You are here:
जीए आणि गूढ विषय

साहित्यात ज्यांनी गूढ विषय हाताळले ते लेखक खरोखर त्यावर विश्वास ठेवतात का? हा प्रश्न मला अनेकदा पडतो. पण जीएंपुरता हा प्रश्न सुटलेला आहे. जीएंनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात हा विषय काहीवेळा येतो. त्यावरून जीएंना गुढाचे आकर्षण होते असे मानायला जागा आहे. किंबहुना माणसाचा प्रवास विशिष्ट वाटेवरूनच का होतो हा देखील त्यांच्या अनिवार कुतूहलाचा विषय होता. त्यासाठी ते नाईल नदीच्या प्रवासाचे उदाहरण देतात. त्यांच्या कथांमध्ये अनेकदा अशी माणसं आढळतात जी जन्मात:च अपयशी असतात. हे देखील जीएंच्या कथांमधलं एक गुढंच.

जीएंच्या कथेचा नायक श्रीमंत असो वा गरीब, सर्वसामान्य असो वा वेगळेपणाने झळकणारा, त्याला नियतीने कुठेतरी कोंडीत पकडलेले असतेच. आणि माणुस जितका मोठा तितकी त्याची असहाय्यता जीएंच्या कथेत जास्त जाणवते. पडदा कथेतील प्रिन्सिपल ठकार हे रसिक आहेत पण त्याच्या आजूबाजूला अतिसामान्य माणसे वावरतात. पारधी कथेतील दादासाहेब एवढे मोठे वकील पण त्यांच्या कुवतीची एकही व्यक्ती त्यांच्या घरात नसते.

प्रवासी आणि इस्किलार मधील नायक तर कुठल्याही अर्थाने सामान्य नाहीत पण त्यांनाही नियतीने वेढलेले आहेच. हा बाज जीएंच्या बहुतेक कथांमधून आढळतो. यावेगळे काही विषय जीए हाताळतात. त्यात ठळकपणे जाणवणारी कथा म्हणजे अंजन. त्यातील नायक का निरनिराळे प्रयोग करुन जमिनीत दडलेल्या खजिन्याचा शोध घेऊ इच्छितो. इस्किलार चा नायक तर आपले भविष्य जाणण्यासाठीच हिंडत असतो. राक्षस कथेतील गुणीला भेटलेला माणुस तसाच गुढ.

मात्र कथेपलीकडे देखील सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात आश्वत्थामा सदृश व्यक्ती आपल्याला दिसल्याचा उल्लेख जीए करतात. आणखी एका तर्कापलीकडल्या प्रसंगाचा उल्लेख जीएं पत्रात करतात. रमल, ज्योतिष, तंत्र यांचे उल्लेख जीएंच्या कथेत येतातच पण पत्रात जीए एका ठिकाणी भानामती पहिल्याचेही नमूद करतात. कधीही धड दोन वाक्य मराठी न बोलता येणारी जीएंच्या नात्यातील एक बाई अचानक शुद्ध मराठीत बोलू लागण्याच्या प्रसंगाचे वर्णन एका ठिकाणी जीएंनी केले आहे. त्यावेळी त्यांना वाटलेली भीतीही ते अधोरेखित करतात.

जीएंचे या विषयावर भरपूर वाचन असावे आणि त्यांना यात रस असल्याने त्यांनी याची बरीच माहिती मिळवली असावी असे वाटते. एखाद दुसऱ्या कथेत त्यांनी मृत्यूनंतरच्या जगाचाही मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. जगातील गुढाचे आकर्षण हा जीएंच्या स्वभावाचा भाग होता. त्यांचे हे कुतूहल शेवटपर्यंत कायम राहिले. त्यामुळेच असेल कदाचित पण सरळसोट तत्वज्ञान त्यांना फारसे रुचले नाही. इस्किलार कथेत त्यांचा नायक एका ठिकाणी म्हणतो “आयुष्यात रुतलेली विषारी मुळी अशा उपायाने निघत नाही. ती निघताना काळजाचा किती भाग काढला जाईल हेच फार तर जाणता येते.”

जीएंना असलेल्या गुढाच्या आकर्षणामागे अशाच एखाद्या वेदनेचा मागोवा घेण्याची त्यांची इच्छा असावी अशी माझी समजूत आहे.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment