आम्ही विनोद खन्ना प्रेमी. त्यामुळे “मेरा गांव मेरा देश” मध्ये धर्मेंद्रची तो सुरुवातीला धुलाई करतो तेव्हा मजा आलेली. पण नंतर कधीतरी “सत्यकाम” पहिला आणि हा माणुस वेगळा आहे हे लक्षात आले. सत्याला चिकटून राहणारा, त्याचा पाठपुरावा करणारा माणुस त्याने शंभर टक्के खरा वाटेल असा साकारला होता. त्याचा हा चित्रपट आजही मला खूप महत्वाचा वाटतो. आपल्याला आरसा दाखवणारा…
धर्मेंद्र मला लोणचे मुरल्यावर जास्त चविष्ट लागते तसा हळूहळू आवडू लागला होता. या माणसाला विनोदी अभिनयचं जबरदस्त अंग आहे हे अनेक चित्रपटांमध्ये दिसून आलं. त्यानंतर त्याचं तगडं मर्दानी सौंदर्य जाणवलं. “पल पल दिल के पास ” गाण्यात राखी तर देखणी दिसतेच पण धरम पाजी जबरदस्त हँडसम दिसतात. उगाच स्वप्नसुंदरी त्याच्या प्रेमात पडली नाही. बाकी धर्मेंद्रने वाईट काम केलं आहे असा चित्रपट मला आठवत नाही.
सुरुवातीचे त्याचे ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील चित्रपट जर पाहिले तर काही रफीची काही जबरदस्त गाणी त्याला मिळालेली दिसतात. त्यातलं मला अतिशय आवडणारं म्हणजे ” जाने क्या ढुंढती रहती हैं ये आँखे मुझमे “, “जीत ही लेंगे बाजी हम तुम”, ” ये दिल तुम बिन कही लगता नही “, “दिलने फिर याद किया”, “आपकी हसीन रुख पे “, ” छलकाये जाम “, ” मै निगाहे तेरे चेहरे से “, ” मुझे दर्दे दिल का पता न था “… अशी किती गाणी सांगावी?
स्क्रीन प्रेझेंस म्हणजे काय हे धर्मेंद्र पडद्यावर आला की कळायचं. मारामारी करताना हा माणुस खरोखर तीन चार जणांना एकावेळी लोळवू शकेल असंही वाटायचं. बाकी त्याचे नंतरचे चित्रपट फारसे पाहिले नाहीत. मला वाटतं मी त्याचा मुद्दामून पाहिलेला शेवटचा चित्रपट “हुकूमत” असावा.
या चित्रपट सृष्टीने राजेश खन्नाचे युग पाहिले, त्यानंतर अमिताभचे पाहिले, अनेक स्टार्स, अभिनेते आले गेले पण धर्मेंद्र टिकून राहिला. आपला बाज आणि आब त्याने शेवटपर्यंत राखला. धर्मेंद्र आता विस्मरणात गेला असं कधी झालंच नाही. हे मला त्याच्या कारकिर्दीच फार मोठं यश वाटतं.
त्याच्या हास्यात लहान मुलासारखं काहीतरी निर्व्याज असं होतं. त्याचा स्वभावही तसाच असावा असं त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी एकून वाटतं. मला तर धर्मेंद्र गेला म्हणजे घरातलं कुणीतरी मोठं माणुस गेल्यासारखं वाटलं. असं माणुस ज्याच्या नुसत्या असण्यानेच आपल्याला आधार वाटतो.
म्हणून त्याच्याच एका गाण्याचा आधार घेऊन म्हणावंसं वाटतं. तो गेला असला तरी… प्यार का बंधन, जनम का बंधन, जनम का बंधन टुटेना…
अतुल ठाकुर