प्राचिन भारतात अनेक मान्यवर, आदरणीय विद्वान होऊन गेले. त्यातील काहींचे काम इतके प्रचंड आणि जबरदस्त आहे आहे की त्यांच्याशी कदाचित मतभेद असु शकतील मात्र त्या विषयात त्यांना टाळून पुढे जाता येत नाही. दहाव्या शतकातील अभिनवगुप्त हा बहुधा काव्यशास्त्राच्या प्रांतात एकमुखाने मान्यताप्राप्त असलेला विद्वान. भारताचा काश्मीर हा भाग फक्त पृथ्वीवरील नंदनवन म्हणून नावाजला गेला असला तरी फार पूर्वीपासून येथे संस्कृत विद्वानांची परंपरा आहे. अभिनवगुप्ताचे पूर्वज जरी काश्मीरनिवासी नसले तरी ते काश्मीरात येऊन राहिले आणि येथेच अभिनवगुप्ताचा जन्म झाला. पुढे अभिनवगुप्त काश्मीरी शैव परंपरेचा तत्त्वज्ञ, तंत्रशाखेचा आचार्य आणि काव्यशास्त्रातील विद्वान म्हणून ओळखला गेला. एकाचवेळी आपल्या आयुष्यात अगदी वेगवेगळ्या शाखांमध्ये ज्याला “पाथ ब्रेकींग” म्हणता येईल असे काम करणारी माणसे दुर्मिळच. त्यात अभिनवगुप्ताचा समावेश होतो. काश्मीरी शैव परंपरेचे “प्रत्याभिज्ञा” हे तत्त्वज्ञान मांडणारा तो श्रेष्ठ तत्त्वज्ञ आहे. तंत्रालोक सारखा अनेक खंडांमध्ये विभागलेला ग्रंथ त्याने लिहिला आहे. भरताच्या नाट्याशात्रावर सर्वांनी गौरवलेली अभिनवभारती ही टीका त्याने लिहिली आहे. आनंदवर्धनाच्या ध्वन्यालोकावर जगप्रसिद्ध लोचन टीका त्याचीच आहे. ही फक्त ठळक नावे आहेत. अतिशय विपुल लेखन अभिनवगुप्ताच्या नावावर आहे.
अगदी वेगवेगळ्या क्षेत्रात अशा तर्हेचं मूलभूत लेखन करणार्या विद्वानाची तोंडओळख करुन देण्यासाठी गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापिठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या डॉ. कामिनी गोगरी यांचे व्याख्यान संस्कृत विभागाने ठेवले होते. बाई स्वतः अभिनवगुप्ताच्या प्रत्याभिज्ञा तत्त्वज्ञानाच्या नुसत्या जाणकारच होत्या असे नसून त्या त्यातील तांत्रिक अंगाचे प्रत्यक्ष शिक्षण घेऊन आल्या होत्या असे त्यांची ओळख करून देताना सांगण्यात आले होते. योग तत्त्वज्ञानासारख्या सर्वच तत्त्वज्ञानाच्या शाखा प्रत्यक्ष शारीरिक स्तरावर प्रयोग करून पाहाण्यासारख्या नाहीत अशी माझी समजूत आहे. मात्र प्रत्याभिज्ञा हे तत्त्वज्ञान प्रयोगक्षम आहे. त्यात अनेक तंत्र अंतर्भूत आहेत. ही तंत्रे प्रत्यक्ष गुरु कडून शिकुन ती विशिष्ट जीवनपद्धती आचरून बाई त्याबद्दल बोलणार होत्या त्यामुळे माझे कुतुहल वाढले होते. बाईंनी बर्याच प्रमाणात माझी या विषयाच्या बाबतीतली जिज्ञासा पूर्ण केली हे सुरुवातीलाच मान्य करुन टाकतो. त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे सांगत रेखीवपणे प्रत्याभिज्ञा शास्त्राच्या ठळक बाजु समोर आणल्या. अशा तर्हेचे व्याख्यान ठेवल्याबद्दल विभागप्रमुख डॉ. माधवी नरसाळे यांचे आभार मानून पुढे मला हे देखील सांगावे लागेल की जेव्हा या तंत्राबद्दल मी समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून काही शंका विचारल्या तेव्हा बाई माझे फारसे समाधान करु शकल्या नाहीत.
अभिनवगुप्ताचा काळ दहाव्या शतकाचा उत्तरार्ध व अकराव्या शतकाचा पूर्वार्ध हा मानला जातो. सोमानंद हे प्रत्याभिज्ञा दर्शनाचे प्रमुख तत्त्वज्ञ मानले जातात. सोमानंद यांच्याकडून उत्पलदेव यांच्याकडे आणि उत्पलदेवांकडून ही परंपरा अभिनवगुप्ताकडे आली. शैवसिद्धान्त ही काश्मिर आणि दक्षिणभारतातदेखिल प्रचलित होता. मात्र दक्षिणेकडील हा संप्रदाय द्वैती असून काश्मिरातील मात्र वेदान्ताशी जवळीक ठेवणारा एकेश्वरवादी होता. या संप्रदायाची प्रमुख तीन तत्त्वे बाईंनी सांगितली. क्रम, कुल आणि स्पंद. ज्याप्रमाणे परमसत्य म्हणजे ब्रह्म असे वेदान्तात म्हटले जाते त्याचप्रमाणे शिव हे प्रत्याभिज्ञा तत्त्वज्ञानीतील परमसत्य गणले जाते. क्रम याचा अर्थ टप्प्याने होणारी प्रगती. कदाचित क्षणात लाभणार्या आत्मज्ञानाला ही मंडळी मान्य करीत नसावीत. कुल याचा अर्थ वैश्विक जाणीव आणि स्पंद याचा अर्थ स्पंदन किंवा व्हायब्रेशन. यापूर्वी समाजात सूस्थिर झालेल्या सांख्य, वेदान्त आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा भक्कम आधार प्रत्याभिज्ञा तत्वज्ञानाला आहे. सांख्यांची पंचवीस तत्त्वे तर प्रत्याभिज्ञा तत्त्वज्ञानात छत्तीस तत्त्वे मानली आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानात जगताचे वर्णन करताना त्याला नदीची उपमा दिली गेली आहे. दिसताना वाहणारी नदी तीच असते मात्र डोळ्यासमोर असणारे पाणी तेच नसते. याप्रमाणे सतत बदल होणारे जगत हे बौद्ध जगाचे स्वरुप मानतात. हा बदल प्रत्याभिज्ञाकारांनी आपल्या स्पंद तत्त्वात घेतला. सतत स्पंदन पावणारे तत्त्व. वेदान्तातून एकेश्वरवाद तर घेतला. अर्थातच प्रत्याभिज्ञाकारांचे या सर्व शाखांशी मतभेद असण्याची शक्यता आहेच. अन्यथा हे वेगळे तत्त्वज्ञान निर्माण झालेच नसते.
प्रत्याभिज्ञा तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमि सांगून बाई पुढे काही तांत्रिक बाबींकडे वळल्या. या मार्गात जवळपास एकशेवीस प्रकारच्या ध्यानाच्या पद्धती सांगितल्या आहेत. त्यातील काही प्रक्रियांबद्दल अतिशय मनोरंजक माहिती त्यांनी दिली. मात्र प्रश्नोत्तरे सुरु असताना आचार्य रजनीश ज्या संभोगातून समाधी या मार्गाचा प्रचार करीत होते साधारण तशाच प्रकारचा हा मार्ग आहे की काय असा प्रश्न मी विचारला आणि वादाला सुरुवात झाली. बाईंनी या प्रश्नाचे उत्तर नाकारले नाही. मात्र स्त्री पुरुष संयोगातून घडणार्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गाशी आजच्या समाजातील नैतिकतेचा मुद्दा जोडल्यावर त्या बहुधा माझ्यावर वैतागल्या. नैतिकता ही व्यक्तीसापेक्ष असते असे त्यांचे म्हणणे पडले. आणि रॅशनालिटी या शब्दावर तर त्यांचा विशेष राग दिसला. मुळात मला कुठलेही तत्त्वज्ञान हे एखाद्या निर्वात पोकळीत जन्म घेते असे वाटत नाही. त्याला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकिय अशी अनेक प्रकारची कारणे असतात. त्या तत्वज्ञानाच्या प्रसाराला आणि र्हासाला देखिल हे घटक कारणीभूत ठरतात. अशावेळी अगदी दहाव्या शतकातली नीतिमूल्ये वेगळी असली असे क्षणभर गृहीत धरले तरी ती एकवीसाव्या शतकात जशीच्या तशी लागु करता येतील का हा प्रश्न शिल्लक उरतोच.
दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानात शैवसिद्धान्ताला स्थान देण्याच्या बाबतीतला. आपल्या परंपरेत न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग ही सहा वैदिक दर्शने तर चार्वाक, बौद्ध आणि जैन ही तीन अवैदिक अशी नऊ दर्शने मानली जातात. बाईंचे म्हणणे शैव सिद्धान्त हे दहावे दर्शन मानायला हवे. ध्यान, श्वसनाच्या प्रक्रिया, प्राणायाम यांची योगातील परंपरा प्राचीन आहे. राजयोगासारखा मार्ग खुला असताना दुसरा एखादा याच गोष्टी आणि काही तांत्रिक क्रिया सांगणारा तुलनेने अवघड मार्ग माणसाने का निवडावा असा विचार माझ्या मनात आला. शिवाय ज्यावर सांख्य, योग, बौद्ध आणि वेदान्त या आधीच प्रचलित असलेल्या तत्त्वज्ञानातील काही गोष्टींची दाट छाया आहे अशा तत्त्वज्ञानाचा समावेश नऊ दर्शनांमध्ये केला गेला नसावा. कारणे काहीही असोत मात्र या शंकांचे निरसन झाले नाहीच. स्त्रीपुरुष संयोगामुळे आत्मसाक्षात्कार होत असेल तर मोक्षासाठी स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे हे देखिल आले आणि काही प्रमाणात त्यामुळे पराविलंबत्वही आले असा विचार माझ्या मनात नंतर आला. असे इतर मार्गांचे नाही. शिवाय समजा यातून साक्षात्कार होत जरी असला तरी हा मार्ग निसरडा आणि धोक्याचा आहे ज्यात पतनाचे भय आहे असा आहे अशी माझी आजदेखिल समजूत आहे ती या व्याख्यानाने दूर झाली नाही. कदाचित हे तत्त्वज्ञान समजण्याची माझी तयारी अजूनही झाली नसेल असे समजून मी गप्प बसलो.
मात्र अर्थातच अभिनवगुप्ताबद्दलचा आदर मात्र जराही कमी झाला नाही. उलट त्याचा एक आणखो पैलू लक्षात येऊन तो दुणावलाच. एकच माणुस अगदी वेगळ्या क्षेत्रांमध्ये किती मूलभूत काम करु शकतो याचे ते फार मोठे उदाहरण आहे. पूर्वी माझ्या मनात मार्ग, तत्त्वज्ञान आणि आपले संशोधन याबद्दल शंका असायची. मात्र माझ्या एका अतिशय विद्वान संशोधक मैत्रिणीने माझे कान पिळले होते. ती म्हणाली होती की एखाद्या गोष्टीबद्दल तिटकारा असेल तर संशोधन करु नकोस. मात्र एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे आणि तिची भलावण करणे या दोन अगदी वेगळ्या बाबी आहेत हे नेहेमी लक्षात ठेव. संशोधनविषयाशी वैयक्तिक पूर्वग्रह चिकटवू नकोस. ते दूर ठेव. जुन्या गोष्टींना स्वतःची नैतिक मूल्ये लावून तपासत बसू नकोस. तिचे हे म्हणणे मी मनावर कोरून ठेवले आहे. त्यामुळे आता कसली चलबिचल नसते. शंका स्वच्छपणे मांडायची. निरसन झाले तर ठिक नाहीतर ती मनात ठेऊन पुढे जायचे, दुसर्या जाणकारांना ती विचारायची असे ठरवले आहे. माझ्या मनातल्या नाना शंका कुशंकांना न कंटाळता उत्तरे देणारे गुरुजन सुदैवाने लाभले असं आजच एका ठिकाणी म्हणालो. सहाध्यायांनीही माझ्या शंकांचा कंटाळा केला नाही. त्यामुळे शंका विचारत, त्यांचे निरसन करुन घेतच अभिनवगुप्ताबद्दलच्या माझ्या कुतुहलाचा प्रवास सुरु राहणार हे नक्की. त्यातील काही शंकांचे निरसन केल्याबद्दल डॉ. कामिनी गोगरी यांचे आभार आणि अशा तर्हेचे व्याख्यान ठेवल्याबद्दल डॉ. माधवी नरसाळे यांचेदेखिल आभार.
अतुल ठाकुर
(२३ मार्च २०१७)
मागोवा अभिनवगुप्ताचा…