अनेक वर्षे मास्तरकी करीत असल्याने अनेक शिक्षकांबरोबर काम करण्याचा योग आला आहे. शिक्षक कसे असतात याबद्दल माझी काही मते बनली आहेत. ही मते वैयक्तिक असल्याने त्यांना तशी फारशी किंमत नाही. मात्र आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनही वावरत असल्याने अनेक शिक्षकांकडून अनेक विषय शिकलोही आहे. मी स्वतः सामान्य बुद्धीचा विद्यार्थी आहे. अतिशय तल्लख, पटकन विषय समजणारी मंडळी असतात तसे माझे होत नाही. मला वेळ लागतो. त्यामुळे माझ्या पातळीवर येऊन शिकवणार्या शिक्षकांविषयी मला फार आपुलकी वाटते. काही प्रचंड ज्ञानी माणसे पाहिली आहेत. पण त्यांचे शिकवणे माझ्यातरी डोक्यावरून गेले आहे. खुप माहित असलेल्यांना शिकविण्याची कला अवगत असतेच असे नाही हेही लक्षात आले आहे. अशावेळी प्रचंड ज्ञान आहे आणि ते देण्याची कलाही अवगत आहे अशा काही दुर्मिळ शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याचा योग आला आहे. आमच्या उज्ज्वलाताई अशा शिक्षिका आहेत असं मला मनापासून वाटतं. त्यांच्याबद्दल सांगण्याआधी मला माझ्या संस्कृतच्या अभ्यासाविषयी बोलणे भाग आहे. माझा संस्कृतचा अभ्यास आणि समाजशास्त्रावरील प्रबंधाचे संशोधन जवळपास सारख्याच वेळी सुरु झाले. अशावेळी प्राथमिकता ही संशोधनाला होती त्यामुळे इच्छा असूनही संस्कृतला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यातून व्याकरणाचा सुरुवातीपासूनच कंटाळा होता. काव्यशास्त्र हा आवडता विषय. व्याकरणाकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष दिले नाही. हा विषय कच्चाच राहिला. एखाद्या विषयाची नावड असली आणि पुढे तो विषय कच्चा राहिला की त्या विषयाची भीती वाटू लागते असा माझा अनुभव आहे. संस्कृत व्याकरणाबद्दल माझे असेच झाले. आजही मी संस्कृत व्याकरणात कच्चाच आहे. पण या विषयाची भीती मात्र पूर्णपणे निघून गेली आहे हे मी आत्मविश्वासाने सांगु शकतो. रोजच्या व्यापात पुरेसा वेळ देता आला तर हा विषय मला आपले अंतरंग उघडून दाखवू शकेल असा विश्वास मला वाटतो. याचे सारे श्रेय उज्ज्वलाताईंना जाते.
व्याकरणाचे काय करावे, कुठे जावे याच्या विचारात असताना फार पूर्वी एका ठिकाणी शिकायला गेलो होतो तेथेच जाण्याचा सल्ला दिला गेला. तेव्हा वेगळे शिक्षक होते. आता उज्ज्वलाताई शिकवणार होत्या. उज्ज्वलाताईंच्या क्लासला जावे असे ठरवले. वर्ग त्यांच्या घरीच होता. पहिल्या दिवशी उज्ज्वलाताईंनी शिकवायला सुरुवात केली आणि व्याकरणाची भीती पळूनच गेली. एखाद्या विषयात रंगलेली मंडळी पाहणं ही माझ्यासाठी नेहेमी अतिशय आनंदाची बाब असते. या माणसांना विषय शिकवण्याची तळमळ असते. त्यांना विद्यार्थांना समजवण्याची कळकळ असते आणि जर विद्यार्थ्यांना आपण शिकवत असलेला विषय नीट समजला नाही तर त्यांना हळहळ वाटते. ते विषय आणखी सोपा करून शिकवतात. पहिल्या दिवशी प्रसन्न व्यक्तीमत्वाच्या हसतमुख उज्ज्वलाताई हात जोडून नमो नमः म्हणत समोर आल्या आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. तेव्हापासून आजवर मी तरी उज्ज्वलाताईंना हसतमुखच पाहिले आहे. त्यांनी अगदी संस्कृतच्या स्वर व्यंजनापासून सुरुवात केली. निरनिराळ्या पार्श्वभूमीचे, वयाचे स्त्रीपुरुष वर्गात होते. त्यांना काही प्रश्न विचारून उज्ज्वलाताईंनी बोलते केले होतेच. कोण कुठल्या पातळीवर आहे याचा त्यांना अंदाज होता. प्रत्येकाची कुवत, वय, समजण्याची क्षमता, मातृभाषा, शेक्षणिक पात्रता अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन उज्ज्वलाताईंनी आम्हाला शिकविण्यास सुरुवात केली. आमची संस्कृतची भीती जावी म्हणून त्या करीत असलेला उपाय तर अफलातूनच होता. “अहं पतामि, अहं पिबामि, अहं गायामि” सारखी छोटी छोटी वाक्ये त्या आमच्याकडून बनवून घेत. ती आम्हाला पाठ करायला लावीत आणि सर्वांसमोर अभिनय करून म्हणायला सांगत. विद्यार्थ्यांना ही छोटी छोटी वाक्ये बनवता आल्यावर त्यांची संस्कृतची भीती कमी होत असेच. पण सर्वांसमोर बोलण्याची भीतीही नाहीशी होत असे. त्यातही उज्ज्वलाताईंचा उच्चारांकडे कटाक्ष असतो. शब्दांचा नीट उच्चार करेपर्यंत त्या विद्यार्थ्याला तो शब्द पुन्हा पुन्हा म्हणायला लावीत. हे झाले एकटा विद्यार्थी समोर येऊन बोलत असे तेव्हा. अनेकदा उज्ज्वलाताई संपूर्ण वर्गाकडून काही शब्द, विभक्ती प्रत्यय म्हणून घेत. अशावेळी एखाद्या तरबेज संगीतकाराला कोरसमध्ये गाणार्या एखाद्याचाच स्वर चुकीचा लागला तर जसे लगेच कळते तसे उज्ज्वलाताईंना आमच्यापैकी कुणी चुकीचा उच्चार केल्यास लगेच कळत असे. मग त्या पुन्हा ते सारे आमच्याकडून म्हणून घेत.
वर्गात संस्कृतबद्दल अनेक समजूती असलेली माणसे येतात. अशावेळी सर्वांशी जमवून घेणे हे कर्मकठिण काम. पण उज्ज्वलाताई हे लिलया करतात. एखादा विषय तर्काच्या अथवा विज्ञानाच्या पातळीवर चुकीच्या दिशेने जाऊ लागल्यास त्या तत्काळ थांबवतात. संस्कृतबद्दल पराकाष्ठेचा आदर आणि प्रेम पण विद्यार्थ्यांपैकी कुणी काहीच्याबाही विधाने केल्यास उज्ज्वलाताई मान्यता देत नाहीत. हळुहळु वर्ग पुढे जाऊ लागतो अणि अवघड विषयांना सुरुवात होते. अशावेळी रोजच्या रोज अभ्यास करा हे सांगण्यावर उज्ज्वलाताईंचा भर असतो. रोजच्या वर्गात एकदा तरी उज्ज्वलाताई रोजच्या अभ्यासाबद्दल बोलणारच. त्यांना गृहपाठ देण्याची सवय आहे. अनेकांना तो पूर्ण करता येत नाही. अशावेळी त्या प्रत्येकाला अभ्यास पूर्ण करण्यात कसली अडचण येते ते विचारून ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा रोजच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यांनी विषय इतका सोपा केलेला असतो आणि त्यांनी आपल्यासाठी घेतलेली मेहनत आपल्याला इतकी जाणवते की आपल्याकडून अभ्यास झाला नाही याची आपल्यालाच अतिशय लाज वाटते. उज्ज्वलाताईंच्या बाबतीत मला विलोभनीय वाटणारी गोष्ट म्हणजे त्यांचा आपल्या विद्यार्थ्यांवर असलेला नैतिक धाक. त्यांची शिकवण्याची तळमळ इतकी असते की उज्ज्वलाताईंना कमीपणा येऊ नये म्हणून तरी आपण अभ्यास केला पाहिजे असे अनेकांना वाटत असणार याची मला खात्री वाटते. आपल्याला कमी मार्क मिळाले तर आपल्या शिक्षकाला बोल लागेल ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात येणे यासारखे दुसरे भाग्य नाही. आणि उज्ज्वलाताईंना हे भाग्य पुरेपूर लाभले आहे. त्यामुळेच जेव्हा जुन्या बॅचची मंडळी कधी वर्गाला आली तर त्यांच्या तोंडून उज्ज्वलाताईंबद्दल कृतज्ञतेने भिजलेले शब्दच बाहेर पडतात. उज्ज्वलाताईंच्या वर्गात संस्कृतचा अभ्यास चालत असला तरी या वर्गाचा बाज रुक्ष किंवा गंभीर असा नसतो. त्यांच्या वर्गाच्या लोकप्रियतेचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. संस्कृतविषयक गप्पांचा त्यांच्याकडे प्रचंड साठा आहे. त्याबरोबर प्रसन्न अशी विनोदबुद्धी उज्ज्वलाताईंकडे आहे. अशावेळी त्या वर्गात हशा पिकवून वातावरण हलकेफुलके ठेवू शकतात. त्यामुळे निव्वळ संस्कृतच नव्हे तर एकंदरीत शिकवण्याची पद्धत म्हणूनही उज्ज्वलाताईंचे शिकवणे मला आदर्श वाटते.
बाकी प्रत्येक माणसाची एक हळवी बाजु असते हेच खरं. संस्कृत व्याकरणाच्या बारीक सारीक खाचाखोचा सहजपणे दाखविणार्या, वर्ग हसतखेळत ठेवणार्या, उज्ज्वलाताई हळव्या होत असतीत तर त्यांचे गुरु मो.दि. पराडकरांचा उल्लेख आल्यावर. अध्यात्मात एखाद्या शिष्याने आपल्या सदगुरुबद्दल बोलावं अशा तर्हेने त्या अतिशय आदराने आपल्या गुरुबद्दल बोलतात. त्यांच्या गोष्टी आम्हाला सांगतात. स्वतः उज्ज्वलाताईंनी बर्याच उशीरा म्हणजे जवळपास पन्नाशीला आल्यावर संस्कृतचा अभ्यास करायला सुरुवात केली. आज संस्कृत जगतात त्यांना अनेक मानसन्मान मिळाले आहेत. अनेक संस्थांबरोबर त्या कार्यरत आहेत. अनेक थोरामोठ्यांशी त्यांचा संबंध आला आहे. मात्र गप्पांची गाडी पराडकरसरांवर आली की उज्ज्वलाताई खुलतात. सरांचे ज्ञान, त्यांचे पांडित्य, त्यांचा अभ्यास, त्यांचा चौफेर व्यासंग यावर किती बोलु किती नको असं त्यांना होतं. त्यांच्या आवाजात सरांबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावनेचा गंध दरवळत असतो. संस्कृतच्या अनुषंगाने इतर गोष्टी म्हणजे राष्ट्रप्रेमाच्याच. उज्ज्वलाताईंना भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल वाटणारं विलक्षण प्रेम त्यांच्या इतर गप्पांमधून वारंवार डोकावतं. देवी सरस्वती विद्याविकास ट्रस्ट ही पराडकरसरांनी स्थापन केलेली संस्था. उज्वलाताई अगदी सुरुवातीपासून या संस्थेच्या पदाधिकारी आहेत. ही संस्था गरजू विद्यार्थी आणि खेड्यापाड्यात, जंगलात काम करणाऱ्या इतर संस्थांना मदत करते. उज्वलाताई जेव्हा वार्षिक संस्थेच्या प्रोत्साहन सोहळ्याला बोलावतात तेव्हा ते निमंत्रण न टाळण्याची मी खबरदारी घेत असतो. कारण असा सोहळा पाहिला की आपल्या हातून जे काही थोडंफार काम होत असतं त्यामुळे हवेत तरंगायला लागलेले पाय जमिनीवर येतात. आपला अहंकार नेस्तनाबूत करायला अशा सोहळ्याला हजर राहिलेले बरे असते. गाव खेड्यात दूरवर कसल्याही सोयी नसतात तेथे जीव ओतून, कसलिही अपेक्षा न करता काम करणारी देवतूल्य माणसं तिथे भेटतात. काही समाजातील लोकांना आजही गुन्हेगार हा शिक्का माथी बसलेला असतो त्या समाजातील अनाथ मुलांसाठी काम करणारी माणसे असतात. कुणी अशा मुलांसाठी कामं करतात ज्यांना फक्त बेचकीने पक्षी मारून खाणे इतकाच उद्योग असतो. अशा अनेक संस्थांव्यतिरिक्त आईवडिल नाहीत, आजारी आहेत अथवा शिक्षणासाठी मदत करु शकत नाहीत म्हणून वैयक्तीक लाभ घेणारे विद्यार्थीही अनेक. त्यांचेही कष्ट उठून दिसत असतात. याशिवाय संस्कृत विषयात पदवीपरीक्षेत सर्वप्रथम आलेल्यांना बक्षिस असते. मला तर यातील अनेकजणांना पहिलं की त्यांच्या वयात आपल्याला फारसं काहीच कळत नव्हतं असाच फिल येतो आणि अंगात भरलेली हवा नाहीशी होते. उज्वलाताईंनी मला या संस्थेचे सदस्यत्व देऊन माझा फार मोठा सन्मान केला त्यामुळे आता मला ही माझी संस्था आहे असेही म्हणता येते
एकदा उज्वलाताई या संस्थेबद्दल जे म्हणाल्या होत्या ते डोळ्यात अंजन घालणारे होते. त्या म्हणाल्या आमच्या संस्थेला देणगी देणारी सर्वच माणसे श्रीमंत असतात असे नाही. चांगल्या कार्याला स्वतःकडचे धन देणे ही एक मानसिकता आहे. त्यांना अशीही माणसे भेटली ज्यांना देण्याची इच्छा आहे पण पैसे फारच कमी असल्याने संकोच वाटतो. त्यांना उज्वलाताईंनी सांगितले तुम्ही दहा रुपये जरी दिले तरी मी घेईन कारण त्यातून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पेन्सीली येतील. अगदी सामान्य परीस्थिती असलेली माणसे संस्थेला एक विशिष्ट रक्कम जणू बॅंकेत बचत करावी इतक्या नियमितपणे दान म्हणून देत असतात. सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटली ती ही की संस्थेवर असलेला समाजाचा विश्वास. त्यामुळे कोरोनासारख्या काळातही संस्थेला धनाची कमतरता पडली नाही आणि संस्थेला कोरोना काळातही आवश्यकता असलेल्यांना भरघोस मदत करता आली. गीतेत भगवंताने योगक्षेमं वहाम्यहम् म्हटले आहे त्याचा अर्थ आता लक्षात आला. समाजाची अनन्य भावाने काळजी वाहणाऱ्या संस्थेचा योगक्षेम समाजच कसा वाहत आहे याचे प्रत्यक्ष दर्शन येथे घडते. संस्थेच्या कार्यकर्त्या ही उज्वलाताईंची एक बाजू आणि संस्क्रुत शिक्षिका ही दुसरी बाजू. संस्थेचे काम करताना, लोकांशी बोलताना उज्वलाताई हळव्या होतात मात्र संस्कृतच्या वर्गातील बेशिस्त उज्ज्वलाताई जराही खपवून घेत नाहीत. एकदा “लिहू नका” सांगितलं म्हणजे “लिहू नका” फक्त फळ्याकडेच लक्ष द्यायचं. कुठली गोष्ट लिहायची, कधी लिहायची याबाबत त्यांचं एक गणित आहे. त्यानूसारच वर्ग चालतो. काहीजण हावरेपणाने दिसेल ती गोष्ट टिपण्याचा प्रयत्न करतात आणि शिक्षक काय बोलत आहे याकडे लक्षच देत नाहीत. अशावेळी उज्ज्वलाताई त्या विद्यार्थ्याला नीट समज देतात. मी एकदा वर्ग चालु असताना मोबाईल उघडला होता तेव्हा “बॅड मॅनर्स” म्हणून उज्ज्वलाताईंनी मला खडसावलं होतं. याचं कारण म्हणजे वर्गाच्या सुरुवाती०लाच उज्ज्वलाताईंचा एक सूर लागलेला असतो. कुणी कुजबुजत असल्यास किंवा लक्ष देत नसल्यास त्यात व्यत्यय येतो. शिवाय आम्हाला अजूनही हा विषय लक्षात आला नाही हे बोलायला आमच्यासारखी मंडळी पुन्हा तयारच. त्यामुळे हलकेफुलके वातावरण आणि शिस्त असा सुरेख दुहेरी संगम त्यांच्या वर्गात असतो.
अभ्यासक्रम संपताना शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याचे उज्ज्वलाताई वैयक्तिक नाते जुळलेले असते याबद्दल माझी खात्री आहे. कारण उज्ज्वलाताई फक्त आपल्यासाठीच शिकवत आहेत अशी प्रत्येकाची भावना होते. इतकी ती शिकवणी पर्सनल होऊन जाते. प्रत्येकाची समज वेगळी, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, त्या सोडवताना उज्ज्वलाताई या त्यांच्या समुपदेशक झालेल्या असतात. त्यांना धीर देतात. उज्ज्वलाताईंच्या वर्गाच्या शेवटी संस्कृत भाषेचा जयघोष होतो. त्यात एक ओळ आहे “संस्कृत भाषा, सरला भाषा”. ही भाषा माझ्यासारख्यांसाठी “सरला” केली ती उज्ज्वलाताईंनी. त्यांच्याइतकी मेहनत घेण्याची माझी कुवत नाही. पण त्यांनी आपला आदर्श मात्र आमच्यासमोर ठेवला आहे. त्यावर पाऊल टाकून पुढे जाण्याचा माझा प्रयत्न राहिल. आमच्या परीक्षेच्या दिवशी वर्गाला येताना त्यांनी आमच्यासाठी चॉकलेट्स आणली होती. “कुछ मीठा हो जाये” म्हणत त्यांनी ती सर्वांना वाटली. आमचे आनंदी चेहरे पाहून त्या म्हणाल्या, “मला हे आवडतं. कुणाच्याही चेहर्यावर तणाव नाही”. खरं तर उज्ज्वलाताईंनी शिकवल्यावर कुणालाही संस्कृतचा तणाव वाटणे शक्यच नाही. पण त्याच वेळी आमच्या वर्गातील एक ज्येष्ठ विद्यार्थीनीने त्यावेळी जणु काही आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या “आम्हाला ताण याचाच आहे की आम्ही इतकं तरी चांगलं परफॉर्म करायला हवं की तुमच्या नावाला कमीपणा येता कामा नये.” यातच सारे काही आले. विद्यार्थ्याला शिक्षकाने आपल्यामागे घेतलेल्या मेहनतीचा धाक वाटावा. त्यासाठी आपण अभ्यास करायला हवा ही भावना त्याच्या मनात यावी हे मला सर्वोत्तम शिक्षकाचं लक्षण वाटतं. आणि अशा शिक्षकाच्या हाताखाली शिकायला मिळण्याचं भाग्य मला मिळालं यासाठी मला देवाचे खुप खुप आभार मानावेसे वाटतात.
अतुल ठाकुर
आमच्या उज्ज्वलाताई