू लागले. मग साहेबांनी मला लॅपटॉप कसा वापरावा यावरही छोटेखानी व्याख्यान दिले. कसलिही अपेक्षा नसताना लॅपटॉप रिपेयर झाला होता. आता त्याने लॅपटॉपवरच काय पण संस्कृत, समाजशास्त्र किंवा योगावरही व्याख्यान दिले असते तरी ते निमूटपणे ऐकण्याची माझी तयारी होती.
अतुल ठाकुर
मासळीबाजारातील मेकॅनिक
3 Comments
Hey, tried my luck at 222wincasino the other day. Pretty solid selection of games, and the signup bonus was a nice little boost. Definitely worth checking out if you’re looking for a new spot to play. Go give 222wincasino a whirl!
Been messing around on 718betapp recently. Gotta say, the user interface is pretty clean and easy to navigate. Makes finding what you’re looking for a breeze. Give 718betapp a shot if user-friendliness is your jam.
Got mega777apk on my phone and I am loving the accessibility. All my favorite slot games right at my fingertips. Works flawlessly, no lag. mega777apk is a good choice!