जीए आपल्या कथांमध्ये अनेकदा कणाहीन माणसे रंगवताना दिसतात. मात्र त्यांचा अभ्यास करताना फार सावध रहावं लागतं. कारण वरवर आपल्याला कणाहीन वाटणारी काही माणसं ही समजून उमजून एखादा जीवनमार्ग स्वीकारलेली असतात. त्यांना आपल्या मर्यादा जाणवलेल्या असतात. ही माणसे कणाहीन आहेत असं म्हणवत नाही. “इस्किलार” कथेतला गारुडी असा आहे. तो सापाचा खेळ दाखवत असला तरी त्याला विषारी नागाबद्दल प्रचंड भीती वाटते. आणि ती तो लपवत नाही. त्याच्या भावाने अत्यंत विषारी असा जिवंत नाग आपल्या हाताने पकडला होता. प्रवाशाला ती हकिकत सांगताना त्याच्या स्वरात आपल्याला त्याच्या भावाच्या निडर स्वभावाबद्दल कौतूक, आदर आणि प्रेम जाणवतं. मात्र आपल्याला असं काही जगावेगळं कधीही जमणार नाही हे त्याला माहित आहे. आणि ते त्याने डोळसपणे स्वीकारलं आहे. त्याला विनातक्रार दोन वेळ जेवायला देणारी बायकोही त्याने स्वीकारली आहे. खेळ संपल्यावर तो आपल्या संसारात पुन्हा रमणार आहे. आपण जो खेळ करतो त्याला आपण स्वतः कधी एक कवडीही टाकली नसती असं तो प्रामाणिकपणे सांगतो. गारुड्याबद्दल प्रवाशाला एक वेगळाच आदर वाटतो. कारण ही डोळसपणे आपल्या मर्यादा स्वीकारुन जगणारी माणसे आहेत. या उलट तळपट कथेतला चंदर आहे.
दानय्याच्या दूरच्या नातेवाईकाचा मुलगा. दानय्याने वाढवलेला. पण त्याला साप पकडायचं जमत नाही. तो घाबरुन जातो. दानय्यासाठी साप म्हणजे दैवत. साप जितका जास्त विषारी आणि दुर्मिळ तितकीच दानय्याची त्याला पकडण्याची इर्षाही तीव्र. दानय्यासाठी ते युद्ध आहे, त्यात पराक्रम आहे, तो धर्म आहे, तो जीवनमार्ग आहे. चंदरला मात्र साप न पकडता गवतकाम करायचं आहे. निरुपद्रवी काम आणि नियमित पैसे याचं त्याला आकर्षण आहे. गवताचे भारे उचलावेत आणि बिनघोर झोपावे. त्यात काही चावण्याचा धोका नाही. दानय्याला चंदरचा तिरस्कार वाटतो. चंदर म्हणतो माझ्या हातालाही काळीज होतं आणि पहिल्यांदा साप पकडाताना ते फुटलं. चंदरने देखील डोळसपणे आपल्या मर्यादा ओळखून आपला जीवनमार्ग स्वीकारला आहे. काही दिवसांनी तो वस्ती सोडून जाणार आहे. दानय्याला मात्र दुसऱ्याचा साप चोरला त्याची शिक्षा म्हणून वस्ती सोडावी लागणार आहे. मात्र वस्ती सोडून जाण्याआधी दानय्या विषारी नाग पकडून आणणार आहे. वस्तीत त्याला मिरवणार आहे आणि मगच वस्ती दोडणार आहे. हा दानय्याचा पिळ आहे. मग इस्किलार कथेतला गारुडी आणि तळपट कथेतला चंदर सारखेच आहेत का? मला यात एक सूक्ष्म फरक जाणवतो.
गारुड्याला स्वतःच्या मर्यादा माहित आहेत आणि त्याने डोळसपणे स्वतःचा निरुपद्रवी आणि निर्धोक असा जीवनमार्ग स्वीकारला आहे. त्याचं या जीवनमार्गाचं स्वतःच असं तत्वज्ञानदेखील आहे. चंदरनेही स्वतःला झेपेल असा मार्ग स्वीकारला आहे. त्याचंही स्वतःचं तत्वज्ञान आहे. फरक हा आहे की गारुड्याला पराक्रम आणि पौरुष याबद्दल आदर आहे. आपल्याला हे झेपणारे नाही हे त्याला ठावूक असले तरी ज्यांच्याकडे हा गुण आहे त्यांच्याबद्दल त्याला कौतूक वाटते. तसे चंदरच्या बोलण्यात दिसत नाही. त्याचे तत्वज्ञान खऱ्या अर्थाने कणाहीन माणसांचे आहे. त्याला साप पकडत जीव धोक्यात घालणारा दानय्या मूर्ख, वेडा वाटत असणार. तो स्वतः गवतकाम करणार आहेच. पण दानय्यानेदेखील तेच काम करावं असं त्याला वाटतं. कणाहीन बनून राहणं हेच आजच्या जगात कसं योग्य आहे, त्यातूनच आपले प्रगती कशी साधता येते हे सांगणारी जगात जी असंख्य माणसं असतात त्याचा चंदर हा प्रतिनिधी आहे. गारुडी हा मला त्यांचा प्रतिनिधी वाटत नाही. युद्धात पराक्रम गाजवताना जखमी झालेल्या आणि कदाचित पराभूत झालेल्या माणसाचे युद्धाच्या नावाने देखील धडकी भरणाऱ्या, काठावर बसलेल्या माणसाने मूल्यमापन करावे तसे चंदरचे बोलणे आहे. हा खऱ्या अर्थाने कणाहीन माणुस आहे.
याहूनही तिसऱ्या प्रकारची माणसे जीए रंगवतात. यांच्याबद्दल वाचताना मात्र जीएंच्या वाचकाला दम लागतो. ही माणसे आपल्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींसाठी आयुष्य उधळून दिलेली आहेत. ही कणाहीन नाहीत. त्यांनी आपल्या आवाक्याबाहेरची स्वप्नं पाहिलेली आहेत. ती प्रत्यक्षात आणताना ही माणसं सर्वस्वी पराभूत झालेली आहेत. आणि त्यांना सर्वसामान्य जीवन जगावं लागत आहे. त्यांची जगतानाची धडपड पाहून आपला श्वास कोंडून जातो. काहींना ही धडपड आता सहन होत नाही. आणि ती आपला दिवा आपल्या हाताने विझवताना दिसतात. अशा माणसांचा प्रतिनिधी “वीज” कथेतला बळवंत मास्तर आहे. त्याला पराक्रम गाजवायचा होता. पण काही गोष्टी त्याच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. मात्र त्याला कणाहीन आयुष्य सहन होणारे नाही. तो चंदर तर नाहीच. पण तो गारुडीही नाही. त्याला आपल्या आयुष्यावर नियतिने उमटवलेली मुद्रा पुसून काढायची आहे. उलट नियतीवर स्वतःची मुद्रा उमटवायची आहे. तसे झाले नाही तर त्याला स्वतःलाच नाहीसे करायचे आहे. जीएंच्या कथांमधील खऱ्या अर्थाने अतिशय अस्वस्थ करणारी, ज्यांच्याबद्दल वाचताना धाप लागल्यासारखे वाटते, दम कोंडतो ती ही माणसे आहेत. कणाहीन आयुष्यच नाकारलेली…!
अतुल ठाकुर