कालचा दिवस हा मला सर्वार्थाने समृद्ध करणारा होता. काल पार्किन्सन्स मित्रमंडळाचा वार्षिक मेळाव्याला जाण्याचा योग आला होता. अनेक वर्षे या कार्यक्रमाला जाणे घडत नव्हते. काल जमून आले आणि मंडळाच्या सदस्यांनी कौतूकाच्या वर्षावात मला अगदी न्हाऊन टाकले. लवकर गेलो होतो त्यामुळे तेथेच पायऱ्यांवर बसून माझे काही काम करत होतो. काहीवेळाने मृदुलाताई, आशाताई, अंजलीताई आल्या आणि भराभर कामाला सुरुवात झाली. सर्वप्रथम जाणवलं ते मंडळाच्या सदस्यांचं काटेकोर नियोजन. कुठेही काही कमी पडून नये म्हणून अगदी सुतळीच्या तोड्यापासून ते पिनांपर्यंत सगळं आणलं होतं. अनेकदा मला ही गोष्ट जेव्हा कार्यक्रमाची सूत्र गृहीणींकडे असतात तेव्हा जाणवते. काहीच कमी पडत नाही. मी देखील त्यांना जॉईन झालो आणि जमेल तसा कामात भाग घेतला.
एकेकजण येऊ लागले. ही सारी माणसं माझ्यासाठी आर्दश म्हणावी अशीच होती. फार मोठे काम केलेली, आणि महत्वाचे म्हणजे ते करताना पार्किन्सन्सला यशस्वीपणे हाताळणारी. त्यात मुंबई विद्यापिठाकडून डी. लिट. पदवीने सन्मानित झालेले बिनिवाले सर होते, गोव्याला आमचे ब्रॅंड ऍंबॅसेडर म्हणून कार्यक्रम गाजवलेले सलगरसाहेब होते, नुकतंच एक पुस्तक लिहिणारे आणि लोकांना उपयोगी असे कल्पक शोध लावून ते प्रदर्शनात मांडणारे सरदेशपांडेसाहेब होते, दररोज ग्रूपवर पुष्परचना करून सुगंधीत दिवसाची सुरुवात करून देणाऱ्या गीताताई पुरंदरे होत्या, पार्किन्सन्स असताना अवघड जागी जाऊन सुरेख फोटोग्राफी करणारे अरुण सुर्वे होते. आकर्षक अशा बाटल्यामध्ये दिव्याची आरास करणाऱ्या शैलाताई भागवत होत्या. हस्तकलेच्या वस्तू आणणाऱ्या सीमाताई कळके होत्या. असे अनेक जण होते ज्यांनी प्रदर्शनासाठी वस्तु आणून देण्यास सुरुवात केली भरपूर वस्तु आल्या होत्या. आता आणखी शुभार्थी, शुभंकर आणि मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देखील येऊ लागले होते.
येणाऱ्या मंडळींमध्ये करमरकरकाकांसारखी मंडळाच्या सुरुवातीपासून सोबत काम करणारी आणि पार्किन्सन्सच्या आजाराशी कसलाही संबंध नसणारी माणसे होती. अनेकजण असे होते की ज्यांचे शुभार्थी आता नव्हते. तरीही त्यांना मंडळाबद्दलच्या वाटणाऱ्या आपुलकीमुळे ही माणसे मंडळासाठी काम करीत होती. काहीवेळातच शोभनाताई, गोपाळकाका आपल्या मुलीसोबत आले, पटवर्धनकाका आले. ही माणसे अशी की समोर दिसताच आपले हात आपोआपच त्यांचे पाय धरुन आशीर्वाद मागायला पुढे होतात. बाहेर दिपाताई होनप, सोनाली मालवणकर यांच्यासारखे कार्यकर्ते प्रदर्शनाची मांडणी करण्यात गुंग होते, वसुताई स्मरणिका, देणग्यांचे टेबल सांभाळीत होत्या. तर आत स्टेजवर कार्यक्रमाची तयारी चालली होती. डॉ. अमित करकरेही तेवढ्यात भेटले. प्रमुख वक्ते डॉ. हिमांशू वझेही आले आणि प्रदर्शन पाहू लागले. पुण्याच्या उन्हातून तेथे कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या सर्व माणसांसाठी ताकाची सोय केली होती. माणसे उन्हातान्हातून येणार आहेत, त्यांना हुशारी वाटेल असं काही पेय द्यायला हवं हे गृहीणींशिवाय कुणाच्या लक्षात येणार? ही काळजी त्यांच्याचकडून घेतली जाते असं मला नेहेमी वाटतं. कार्यक्रमाची वेळ जवळ आली.
सर्वजण आत येऊ लागले. कार्यक्रमाची सुरुवात अंजलीताई भिडे यांच्या सुरेल गणपती वंदनाने झाली. त्यानंतर गौरीताई इनामदारांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी हातात घेऊन नेमकेपणाने बोलत कार्यक्रमाची धूरा समर्थपणे सांभाळली. आशाताईंनी मंडळाच्या आजवरच्या वाटचालीबद्दल सांगितले. पुढे पटवर्धनकाका बोलले. नव्वदीच्या घरात असलेल्या या ऋषीतूल्य माणसाने मला केव्हाही फोन करा, बोलण्यासाठी वेळेचे बंधन नाही हे सांगितले. काकांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेत आजाराला बाजूला ठेवत जगावे कसे यावर फार सुरेख विवेचन अगदी रोजच्या जगण्यातील उदाहरणे देऊन केले. शोभनाताईंनी प्रदर्शनाला वस्तू आणलेल्या शुभार्थींच्या कलेचे तोंड भरून कौतूक केले. मला खात्री आहे शोभनाताईंनी केलेल्या कौतूकाने या मंडळींची कला पुढे जास्त बहरणार आहे. मलाही बोलण्याची संधी देऊन माझा फार मोठा सन्मान या मंडळाने केला. पुस्तकाचे आणि स्मरणिकेचे प्रकाशन झाले. त्यानंतर डॉ.हिमांशू वझे बोलण्यासाठी उठले.
डॉक्टरसाहेबांचे बोलणे म्हणजे भारतीय अध्यात्म, वेद, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, पातंजल योगसूत्र आणि आधुनिक वैद्यक यांचा जणू सुरेख संगम, समन्वय होता. आपल्या परंपरामधील उदाहरणे देऊन डॉक्टरसाहेबांनी आरोग्यविषयक अनेक बाबींवर विवेचक भाष्य केले. व्यायामाच्या बाबतीत अगदी रोजच्या रोज काय करता येईल याच्या टीप्ससुद्धा त्यांच्या भाषणात होत्या. त्यांच्या भाषणाचा सर्व रोख हा सकारात्मकतेवर होता हे मला फार आवडले. त्यासाठी त्यांनी वैद्यकशास्त्रातील काहींच्या काम करण्याच्या पद्धतीवरदेखील नर्म विनोद करीत चिमटे काढण्यास कमी केले नाही. आवश्यक तेथे संस्कृत श्लोक, ओव्या, शब्दांच्या व्याख्या देत ओघवत्या शैलीत चाललेले डॉक्टरसाहेबांचे भाषण संपूच नये असे वाटत होते. मात्र वेळ झाली होती त्यामुळे भाषण संपवून प्रश्नोत्तरे घेतली गेली त्याला डॉक्टरसाहेबांनी यथोचित उत्तरे दिली. मृदुलाताईंनी आभारप्रदर्शन केले आणि या सुरेख कार्यक्रमाची सांगता झाली. एकमेकांना भेटण्यासाठी गर्दी होऊ लागली. मंडळाने जाताना सोबत नेण्यासाठी खाऊ ठेवला होता. त्याची पाकीटे दिली जात होती.
आत अनेकांना भेटलो. रोहिणीताई पटवर्धनांच्या पायाला हात लावून नमस्कार करण्याची संधी मिळाली. सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. बाहेर सलगरसाहेब पुन्हा भेटले. त्यांनी खास माझ्यासाठी घरून स्वतःच्या हाताने काही पदार्थ करून आणले होते. त्याची पिशवी आधीच दिली होती. आता जास्तीचे पदार्थ त्यांनी माझ्या बॅगमध्ये टाकले. तुमच्या आईंना काय आवडतं मला सांगा. पुढल्यावेळेला नक्की करून आणेन म्हणाले. मला तर बोलायला काही सुचतच नव्हतं. सरदेशपांडेसाहेबांनी स्वतःच्या पुस्तकाची प्रत मला दिली. शैलाताईंनी वारली पेंटींगचे कार्ड दिले. शोभनाताईंनी काही पुस्तके दिली. शेवटी तिळवेसर भेटले. त्यांनी कौतूक केले. कुठल्यातरी पूर्वसुकृतामुळे या मोठ्या आणि प्रेमळ कुटूंबाचा भाग झालो होतो. परतीच्या प्रवासाला लागताना बॅग प्रेमाने दिलेल्या वस्तूंनी आणि मन आनंदाने भरून गेलं होतं.
अतुल ठाकुर
पार्किन्सन्स मित्रमंडळाचा वार्षिक मेळावा