मी ही कथा वाचून अनेक वर्षे झाली. आता बारीकसारीक तपशील आठवत नाहीत. जीएंच्या इतर अनेक कथांमध्ये काही गुढ पात्रं, अनोळखी प्रदेश, अनोळखी काल, निरनिराळी रुपकं धारण केलेल्या अध्यात्मिक चर्चा, अशा अनेक गोष्टी असतात. त्यातील काही नायकांशी आपली नाळ जूळत नाही इतके ते वेगळे असतात. “घर” कथेचं मात्र तसं नाही. यातील घटना आपल्या आसपास दिसतात इतकेच नव्हे तर आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात यातील काही प्रसंग आले असण्याची शक्यता आहे. खचवून टाकणारं दु:ख ही अनेकांच्या आयुष्यात येणारी बाब आहे. ती एका कथाबीजाच्या रुपात जीएंनी मांडून देखिल ही कथा वेगळी का वाटते याचा विचार मला करावासा वाटतो. याचं एक महत्त्वाचं कारण हे की ही कथा सर्वांना माहित असलेल्या वेदनेवर आधारलेली असली तरी त्या कथेला तो खास जीएंचा परीसस्पर्श झाला आहे.
विजोड व्यक्तींना एकत्र आयुष्य काढावे लागणे हे जीएंच्या अनेक कथांमध्ये घडते ते येथेही घडले आहे. मात्र कथानायकाची ज्याप्रमाणे एक बाजु असते त्याचप्रमाणे त्याच्याशी वाईट वागणार्या किंवा त्याचे न ऐकणार्या किंवा त्याच्या मनाजोगे न वागणार्या इतरांचीही एक बाजु असतेच. आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते ही सुसंगतच वागत असतात. क्रांती करणारी किंवा वाळवंटात मरणारे गाढव पाहून त्याला काशीची गंगा पाजणारी माणसं गल्लोगल्ली जन्मत नाहीत. जीएंच्या कथांमध्ये तर अशी माणसं बहुधा नसतातच. घर कथेतील माणसांनाही त्यांच्या मर्यादा आहेत. मधूकाकांनी आपल्या आईवडिलांचे दु:ख, कष्ट आणि फसवणूक पाहिली. परिस्थितीने त्यांचे केलेले हाल पाहिले. स्वतः ते हाल सहनही केले आणि घर बांधून दाखवेन अशी मनाला गाठ मारली. त्यांची बायका मुले काही त्या कष्टातून गेली नव्हती. त्यामुळे मधूकाकांच्या मनाला लहानपणापासून पडलेला पीळ त्यांना समजणे शक्यच नव्हते. तो त्यांनी समजून घ्यावा अशी अपेक्षा करणेही तितकेसे बरोबर नाही असे मला वाटते. त्यामुळे सगळं असूनही या घरासाठी चाललेल्या बचतीमुळे मधूकाकांच्या बायकामुलांना उगाचच कष्टात दिवस काढावे लागतात. त्याची अढी त्यांच्या मनाला बसणे हे साहजिक वाटते. एखादी गोष्ट मनाशी गाठ मारून ती मिळविण्यासाठी झगडणारी माणसे ही कधी कधी दुसर्याच्या बाबतीत असहिष्णू होतात ती अशी…मधूकाकांसारखी.
जीएंच्या कथांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जीएंच्या नायकाच्या विरुद्ध जाणारी माणसे ही कधीही सरळसरळ खलनायक नसतात. त्यांच्या वर्तणूकीचे स्वतःचे एक तर्कशास्त्र असते. त्या चौकटीत ती माणसे अनेकदा बरोबरच असतात. मधूकाकांनी ज्या हालअपेष्टा लहानपणी सहन केल्या त्याची धग मधूकाकांइतकीच त्यांच्या मुलांना जाणवणे ही आधी अवघड गोष्ट आणि त्यामुळे त्यांना मधूकाकांचा घर घेण्याचा हट्ट त्यांना समजणे ही तर फारच गोष्ट. त्यामुळे आपल्याला या घराच्या हट्टापायी लहानपण उपभोगता आले नाही ही भावना त्या मुलांमध्ये निर्माण झाल्यास ते चुकीचे कसे म्हणता येईल? मधूकाकांची बायको खरे तर कर्तबगार आहे. पण तिलाही मनाजोगे काहीही आयुष्यात करता आले नाही. आता तरुणपणी मुलांचे आयुष्य कोळपून जाऊ नये ही तिची धडपड आहे. तिला नवर्याबद्दल प्रेम आहे पण त्यांचा घराबद्दलचा आयुष्यभरचा आग्रह आणि त्यामुळे त्यांनी कुटूंबियांची केलेली फरफट तिलाही पटलेली नाही. मधुकाका आपल्याजागी बरोबर असले तर इतरही चुकीचे नाहीत. जीएंचं गारुड हेच असतं. ते आपल्या कथांमध्ये कधीही थेट काळीपांढरी चित्रं कधीही रंगवत नाहीत. जीएं च्या कथा या प्रामुख्याने मधल्या ग्रे शेडमध्ये रंगवलेल्या असतात.
यात एक समांतर कथानक डॉक्टरांचे येते. तेथे मात्र जीएंची नियती डोकावते. अपंगत्व असलेल्या मुलीला स्थळ येत नाही म्हणून मनोमन खचलेले डॉक्टर आणि आजवर मेहनतीने पैसे साठवून हक्काने बांधलेल्या घराची कुणालाच कशी किंमत नाही याचा आपल्या अखेरच्या दिवसात विचार करणारे मधूकाका यांना नियतीने एकत्र आणले आहे. जीएंच्या कथा वाचताना दम लागु लागतो तो अशाच ठिकाणी. कारण त्यावर उत्तर नसते. मधूकाकांची सुटका बहुधा हे आजारपणच करणार असते. त्यानंतर मग त्यांच्यामुळे अडकलेल्या सर्वांचीच सोडवणूक होणार असते. डॉक्टरांची सुटका कशी होणार हे एका ठिकाणी विहिरीजवळ मुलगी उभी असते त्यातून अत्यंत भयंकररित्या सूचित होते, तसे घडणारही नाही कदाचित. धडधाकट माणसेही अपंगांशी लग्न करताना दिसतात, पण असे जीएंच्या कथेत घडत नाही. जीएंच्या कथेत अडकलेल्या माणसांची सुटका अनेकदा मृत्युनेच होते. आणि आपल्या हाती सून्न होणे इतकेच उरते.
अतुल ठाकुर
Menu
घर (पिंगळावेळ) – जीए कुलकर्णी