You are here:
परखड – डॉ. अविनाश बिनीवाले

पूर्वसंचित फळाला येतं म्हणजे काय कुणी विचारलं तर मी आजची घटना सांगेन. अन्यथा इतक्या मोठ्या माणसाला भेटण्याचा योग कसा येईल? दुपारी फोनवर बिनीवाले सरांचा मेसेज होता. मुलीकडे आलो आहे. भेटायला येऊ शकाल तर या. ही संधी दवडण्याचा मूर्खपणा मी केला नाही. संध्याकाळी पाच वाजता आलो तर चालेल का असे विचारता ते चालेल म्हणाले. गेलो. लिफ्टमधून बाहेर पडतानाच आतून “या ठाकुर” असा सरांचा आवाज आला. आत गेलो आणि मुंबई विद्यापिठाने डी. लिट् ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केलेली व्यक्ती अतिशय साध्या वेशात आत बसलेली मी पाहिली. अनेक विद्वानांबद्दल आधी आलेल्या कडवट अनुभवांमुळे जेव्हा सरांसारखी साधी माणसे दिसतात तेव्हा मला प्रथमदर्शनीच त्यांच्या प्रेमात पडायला होते. येथेही तसेच झाले. आत जाऊन त्यांच्या पाया पडलो आणि समोर बसलो. आणखीही दोन व्यक्ती होत्या. त्यांची सरांनी ओळख करून दिली. आमच्या गप्पा सुरु झाल्या.

या गप्पा म्हणजे मी प्रश्न विचारायचे आणि सरांनी सविस्तर उत्तरं द्यायची या स्वरुपातल्या होत्या. अलिकडेच मी “नर्मदा परिक्रमा, दुसरी बाजू” या विषयावर त्यांचे बोलणे मी ऐकले होते. त्यामुळे विचारातील परखडपणा हे सरांच्या बोलण्याचे वैशिष्ट्य मला माहित होते. मला अनेक गोष्टींबद्दल शंका होत्या. सरांना रशियन, फ्रेंच, जर्मन आणि संस्कृत भाषा अवगत आहेत. मला या त्यांच्या भाषाप्रवासाबद्दल उत्सुकता होती. त्यांनी भाषा शिकताना क्रियापदावर भर द्यावा असा सल्ला दिला. कुणीही नसल्यास स्वतःशीच त्या भाषेत बोलण्याचा सराव करावा असेही ते म्हणाले. एकंदर कशामुळेही अडून राहणे त्यांच्या स्वभावतच नसावे. संस्कृतचं म्हणाल तर सर आठवीत असताना रघुवंश, कुमारसंभवाचा अभ्यास करीत होते. आणि मराठी भाषिक माणसाने लिलया मराठी बोलावं तसं त्या वयात संस्कृत बोलत होते.

सर अनेक विषयांवर अगदी परखडपणे बोलले. हे बोलणे ऑफ द रेकॉर्ड स्वरुपाचे असल्याने तपशील येथे देता येणार नाही. पण आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळात जेव्हा नर्मदा प्रदक्षिणा दुसरी बाजू या विषयावर सर बोलले तेव्हा सरांना कुठल्याही गोष्टींपेक्षा माणुस महत्वाचा वाटतो हे माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे आमच्या गप्पाही त्याच अनुषंगाने झाल्या. मी कुठल्याही विषयावर प्रश्न विचारला तरी सर त्याचे उत्तर मानवी दुःख, मूलभूत गरजा या दृष्टिकोणातूनच देत होते. इतरांचे नर्मदा प्रदक्षिणेचे अनुभव आता सर्वश्रूत आहेत. पण सर एका भक्तांच्या गटासोबत प्रदक्षिणेला गेले ते त्यांना मी तुमच्या सोबत येईन ते तेथिल माणसांना भेटायला आणि तेथिल भाषाविषयक माहिती मिळवायला हे सांगूनच.

हा गट नर्मदामैयाच्या भक्तीमध्ये गुंग असताना सर मात्र आजूबाजूच्या गावात जाऊन तेथिल भाषाविषयक चौकशी करीत होते. काहीवेळा त्यांचे जेवणही त्या गावांमध्येच होत असे. सरांची नर्मदा प्रदक्षिणा अशी मैयाच्या पाण्यावर पोसलेल्या लोकांना जाणून घेण्याने झाली. सरांचे माणसांना जाणून घेण्यावर प्रेम असल्याने असेल कदाचित त्यांनी खाण्यापिण्याचे फारसे नियम कधी पाळले नाहीत. जे ताटात पडले ते ग्रहण केले. एक गंमतीची गोष्ट म्हणजे ते चाळीस दिवस युरोपात फिरले. त्यावेळी एकही दिवस हॉटेलात जेवले नाहीत. ते रशियन, फ्रेंच, जर्मन भाषेत तेथिल लोकांशी संवाद साधत आणि ती माणसे त्यांना आपल्या घरी जेवायला नेत. सरांची फक्त एकच अट होती. माझ्या पानात काहीही वाढा. फक्त तो पदार्थ कशापासून बनवला आहे ते सांगू नका. इतके पाळले की सरांची काहीही खाण्याची तयारी होती.

सरांच्या भाषाविषयक विश्लेषणात त्याचा संबंध राजकारण आणि शेवटी पॉवरशी कसा आहे हा मुद्दा वारंवार येत होता. किंबहूना माणसाचे शोषण कसे होत असते, काही माणसे इतरांबाबत कशी संवेदनाहीन असतात तेही त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले. त्यांच्या नर्मदा प्रदक्षिणेतील काही माणसे तेथिल कोट्याधीश मठांनी आपल्याला स्वीकारावे म्हणून मुद्दाम दाढ्या वाढवून आपण कुणी फार पुढे पोहोचलेले आहोत अशी बतावणी करीत होती हे सरांना स्वच्छपणे सांगितले. सरांच्या बोलण्यात काय नव्हते? भाषावार प्रांतरचना, त्याचे फायदे तोटे, प्रमाण भाषा आणि तिचे महत्व, मोगल सम्राट आणि उर्दूचे प्राबल्य, त्यातील शायरी मागची कारणे, पेशव्यांचे साम्राज्य आणि मराठीचे महत्व, एका काळात मराठीला आलेले वैभवाचे दिवस, बोलीभाषेसंबंधात चाललेले राजकारण, युरोप अमेरिकेला प्रमाण भाषेमुळे झालेला फायदा, आपल्याकडील हिंदी भाषेचे महत्व, भाषेचे व्याकरण आणि त्यामागे चाललेले राजकारण, विद्वत्ता आणि सत्ताकारण यामुळे विशिष्ट भाषेला येणारे महत्व, जर्मनीत संस्कृतचा प्रभाव आहे असं म्हणतात यामागे वस्तूस्थिती काय आहे या साऱ्या विषयावर सर अगदी पोटतिडकीने आणि सविस्तर बोलले. माझी झोळी तोकडी पडत होती याची मला चांगलीच जाणीव होती.

तेथे माझ्या आधी बसलेली माणसे नंतर सरांचा निरोप घेऊन निघून गेली. मध्येच आमचे खाणे आणि चहाही झाला. सरांच्या हसतमुख पत्नीशी केव्हातरी सविस्तर बोलले पाहिजे असे मनातून वाटून गेले. अशा अवलिया माणसाबद्दल त्यांच्या कडे अनेक किस्से असतील असे मला वाटले. शेवटी निघण्याची वेळ झाली. सरांच्या एकंदर बोलण्यावागण्यात आजाराचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते. अशा आपल्या विषयात रंगून गेलेल्या माणसाला त्रास द्यायला आजारालाही संकोच वाटत असावा. निघताना पुन्हा त्यांच्या पायाला स्पर्श केला. ते अगदी लिफ्टपर्यंत मला सोडायला आले. माझे कुठल्याजन्मीचे पुण्य होते ठावूक नाही पण पूर्वीच्या काळातील ऋषी असेच असावेत असे मला वाटले. आणि मला त्यांचे आज दर्शन घडले होते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment