प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसाची तुलना कधीकधी संपूर्णपणे नशेत असलेल्या माणसाशी केली जाते. अशावेळी चाल शराबी असेल आणि रफीसारखा गायक गात असेल तर ती प्रेमातली शराब आणखीनच धुंदी आणणार नाही काय? ” फिर आने लगा लगा याद वोही प्यार का आलम” हे “ये दिल किसको दूं” मधी एव्हरग्रीन गाणे. याला इकबाल कुरेशीने ही झिंग आणणारी चाल दिली आहे. रफीने तर अनेक ओळी नशेच्या अंमलाखाली असलेली माणसे काही शब्द किंचित ओढून म्हणतात तशा म्हटल्या आहेत आणि प्रेमात पार बुडालेला आशिक नुसत्या आवाजाने उभा केला आहे. त्यातच कमर जलालाबादिचे शब्द. “कब आये थे वो कब गये कुछ याद नही है”..प्रेमाचे सुरापान केल्यावर कसलिच आठवण राहात नाही याची साक्ष देणारे.
ही उर्दूची मंडळी गीत लिहिताना कमाल करून जातात. मी अडखळलो ते यातील सर्व ए खिरामा शब्दावर. अर्थ कळला तो सुरेख होता. एका सरळ वाढणाऱ्या सुंदर झाडाचे तुलना प्रेयसीशी केली आहे. हे सरळ वाढणारे झाड सरुचे असावे. या सुरेख झाडासारखा सुंदर बांधा असलेली आणि खिरामा म्हणजे डौलदार चाल असलेली प्रेयसी. अशी प्रेयसी असल्यावर झिंग येण्यासाठी सुरापान करण्याची आवश्यकता नाही हे जाणकारांना सांगण्याची आवश्यकता नाही. गीतात असे नशीले शब्द कमर जलालाबादीने पेरले आहेत. त्यातच निरनिराळे सुंदर वेश बदलून रागिणीसारखी अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना इक्बाल कुरेशीच्या संगीतावर थिरकत असेल तर मूर्तीमंत मदिराच पडद्यावर दिसणार.
गाण्यात दोन अतिशय देखणी माणसे आहेत. शशी कपुर नृत्यासाठी कधीही प्रसिद्ध नव्हताच. मात्र “या एव्हरग्रीन गाण्यासाठी त्याने काही स्टेप्स घेतलेल्या दिसताहेत. त्यावेळी त्याने आपला भाऊ शम्मी कपूरचे स्मरण केलेले दिसतेय. त्याचे काही लटके झटके पाहताना पटकन शम्मीची आठवण येते. रफीने धुंद शराबी आवाज सुरुवातीपासुनच लावलाय. त्याला जोड आहे शशी कपूरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकाची. शशी कपुरचा चेहराच पाहून घ्यावा. ही जुनी माणसे किती सूक्ष्म विचार करीत. हा नायक नुसता प्रेमात बुडालेला नाही तर त्यापुढे जाऊन त्याला प्रेमाची नशा चढली आहे हे त्याचा चेहरा पाहूनच कळून येते.
रागिणीबद्दल काय बोलावे? गोड चेहरा, सुरेख बांधा आणि अभिजात नृत्यातील पारंगतता घेऊनच या दाक्षिणात्य अभिनेत्री जन्माला येतात. एखादी मासोळी पाण्यात सळसळत असावी तसे तिचे नृत्य वाटते. खुप वेगाने केलेले हे नृत्य सोपे नाही पण तिच्या नृत्यातली सहजता लगेच कळुन येते. तिला फक्त एकच ओळ दिली आहे आणि त्या “प्यार का आलम” या एवढ्याच ओळीसाठी सुप्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आवाज दिला आहे. इकबाल कुरेशीने काही मोजकी गाणी दिली आहेत. त्यात रफीचे माईलस्टोन म्हणवले जाणारे “सुबहा ना आयी शाम ना आयी” हे “चा चा चा” मधील प्रसिद्ध गाणेही आहे. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. आज मात्र हे शराबी गाणेच गुणगुणावेसे वाटते..मै कैसे भूला दूं तेरी रफ्तार का आलम…”
अतुल ठाकुर