जीएंची “तळपट” कथा ही सर्वस्वी अनोखी म्हणता येईल अशी आहे. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे स्वाभिमान, आत्मसन्मान जपणारी माणसेही कधीतरी चुकू शकतात हे सांगणारी ती कथा आहे. मात्र ती इथेच संपत नाहीत. तर आपल्या सर्व मर्यादेसकट यातील काही माणसे इतकी चिवट असतात की आपली गेलेली पत मिळवण्यासाठी प्राणपणाने झुंजतात आणि अगदी त्यात प्राणही गमवतात. दानय्याच्या हातून दुसऱ्याच्या नागाची चोरी होते. जातीच्या नियमाप्रमाणे दानय्याला आता वस्तीत स्थान नाही. हा नियम अर्थातच दानय्याला मान्य आहे. पण त्याआधी स्वतःचा नाग पकडून दाखवायचा अशी त्याची इर्षा आहे. जीएंच्या कथेत या वाटेवर वाटचाल करणारी आणि पुढे आपला जीव गमवणारी काही माणसे आढळतात. लौकिक अर्थाने ती यशस्वी आहेत की नाही याचे मूल्यमापन करणे कठीण आहे. माझ्या दृष्टीने ती यशस्वी आहेत. कारण तत्वासाठी प्राण पणाला लावण्याचे जेव्हा त्यांनी ठरवले तेव्हाच ती माणसे जिंकली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मात्र जीएंच्या कथांमध्ये या साऱ्याला छेद देण्याचा प्रयत्न करणारी काही कणाहीन माणसेदेखील वावरत असतात. “तळपट” कथेतील दानय्याने आणलेल्या दूरच्या नातेवाईकाचा चंदर हा तरुण असा आहे.
दानय्याने त्याला नाग पकडायला शिकवण्याचा प्रयत्न केला पण हा पोरगा भेदरून गेला. त्यानंतर चंदर कधी त्या मार्गाला गेलाच नाही. आता तो गवत उपटण्याचे काम करणार आहे. कारण गवत चावत नाही असे त्याचे म्हणणे आहे. दानय्यला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटतो. त्याला नाग पकडण्याचे, नागाला खेळवण्याचे काम पराक्रमाचे आणि अभिमानाचे वाटते. त्याच्या जातीच्या माणसाने हेच काम करायला हवे असेही त्याला वाटते. त्यामुळे चंदरच्या अंगात रक्त आहे की गाढवाचे मूत असेही तो एके ठिकाणी म्हणतो. या कथेत जरी दानय्या हा नायक असला तरी व्यक्तीमत्वातील ही गुंतागुंत मला फार महत्वाची वाटते. कारण आपल्याला समाजातही अशी कणाहीन माणसं जागोजाग दिसत असतात. त्याचे प्रतिबिंबच या कथेत पडले आहे असे मला वाटते. चंदर काय म्हणतो त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कणाहीन माणसे ही नुसतीच कणाहीन नसतात. ती आपले कणाहीन असणे मान्य करून स्वस्थ बसली असती तर फारसा प्रश्न नव्हता. या कणाहीन माणसांचे स्वतःचे एक तत्वज्ञान असते. आणि ही मंडळी ती हिरीरीने पुढे रेटून आपले कणाहीन असणे लपवण्याचा प्रयत्न करीत असतत.
दानय्या वस्तीतून निघून जाण्याआधी चंदर दानय्याला भेटतो आणि आपल्याला गवताचे भारे उपटण्याचे काम मिळाले आहे असे सांगतो. दानय्यानेदेखील हे काम करावे असे त्याचे मत असते. म्हणजे आम्ही कणाहीन आहोतच, तुम्हीही व्हा. सगळीकडेच कावळे झाले म्हणजे हंसाला एकटे पाडता येते आणि त्यावर हल्ला करता येतो हे असेच काहीसे आहे. दानय्या अर्थातच ते नाकारतो. पुढे चंदर म्हणतो “हातालाही एक काळीज असतं. मी पहिल्यांदा नाग पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हाच ते काळीज फुटून गेलं”. हा आपण घाबरट आहोत, आपल्याला हे काम भीतीमुळे जमणार नाही हे साळसूदपणे सांगण्याचा हा प्रकार आहे. यात स्वतःचा कमीपणा लपवण्याची केविलवाणी धडपडही आहेच. मात्र अशी अनेक माणसे एकत्र येऊन एखाद्या ध्येयवादी माणसाला घेरून नेस्तनाबुत करण्याचा प्रयत्न करु शकतात. तसे होताना आपण पाहतो. आणि अशा तऱ्हेचे नेभळट तत्वज्ञान वारंवार सांगितले गेले की तीच गोष्ट योग्य आहे, तीच जगरहाटी आहे असेही वाटू लागते आणि तत्वनिष्ठ माणसे थोडीशी बावळट वाटू लागतात.
कणा नसलेली माणसे एकत्र येऊन हा चमत्कार करु शकतात. “तळपट” कथेत असे होताना दिसत नाही कारण येथे नेभळटांची गर्दी नाही. दुसरे म्हणजे दानय्या लेचापेचा नाही. त्याला आपल्या नाग पकडण्याच्या कसबाबद्दल अभिमान आहे. अलिकडे माणसे “जजमेंटल” हा शब्द खूपदा वापरताना दिसतात. आताच्या काळात चंदरच्या बाजूने विचार करणारी माणसे खूप दिसतील. आणि त्यांना दानय्या कदाचित अतिरेकी वाटेल. पण दानय्या हा जीएंच्याच भाषेत सांगायचे तर सरळ घावाचा माणुस आहे. तो नेभळटपणाला तत्वज्ञानाचा रंग देऊन स्वीकारणारा नाही. म्हणून तो मला महत्वाचा आणि माझ्यापुरतं खरं सांगायचं तर अनुकरणीयही वाटतो.
अतुल ठाकुर
Menu
तळपट – व्यक्तीमत्वातील गुंतागुंत