आमचे ज्येष्ठ स्नेही अशोकराव पाटील जेव्हा जीएंवर लिहितात तेव्हा ती माझ्यासाठी महत्त्वाची घटना असते. याची काही कारणे आहेत. ते फार कमी लिहितात त्यामुळे त्यांनी एखाद्या विषयावर सविस्तर लिहिणे हेच मुळी दुर्मिळ असते. माझ्यासारख्या वाचकांना त्यांचे लेखन ही एक पर्वणी असल्याने आम्ही अधुनमधुन त्यांना लिहिण्याचा आग्रह करत असतो. मात्र जीएं वर अशोकरावांनी लिहिणे याला फार वेगळे महत्त्व आहे. सर्वप्रथम म्हणजे अगदी कोपर्यात राहणार्या, आपले एकटेपण कटाक्षाने जपणार्या जीएंचा सहवास अशोकरावांना लाभला आहे. जीएंबरोबर त्यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. पत्र व्यवहार झाला आहे. दुसरे म्हणजे जीएंचे इंग्रजी वाचन अफाट होते. अशोकरावांचाही इंग्रजी साहित्याचा रसिक व्यासंग आहे. त्यामुळे जीएंच्या लेखनात पाश्चात्य साहित्याच्या पाऊलखुणा कुठे आढळतात याचा अचुक मागोवा ते घेऊ शकतात आणि माझ्यासारख्यांचे बरेच शिक्षण घडते. जीएंशी असलेला स्नेह, त्यांच्या साहित्याचे सतत वाचन, मनन आणि चितंन, त्याचबरोबर पाश्चात्य साहित्याचा अभ्यास या त्रिवेणीतुन घडलेला अशोकरावांचा लेख शेलॉटवर काही नवीन प्रकाश टाकणार अशी जर अपेक्षा कुणी ठेवत असेल तर ती गैरवाजवी म्हणता येणार नाही. आणि अशोकरावांनी ती अपेक्षा सर्वार्थाने पूर्ण केली आहे असे मला वाटते. लॉर्ड टेनिसनच्या “द लेडी ऑफ शेलॉट” या कवितेच्या मध्यवर्ती कल्पनेवर काही प्रमाणात आधारलेल्या पारवा कथासंग्रहातील आपल्या कथेला “शेलॉट” हे नाव देऊन जीएंनी याचा स्रोत काय आहे याबद्दल कसलिही संदिग्धता ठेवलेली नाही. अशोकरावांनी हाच धागा पकडुन आपल्या लेखाची सुरुवात केली आहे. लेखाच्या सुरुवातीला त्यांनी टेनिसनच्या मूळ काव्याची सफर त्याच्या इतिहास भूगोलासकट वाचकाला घडवुन त्यातील महत्वाचे तपशील सांगितले आहेत जेणेकरुन वाचकाला अलगदपणे जीएंच्या कथाविश्वात उतरता यावे.
एकाकीपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास अंत होईल असा दुर्दैवी शाप असलेली युवती शेवटी प्रेमात पडते आणि तिचे हृदय ज्याने हरण केले अशा उमद्या सरदाराला पाहण्याचा तिला मोह होतो. शापात सांगितलेल्या अटीचा भंग होण्याची वेळ येते आणि तिचा अंत होतो. नियतीने काहीतरी पदरात टाकले आहे. त्याचा मर्यादा अवघ्या आयुष्याला पडल्या आहेत. त्यातुन बाहेर पडायचं आहे. मात्र बाहेर पडण्यासाठी जे पहिलं पाऊल उचललं जाणार आहे तोच क्षण जीवनाचा अंतिम क्षण असणार आहे. हे गारुड जेव्हा आपण या कवितेत पाहतो तेव्हा जीएं नीटपणे माहित असलेल्या वाचकांना या कवितेचे जीएंना आकर्षण का वाटले असावे याचा अंदाज नक्की येऊ शकतो. अशोकरावांनी अचूकपणे नेमके याच मर्मावर बोट ठेवले आहे. जीएंच्या शेलॉटबद्दल लिहिताना हाच धागा पकडुन अशोकराव लिहितात “जीवन तर हवेच पण ते आरशातील प्रतिबिंबापुरतेच मर्यादित ठेवण्याची जीवघेणी अट”. पुढे अशोकरावांनी जीएंच्या याच मार्गावरील काही कथांची उदाहरणे देखिल दिली आहेत. नियतीने कपाळावर लिहिलेले अटळ भोग भोगणारी माणसे. त्यावर भाष्य करताना अशोकराव टेनिसनची कविता पार्श्वभूमी म्हणुन वापरतात. किंबहुना अशोकरावांनी टेनिसनच्या कवितेच्या भिंगातुन जीएंच्या शेलॉटचे दर्शन वाचकाला घडवले आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आणि त्यामुळे मला हा लेख अतिशय उद्बोधक तर खराच पण अत्यंत आकर्षक व श्रीमंत झाला आहे असे वाटते. दोन पूर्णपणे भिन्न संस्कृतीतील कलाकृती, त्यात नुसत्या संस्कृतीचेच नव्हे तर काळाचेही अंतर पडलेले, त्यातील व्यक्तिरेखाही अगदीच वेगळ्या आणि तरीही तीत वावरणार्या माणसांच्या दु:खात असलेले विलक्षम साम्य. जणुकाही वसुधैवकुटुंबकम या संकल्पनेतील हे विश्वची माझे घर वाटायला लावणारी दु:ख ही एक अशी गोष्ट असावी जी सर्व ठिकाणी, सर्व काळात तेवढ्याच प्रभावाने वावरत असावी. ज्यामुळे काळाचा कुठलाही कप्पा उघडुन पहा, बाकी काही ओळखिचे असेल नसेल पण नियतीचे भोग आणि त्यामुळे होणारी परवड सगळीकडेच आहे. मग ती लॉर्ड टेनिसनच्या शेलॉटमधील लेडीच्या वाट्याला आलेली असो कि जीएंच्या शेलॉटमधील काशीच्या वाट्याला आलेली असो.
अशोकरावांच्या लेखात जीएंच्या शेलॉटचे विचेचन आहे ते अशा तर्हेचे. जे मला भावले आहे. मात्र याव्यतिरिक्त काही मुद्दे मला जीएंच्या कथेची चर्चा करताना या लेखाच्या अनुषंगाने मांडावेसे वाटतात जे अशोकरावांना अस्थानी वाटणार नाहीत अशी आशा आहे. पहिला मुद्दा हा कि शेलॉटमधल्या काशी सारख्या व्यक्तीरेखा किंवा बापु काळुसकरसारखी माणसे ही कुठल्याशा शारिरीक व्यंगाने पछाडलेली किंवा गुन्ह्याच्या सावलीखाली जगणारी आहेत. ती नियतीचे भोग भोगताहेत यात नवल नाहीच. पण लौकिकार्थाने यशस्वी असलेले जीएंचे कथानायकदेखिल हे भोग, ही वेदना भोगत असतात. पारध मधला वकिल दादासाहेब किंवा पडदा मधला प्रिंसिपॉल ठकार हे अयशस्वी नाहीत. त्यांच्या वैयक्तीक आयुष्यावर कसलाही डाग नाही. पुरुष कथेतला प्राध्यापक निकम तर गरीबी, मानहानी सारे सोसून पुढे आला आहे. ही सर्व माणसे समर्थ आहेत. आपापल्या आयुष्यात यशस्वी आहेत. पण तरीही शेलॉटचा शाप त्यांनाही आहे. पुढे जीएंच्या कथेने पूर्णपणे रुपककथेचे वळण घेतले. रमलखुणामध्ये तिचे विकसित स्वरुप दिसून आले. त्यातील नायक तर कुठल्याही अर्थाने हतबल नाही. आणि त्याला समाजाची, पापपुण्य अशा संकल्पनाची भीती किंवा दडपणही नाही. आयुष्यातील उपभोग त्याला हवे आहेत.आणि ते मिळवण्यात तो यशस्वी होण्याची शक्यता निर्माण होते देखिल.पण तेथेही नियती या नायकाची पाठ सोडत नाही. इस्किलारमध्ये नायकाच्या समोर “सेरेपी इस्कहार एली” या शब्दाने भीषण भवितव्य समोर उभे राहते आणि तो दिग्मुढ होतो. तर प्रवासीतल्या नायकाला शेवटी झालेला सत्याचा साक्षात्कारच त्याचा तुरुंग बनतो. जीएंच्या कथासृष्टीतल्या माणसांवर ही सावली सतत पडलेली दिसते. कधी तिचे स्वरुप कुरतडणारे वाटते तर कधी भीषण. मात्र जीएंच्या कथेत या स्वरुपातील नियती हीच खरी नायिका असते अशी माझी समजूत आहे.
दुसरा मुद्दा हा कि अनेकदा असे वाटते कि टेनिसनची लेडी निदान सुंदर तरी होती. कुणास ठावुक, तिच्या मनात स्वतःविषयी कसलाही गंड नसेल. तिचा भवताल देखिल शांत, सुरेख असेल. छोटेसे बेट, बाजुने वाहणारी नदी असले मन शमवणारे दृश्य तिच्या समोर असेल. सर्व तर्हेची भरभराट असलेल्या माणसाला दु:ख असले तरी त्याची टोचणी कमी करणारी साधनेही जवळपास असतात असा एक विचार माझ्या मनात नेहेमी येतो. हे खरे नसेलही पण डोक्यावर असलेले ओझे कधीही फेकुन देता येईल ही भावना आणि मरेपर्यंत यातुन सुटका नाही या भावनेतुन येणार्या दु:खाची तीव्रताही वेगळीच असे वाटत राहते. येथे जीएंच्या कथेतील पात्रांना कसलाही विंडफॉल मिळत नाही. कसलिही सवलत त्यांना नसते. शारिरीक कुरुपता, मानसिक अपमान, हातुन घडलेल्या गुन्ह्यामुळे सतत शरमेने जळत असलेले मन, वाट्याला सतत येत असलेली वंचना आणि त्यातच भरीस भर म्हणुनच कि काय आसमंत देखिल तसाच उदासवाणा आणि त्यापासुन दूर जाण्याची शक्यता नाही आणि ऐपतदेखिल नाही. आसमंताला गडत गहिरं करीत आपल्या पात्रांची मनस्थिती रेखाटणे हे तर जीएंचे फार मोठे वैशिष्ट्य. त्यामुळे कथेचा बाज जरी टेनिसनच्या शेलॉटचा असला तरी पारवातली शेलॉट ही अस्सल जीएंच्या मुशीत घडलेली आहे. टेनिसनच्या लेडीला मृत्युमुळे सुटका आहे. जीएंच्या काशीला तो मार्ग नाही. मरेपर्यंत आपल्या कुरुप पायांमुळे तिच्या आयुष्यावर तिच्या भयंकर बापाची गिधाडछाया पडणार आहे. जीएंच्या कथेतील ही करामत पाहिली की त्यांच्या कथा वाचताना श्वास जड होऊन दम का लागु लागतो हे लक्षात येते. कुठेही जा, काहीही करा, सुट्का नाही. नियती समोर येऊन उभी ठाकणार आहे.
शेवटचा मुद्दा मला आपल्या परंपरेतील उ:शापाशी जोडावासा वाटतो. मिळालेल्या आयुष्याचं इतकं ओझं व्हावं कि शापाने येणारा मृत्युसुद्धा दाहक न वाटता उ:शापाप्रमाणे शीतळ वाटावा अशी परिस्थिती टेनिसनच्या लेडीच्या बाबतीत वाटते. एकाकीपणाचा शाप आहे पण मृत्युमुळे त्यातुन सुटकादेखिल आहे. आणि तो मृत्युदेखिल अवचितपणे घाला घालणारा नाही तर डोळसपणे, जाणीवपूर्वक स्विकारलेला आहे. जीएंच्या काशीला अशा तर्हेचा उ:शाप नाही. तिचं संपूर्ण अस्तित्वच एखाद्या शापाप्रमाणे आहे. डोळसपणे पुढे जाऊन आपल्याला हवे तसे जीवन स्विकारुन आपला अंत होईल तसेही तिच्या बाबतीत घडणार नाही. तसा ती प्रयत्न करते. बाप मेल्यावर ती कधी नव्हे ते घराबाहेर पडते. सिनेमा थियएटरकडे येते. मात्र तेथे तिला आलेले अनुभव तिचं दु:ख जास्त गडद करतात. अतिशय हताश होऊन काशी आपल्या खुराड्यात परत येते. जोपर्यंत ते सरड्यासारखे पाय आपल्या शरीराला चिकटलेले आहेत तोपर्यंत मेलेल्या बापापासून आपली सुटका नाही हे तिच्या लक्षात येते. कारण ते कुरुप पाय, बापाने त्यावरुन तिला नेहेमी हिणवणं, आईला त्याने लालभडक सळईने दिलेले डाग, काशीच्या गळ्यातुन खस्सदिशी संतापाने ओढलेली प्लास्टीकच्या मण्यांची माळ, त्याचा अनेक वर्षे टिकलेला आजार आणि त्याने बांडगुळाप्रमाणे शोषलेले काशीचे आणि तिच्या आईचे आयुष्य हे सर्व एकमेकांना जोडलेले आहे. जीएंची माणसे मरेपर्यंत एका अदृष्य तुरुंगात वावरत असतात. आणि या तुरुंगातुन सुटका होण्याचा कुठलाही मार्ग त्यांच्या कडे नसतो. हा मार्ग तर त्यांना कधी मिळत नाहीच पण येणारा प्रत्येक दिवस मनातील जखम जास्त हिरवी जास्त गहिरी करत जातो ही जीएंच्या पात्रांची शोकांतिका आहे.
अशोकरावांनी शेलॉटवर लिहिताना जीएंना काय करायचे आहे ते नेमकेपणाने हेरले आहे अशी माझी समजुत आहे. त्यांच्या लेखात ज्या गोष्टी “बिटविन द लाईन” आहेत असे मला वाटले ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. जीएंच्या कथा म्हणजे एखाद्या महासागराप्रमाणे अथांग आहेत. खोलवर जावे तितके पुढे जाता येते. तळ लागत नाही. अशोकरावांसारखी माणसे काही एक दिशा देतात आणि माझ्यासारख्यांच्या विचारांना चालना मिळते. वर मी मांडलेल्या मुद्द्यांचे मुख्य श्रेय अशोकरावांच्या विचारांना चालना देणार्या लेखाकडेच जाते हे मान्य करताना मला आनंदच वाटतो आहे.
अतुल ठाकुर
(अशोकरावांच्या ज्या लेखावरुन हा लेख लिहावा असे वाटले तो मूळ लेख जिज्ञासुंना http://www.maayboli.com/node/59332 तेथे वाचता येईल.)