उज्वलाताई जेव्हा देवी सरस्वती विद्या विकास मंदिर संस्थेच्या प्रोत्साहनसोहळ्याला बोलावतात तेव्हा ते निमंत्रण न टाळण्याची मी खबरदारी घेत असतो. कारण असा सोहळा पाहिला की आपल्या हातून जे काही थोडंफार काम होत असतं त्यामुळे हवेत तरंगायला लागलेले पाय जमिनीवर येतात. आपला अहंकार नेस्तनाबूत करायला अशा सोहळ्याला हजर राहिलेले बरे असते. गाव खेड्यात दूरवर कसल्याही सोयी नसतात तेथे जीव ओतून, कसलिही अपेक्षा न करता काम करणारी देवतूल्य माणसं तिथे भेटतात. काही समाजातील लोकांना आजही गुन्हेगार हा शिक्का माथी बसलेला असतो त्या समाजातील अनाथ मुलांसाठी काम करणारी माणसे असतात. कुणी अशा मुलांसाठी कामं करतात ज्यांना फक्त बेचकीने पक्षी मारून खाणे इतकाच उद्योग असतो. अशा अनेक संस्थांव्यतिरिक्त आईवडिल नाहीत, आजारी आहेत अथवा शिक्षणासाठी मदत करु शकत नाहीत म्हणून वैयक्तीक लाभ घेणारे विद्यार्थीही अनेक. त्यांचेही कष्ट उठून दिसत असतात. याशिवाय संस्कृत विषयात पदवीपरीक्षेत सर्वप्रथम आलेल्यांना बक्षिस असते. मला तर यातील अनेकजणांना पहिलं की त्यांच्या वयात आपल्याला फारसं काहीच कळत नव्हतं असाच फिल येतो आणि अंगात भरलेली हवा नाहीशी होते. यावर्षी उज्वलाताईंनी मला या संस्थेचे सदस्यत्व देऊन माझा फार मोठा सन्मान केला त्यामुळे आता मला ही माझी संस्था आहे असेही म्हणता येते. यावेळच्या प्रोत्साहन सोहळ्याची आणखी काही वेगळी वैशिष्ट्ये होती.
उज्वलाताई या माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या संस्कृत विषयाच्या गुरु. त्यामुळे त्या जेथे असतील तेथे संस्कृतचा प्रभाव दिसणारच. शिवाय संस्थेचे एक संस्थापक सदस्य म्हणजे मो.दि. पराडकरसर. ते तर संस्कृतचे प्रकांडपंडीत. तेव्हा या सोहळ्याच्या अध्यक्षा म्हणून यावेळी सौ.धनश्री लेले या संस्कृत विषयाच्या विख्यात विदुषी यांना बोलावले गेले हा योग म्हणजे सोन्याला सुगंध येण्यासारखाच. शिवाय धनश्रीताईंच्या गुरु म्हणजे संस्कृतच्या प्राध्यापिका मा.बाकरेबाई या देखील आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता आपल्या शिष्येचा कौतूक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या हा आणखी एक दुर्मिळ योग. यावेळी माझी वर्णी उज्वलाताईंनी स्टेजवर लावली होती त्यामुळे खरं तर मी अगदी दडपून गेलो होतो. माझ्या शेजारी धनश्रीताईं आणि त्यांच्या शेजारी बाकरेमॅडम आणि दुसऱ्या बाजूला साक्षात अय्यंगारकेंद्रातून शिकून आलेले योगशिक्षक श्री. हर्षल बक्षी सर. इतकी जबरदस्त मंडळी बाजूला असल्यावर दडपण तर येणारच. प्रोत्साहन सोहळा सुरु झाला. उज्वलाताईंना बोलताना विनोदाचा प्रसन्न शिडकावा करण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांचे निवेदन हे निव्वळ निवेदन न वाटता श्रोत्यांशी केलेले हितगुजच वाटते. या सोहळ्याला प्रोत्साहन सोहळा म्हणण्याचे कारण मदत या शब्दाला काही वेगळेही अर्थ आहेत. आमची संस्था जी माणसे आधीच कष्ट घेत असतात त्यांना आर्थिक सहाय्य करून प्रोत्साहन देते. एकामागोमाग एक विद्यार्थी, संस्थांचे कार्यकर्ते येत होते. धनादेशांचे वाटप केले जात होते. आणि हे संपल्यावर धनश्रीताई बोलायला उठल्या.
खास धनश्रीताईंना ऐकण्यासाठीदेखील अनेकजण आले होते हे उज्वलाताईंनी आधीच आपल्या बोलण्यात नमूद केले होते. धनश्रीताई बोलल्या आणि तेव्हाच त्यांच्या लोकप्रियतेचं गमक लक्षात आलं. समोर जमलेल्या लोकांच्या काळजाला हात घलण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यातच त्या अधूनमधून समर्पक संस्कृत सुभाषितांची पखरण करीत असतात. यांच्या भाषणात त्यांनी विनोदाचा आधार घेऊन अलिकडे बदलत चाललेल्या गुरुशिष्यांच्या संबंधावरही मार्मिक भाष्य केले. त्यांनी एक गोष्ट संगितली. एक गुरु शिष्याला म्हणाला अरे पाऊस पडतो आहे का बघ. शिष्य उत्तारला गुरुजी हे मांजर दारातून आत आले आहे. त्याच्या अंगावर हात फिरवून पहा कळेल पाऊस पडला आहे की नाही. काहीवेळाने गुरु शिष्याला म्हणाला अरे खूप उजेड आहे. जरा दरवाजा बंद कर. त्यावर शिष्य उत्तारला गुरुजी तुम्ही आपले डोळे बंद करा म्हणजे आपोआपच अंधार होईल. त्यानंतर जेव्हा तिसरे काम गुरुने सांगितले तेव्हा शिष्य म्हणाला गुरुजी थोडातरी संकोच बाळगा. तुम्ही सांगितलेली दोन कामे मी केली. तिसरे तरी तुम्ही करा… या कथेवर सर्वजण हसले. पण यात एक विदारक सत्य दडले होते त्यावर धनश्रीताईंनी बरोबर बोट ठेवले होते. त्यानंतर त्या आजच्या तरुण पिढीकडे वळल्या. मोबाईलने या पिढीचे संपूर्णपणे व्यापलेले जीवन लक्षात घेऊन त्यांनी त्याच भाषेचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना मोबाईलच्या फाईव्ह जी ऐवजी एका अनोख्या, नवीन “फाइव्ह जी” वर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.
पहिला जी म्हणजे जिवंतपणा. त्यात त्यांनी आमच्या संस्थेचेच उदाहरण दिले. ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना सहाय्य करण्याचा जिवंतपणा बाळगायचा. दुसरा जी म्हणजे जिव्हाळा. सहाय्य करताना ते कोरडे नको, त्यात जिव्हाळा हवा. ती दया नाही प्रोत्साहन आहे. त्यात सहानुभुतीचा ओलावा हवा. हाच जिव्हाळा. तिसरा जी म्हणजे जिज्ञासा. जगताना निरनिराळ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा हवी. चौथा जी म्हणजे जिद्द. हाती घेतलेले काम पूर्ण करीनच ही जिद्द हवी. एखादे ध्येय ठरवल्यावर त्याकडे पूर्ण लक्ष देऊन वाटचाल करायला हवी. पाचवा जी म्हणजे जिजीविषा आणि विजीगिषा. हाती घेतलेले काम तडीस नेण्याची दुर्दम्य इच्छा, त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्याची तयारी. आणि अथकपणे ध्येयाकडे वाटचाल करण्याचा चिवटपणा हे सारे त्यात आले. हा नवीन “फाईव्ह जी” मंत्र देऊन धनश्रीताईंनी आपले भाषण संपवले. त्यांच्या भाषणात वारंवार टाळ्या पडत होत्या. त्यात विचाराला प्रवृत्त करतील अशा अनेक गोष्टी होत्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे समाजात कुणालाच अशा प्रोत्साहनाची गरज न लागो इतकी आपल्या समाजाची भरभराट होवो अशी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा. ती मला अतिशय महत्वाची वाटली.
या देखण्या सोहळ्याची सांगता चविष्ट अशा भोजनाने झाली. श्रावणातल्या शनिवारी उपवास असलेल्यांसाठी वेगळ्या खिचडीचीही सोय होती. सोहळ्याने मन तृप्त झाले होते. जेवणाने उदरही तृप्त झाले. बाहेर पडल्यावर आपले पाय पुन्हा जमिनीवर आले आहेत हे जाणवले.
अतुल ठाकुर
एक प्रोत्साहन सोहळा…