…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल का असा फोन विभागप्रमुख डॉ.शकुंतला गावडे यांचा आला आणि मनात अनेक भावनांची गर्दी झाली. पहिली भावना अर्थातच आनंदाची. आवडता विषय, आणि जवळपास रोजच्या अभ्यासाचा विषय म्हणून हठयोगाबद्दल आदर, जिव्हाळा तर आहेच. शिवाय तो शिकवायला मिळणार म्हणजे आपोआपच त्या विषयाच्या अभ्यासात राहण्याचे सुख मिळेल ते वेगळेच. दुसरी भावना किंचित दडपणाची. ती यासाठी की मी स्वतः विद्यार्थी असताना डॉ. माहुलीकरमॅडम, डॉ. परिणीता देशपांडे मॅडम यांच्यासारखे दिग्गज शिक्षक शिकवायला होते. शिक्षक म्हणून त्यांची बरोबरी मला करता येणं शक्य नाही याची मला नम्र जाणीव आहे. पण निदान त्यांच्या चार पाच टक्के तरी मी जवळ जाऊ शकलो तर मला धन्य वाटेल. तिसरी भावना होती ती जबाबदारीची.
मी स्वतःला एका अतिशय लहान प्रमाणावर योगाचा विद्यार्थी मानतो. जमेल तसा आणि झेपेल तसा माझा सराव सुरु असतो. अजूनही त्यात आवश्यक असा नियमितपणा नाही आणि त्या अभ्यासाला जो कस हवा तो नाही हे मान्य करताना मला लाजच वाटते. पण प्रयत्न सुरु असतो. अलिकडे योगक्षेत्रात पाहायला गेलं तर ज्या क्षेत्रात सुरुवात आसनांपासून म्हणजे शारिरीक क्रियांपासून होते त्या क्रियांनाच आता दुय्यम स्वरुप आलेले दिसत आहे. सगळ्यांना थेट ध्यानात रस आहे. कुठलाही अभ्यास करताना पद्मासन करणे गरजेचे नाही असे घाईघाईने सांगीतले जाते. जमल्यास पद्मासन करा, सुखासन करा, नाहीतर साधी मांडी घालून बसा किंवा खुर्चीवर बसा असे सांगून योगाच्या सर्व अभ्यासात अपार सोपेपणा आणण्याचा आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. याचा उद्देश जरी चांगला असला तरी एकंदर हा विचार इष्ट नाही असे माझे मत आहे.
साधी मांडी घालून बसायला सांगण्यामागे सुरुवातीला माणसाला योगाभ्यास करण्यास उत्साह वाटावा, त्याचा हिरमोड होऊ नये हा उद्देश असतो. शिवाय ज्येष्ठ नागरिक, संधीवातासारखी दुखणी असलेली मंडळी यांना काही आसने करता येणे कठीण असते. मात्र ज्यांना शक्य आहे त्यांनी सोप्या अभ्यासापासून सुरुवात करुन पुढे आदर्श आसन गाठायला हवे असा संकेत आहे. मात्र जेव्हा सरसकट त्याची गरज नाही असे सांगितले जाते तेव्हा पुढे ही आदर्श स्थिती गाठण्यासाठी विद्यार्थ्याने प्रयत्न करण्याची शक्यताच संपते. मला अनिष्ट वाटते ती नेमकी हीच गोष्ट. तेच प्राणायामाच्याही बाबतीत. अलिकडे बागेत, पाय खाली सोडून, इतर सर्व व्यायामासोबत प्राणायाम केला जातो. त्यानंतर हास्ययोग किंवा झुंबाही करत असतील. माझा कुठल्याही व्यायामपद्धतीला विरोध नाही. मात्र त्यांचे एकत्रीकरण केले जाऊ नये अशी अपेक्षा आहे. कारण योग परंपरेची एक मांडणी आहे. ती अष्टांग योगाच्या रुपाने लोकांसमोर आहे. त्यात इतर पद्धतींचा समावेश आवश्यक आहे असे मला वाटत नाही.
शिक्षक म्हणून स्वात्माराम यांचे हठयोगप्रदिपिका शिकवताना हे सर्व प्रश्न ऐरणीवर येणार आणि त्यांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी लागणार कारण हठयोगात शारिरीक अभ्यासाचे महत्व अधोरेखित केलेले आहे. हठयोगाशिवाय राजयोग शक्य नाही असे त्यात स्पष्टपणे म्हटले गेले आहे. या निमित्ताने वर्गात जी चर्चा होईल त्याबद्दल मला फार उत्सुकता आहे. हा विषय शिकवण्यास मी होकार दिला याचे एक महत्वाचे कारण म्हणजे मला स्वतःला संस्कृतच्या अभ्यासात राहता ्येईल हे आहे. या देववाणीच्या प्रेमात मी फार पूर्वीपासून आहे. बहुधा या शिकवण्याच्या निमित्ताने तिने माझ्यावर कृपा करायचं ठरवलेलं असावं अशी माझी श्रद्धा आहे. शिक्षक म्हणून जाणार असलो तरी अभ्यासाचा आनंद फार मोठा त्यामुळे माझी भूमिका आज आणि कायमच विद्यार्थ्याचीच राहणार आहे.
या निमित्ताने मला आता माझ्या स्वतःच्या अभ्यासाबद्दल गंभीर व्हावे लागेल. हठयोग विषय शिकवणाऱ्याचे स्वतःचे पोट पुढे असता कामा नये असे मी स्वतः मानतो. त्यामुळे आता योगाभ्यासाचा नियमित सराव करावा लागेल. अनेकांना हा विचार बालिश वाटेल. पण माझं जरासं असंच आहे. संस्कृतच्या अभ्यासाला यानिमित्ताने गती मिळेल. एकंदरीत मजा आहे. ही संधी दिल्याबद्दल विभागप्रमुख डॉ. शकुंतला गावडे मॅडम यांचे आभार मानतो. माझे गुरुवर्य योगविद्या निकेतनचे श्री. सदाशिव निंबाळकरसर यांची आज आठवण येते आहे. या निमित्ताने त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद मागतो.
अतुल ठाकुर
पुन्हा संस्कृत भवन…
3 Comments
Alright, alright, mx37casino. Thumbs up! The casino is really good if you enjoy many games. You can check it out by tapping on the URL. Have fun! mx37casino
Just had a look at mx711juegos. Not bad! Got some interesting games I’ve never seen before. If you’re bored of the usual stuff, give it a look! Check it out here mx711juegos
So I checked out apphp88 the other day. Nothing really blew my mind, same old stuff. But could kill time on the bus? The app is worth checking out. Give it a try before you judge! apphp88