दिल जो न कह सका, वोही राज ए दिल…

काही गाण्यांचे शब्द, त्या गाण्याला लावलेली चाल, त्या गाण्यातले संगीत आणि अर्थातच त्या गाण्याला दिला गेलेला आवाज हे रसायन इतकं काही जमून येतं की आता त्यात कसलाच बदल व्हावा असं वाटत नाही. “दिल जो न कह सका” बद्दल माझी भावना अशीच आहे. अगदी ते गाणं पडद्यावर प्रदिपकुमारने गायिलं आहे तरीही. तो ही त्यात शोभून दिसतो. त्याच्या अभिनयाच्या कितीही मर्यादा असल्या तरी त्याचे व्यक्तीमत्व राजबिंडे आहे यात वाद नसावा. शिवाय रफीने गाणे इतक्या ताकदीने गायिले आहे की चेहर्‍यावर भावनांना अनुकूल हावभाव आपोआपच उमटत जावेत. गाण्याची सुरुवात एका “जाम” ने होते. प्रदिपकुमार एका झटक्यात ग्लास रिचवतो आणि फेकून देतो. त्याच वेळी रोशनचा व्हायलिनचा पीस ऐकू येतो. आणि रफीचे भग्न हृदयाची व्यथा स्वरात तंतोतंत साकारणारे गाणे सुरु होते ..दिल जो न कह सका…

या गाण्याबद्दल लिहिण्याआधी गाण्याच्या आजुबाजूचे काही कळावे म्हणून मी हा १९६५ साली आलेला “भीगी रात” चित्रपट थोडासा पाहिला. नंतर लक्षात आलं की निव्वळ गाणे पाहून लिहिले असते तरी चालले असते इतका हा गाण्याचा तुकडा बोलका आहे. कुठल्याशा गैरसमजामुळे प्रदिपकुमारला मीनाकुमारी बेवफा आहे आणि ती पैशांसाठी अशोककुमारशी लग्न करते आहे असे वाटते. लग्नाच्या बंधनात दोघे बांधले जाणार त्याची घोषणा करताना पार्टी दिली जाते. त्यात प्रेमभंग झालेला चित्रकार प्रदिपकुमार त्याने आपल्या प्रेयसीची काढलेली चित्रं घेऊन येतो. आणि पार्टीत “म्युझिक” आहे ऐकल्यावर आपली व्यथा आपल्या प्रेयसीसमोर मांडण्याची संधी साधतो. मात्र ही व्यथा मांडताना जे शब्द त्याने वापरले आहेत ते चाबकाच्या फटकार्‍यासारखे आहेत आणि शब्दाशब्दाला त्या वेदना मीनाकुमारीच्या चेहर्‍यावर दिसतात. आणि त्याचा त्रास तिच्या होणार्‍या नवर्‍याच्या चेहर्‍यावर म्हणजेच अशोककुमारच्या चेहर्‍यावर दिसतो.

बाकी तिन चार मिनिटाच्या गाण्यात भावनांचा हा कल्लोळ उभा करायचा तर तेवढ्याच ताकदीचे अभिनेते हवेत. प्रदिपकुमारच्या मदतीला रफीचा आवाज आहे, मजरूहचे शब्द आहेत, रोशनचे संगीत आहे. पण मीनाकुमारी आणि अशोककुमारने मात्र त्या शब्दांना आपल्या भावनांच्या प्रतिक्रिया ज्या परिणामकाररित्या चेहर्‍यावर दाखवल्या आहेत त्या गाण्यातच पाहायला हव्या. मजरूहने गाण्यांत निव्वळ भग्न हृदयाची कैफियत मांडलेली नसून आता तू पैशांसाठी मला सोडून दुसर्‍याकडे गेलीस याचा त्या प्रियकराला आलेला संताप शब्दाशब्दांत मांडला आहे. तो म्हणतो “मुबारक़ तुम्हे किसी की, लर्ज़ती सी बाहों में, रहने की रात आयी”. पुढे एका कडव्यात “उछा लो गुलों के टुकड़े के रंगीन फिजाओं में, रहने की रात आयी”. आणि शेवटी कळस साधताना “पियो चाहे खून-ए-दिल हो, के पीते पिलाते ही रहने की रात आयी” मजरूहचे शब्द हा या गाण्याचा कणा आहे.

रोशनच्या चाली तशा वेगळ्याच असतात. ही थोडी अवघड चाल. त्यातच त्याने निरनिराळी वाद्ये वापरत भावनेचा कमाल परिणाम साधला आहे. रफीने मूर्तीमंत व्यथाच आवाजात उतरवली आहे. त्यातही त्याने काही वेळा शब्दांवर वेगळी हरकत घेऊन भावना आणखी गडद केल्या आहेत. खास करून “उछा लो गुलों के टुकड़े के रंगीन फिजाओं में, रहने की रात आयी”. या ओळीत “फिजाओंमें” शब्दावर रफीने जे काही केलं आहे ते ऐकताना हा माणून अजरामर का झाला हे लक्षात येतं. गाण्याच्या शेवटी अशोककुमार मीनाकुमारीला तिच्या विनंतीवरुन गॅलेरीतून आत नेतो. त्यासाठी तो व्हीलचेअर आणतो. तिचे अपंगत्व प्रदिपकुमारला माहित नसते. अशावेळी व्हीलचेयर आणण्यापासून ते तिला त्यात बसवून आत नेईपर्यंत प्रदिपकुमार पाठ वळवून “जाम” रचवण्यात मग्न असतो. पुन्हा वळून पाहतो तर मीनाकुमारी तेथे नसते. तो आपले शब्दच विसरतो. गाण्याचा हा तुकडा आवाजाशिवायच आहे. त्यानंतर पुन्हा भानावर येऊन रफीचे उदास स्वर सुरु होतात. दिग्दर्शकाची ही किमयाही या गाण्यात पाहण्याजोगी.

भाषेच्या दृष्टीने उर्दूत “किस्मत” म्हणतानाचा “क” वेगळा आणि “कब” म्हणतानाचा “क” वेगळा. रफी “किमत” म्हणताना तो विशिष्ट “क” वापरतो यात नवल नाही. पण प्रदिपकुमारसुद्धा आपले संवाद म्हणताना या “क” चा वेगळा आणि स्पष्ट उच्चार करताना दिसतो. हे असं अलिकडे असतं का याची कल्पना नाही कारण मी जुन्याच गोष्टीमध्ये इतका काही गुंतलो आहे की नवे चित्रपट फारसे पाहात नाही. हे गाणं चित्रपटाच्या जवळपास शेवटीच आहे. शेवट साधताना या गाण्याच्या धूनचा अतिशय कल्पक वापर केला आहे. कुणी तरी आनंदी आहे, कुणीतरी समाधानी आहे. कुणाला आपलं प्रेम मिळालं आहे तर कुणाला आपण जिच्यावर समरसून प्रेम केलं ती आपली नाही हे लक्षात आलं आहे. सार्‍या भावना त्या धूसर होत जाण्यार्‍या स्वरात हळुवारपणे मिसळलेल्या आहेत…प्रत्येकाचे राज ए दिल सांगणारे हे गाणे चित्रपट संपतानादेखिल चटका लवून जाते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment