You are here:
आंबट वरण, उंधियू आणि रेखाताई

एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे पूर्णब्रह्म म्हटले गेले आहे त्याचा अर्थ अशावेळी उमगतो. प्रेमाने रांधून समोरच्याला वाढले आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, त्याचा आत्मा तृप्त झाला की जो दूवा मिळत असेल त्याने काय होऊ शकणार नाही? परवा आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळात रेखाताई आचार्य यांनी आपला पार्किन्सन्ससोबतचा प्रवास उलगडला आणि या अन्नपूर्णा असलेल्या ताईंच्या आरोग्याचे रहस्य लक्षात आले. या सभेच्या आधी मला त्यांचे काही फोटोज आणि विडीयो पाठवले होते. त्यात त्या आंबट वरण आणि उंधियो करताना दिसतात. त्यांची मुलाखत आशाताई आणि शोभनाताई यांनी घेतली. त्या दोघीही त्यांचा पाहुणचार अनेकदा घेतलेल्या आहेत.

रेखाताईंना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी पार्किन्सन्स झाला. आज त्या पंचाहत्तर वर्षाच्या आहेत. पार्किन्सन्ससारख्या वाढत जाणाऱ्या आजारात हा टप्पा तसा मोठा आहे. याचा एक महत्वाचा अर्थ म्हणजे रेखाताईंनी हा आजार आटोक्यात ठेवला आहे. त्यांनी सुरुवातीलाचा पार्किन्सन्स झाल्यावर “आपल्यालाच का हा आजार झाला” अशासारख्या प्रश्नाचा स्वतःला त्रास होऊ दिला नाही हे सांगून टाकले. येथे मला हे आवर्जून सांगावेसे वाटते की त्यांनी असे करून आजार आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने फार मोठी झेप घेतली. बहुतेकांना या प्रश्नाचा फार त्रास होतो आणि त्यातून बाहेर आल्याशिवाय आजाराचा स्वीकार होणे कठीण होऊन बसते. माझ्या लक्षात आलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हा आजार झाल्यावर त्या करीत असलेले कुठलेही काम थांबवले नाही. मग ते इतरांना मदत करणे असो, लहान मुलांना शिकवणे असो, किंवा त्यांचे आवडते स्वयंपाक करणे असो. त्या कार्यरत राहिल्या आणि आजही कार्यरतच आहेत. हेच त्यांच्या आरोग्याचे रहस्य आहे असे मला वाटते.

पार्किन्सन्स झाल्यावर त्या आमच्या मंडळात आल्या आणि मंडळाच्याच होऊन गेल्या. नेमाने सभेला हजेरी तर होतीच शिवाय लांबची, जवळची कुठलीही सहल असो रेखाताई असणारच. एकदा मंडळाच्या कार्यकारीणीची सभा त्यांच्या घरी होती. रेखाताईंचा उत्साह इतका की त्यांनी प्रत्येकाला फोन करून आपल्याकडे कसे यायचे हे सांगितले. संध्याकाळची वेळ होती सर्वांना वाटलं होतं की रेखाताईंनी बाहेरुन काही पदार्थ आणून चहासोबत खाण्याची सोय केली असेल. पण त्यांची केलेली तयारी पाहून सर्वजण थक्क होऊन गेले. त्यांनी सर्वांसाठी गुळपोळी, दहीवडे आणि तूरीच्या दाण्यांची कचोरी, सोबत चटणी अशी खाण्याची रेलचेल केली होती. शोभनाताईंना हरभऱ्याची डाळ चालत नाही हे रेखाताईंनी मुद्दम लक्षात ठेवून कुठल्याही पदार्थात हरभरा घातला नव्हता. “शोभनाताई, आता कुठलाही पदार्थ बिनधास्त खायला हरकत नाही” असेही त्यांनी सांगून टाकले. शोभनाताईं तर हा प्रसंग सांगतानाही भारावून गेल्या होत्या.

पुढच्या मुलाखतीत रेखाताईंचे अनेक गुण उलगडत गेले. त्या अमेरिका, इंग्लंड येथे गेल्या तेव्हा त्यांनी तेथिल लहान मुलांच्या शाळेला भेट दिली. अमेरिकेत तर त्या काही महिने शेजारच्या शाळेत जाऊन दिवसाचा काही काळ काम करून घालवत होत्या. बालवाडीत काम केले असल्यामुळे रेखाताईंचा लहानमुलांकडे ओढा फार. लहान मुले जसे निर्व्याज निरागस प्रेम देऊ शकतात तसे इतरांकडून मिळणे दुर्मिळ असे त्यांचे मत आहे. अमेरिकेतील शाळेत त्यांनी एकदा शाळेच्या नियमात बसणारा खाऊ देखील मुलांना दिला होता. रेखाताईंना आजही पाढे पाठ आहेत. गाण्यांच्या भेंड्यांमध्ये त्यांचा हात कुणाला धरता येणार नाही. शब्दकोडी तर त्या इतक्या वेगात सोडवतात की कुणीही थक्क व्हावे.

रेखाताईंसारखी सातत्याने कार्यरत राहणारी माणसे उर्जावान असतात. मंडळाच्या आधारस्तंभ असलेल्या शोभनाताईंना भेटल्यावर अनेक स्त्री शुभार्थी मिठी मारतात. शोभनाताईंकडून आपल्याला उर्जा मिळते असे अनेकांचे म्हणणे असते. पण कालच्या कार्यक्रमात शोभनाताई म्हणाल्या आजही रेखा भेटली की मला मिठी मारते आणि तिच्या मिठीतून मलाच उर्जा मिळाल्यासारखी वाटते. शोभनाताईंनी रेखाताईंसाठी एका ठिकाणी बुद्धिमान हा शब्द वापरला आणि माझ्यासमोरचे चित्र पूर्ण झाल्यासारखे वाटले. रेखाताईंनी आजाराचा चटकन केलेला स्वीकार हे त्याचेच उदाहरण. शिवाय त्यांनी स्वतःला सातत्याने कार्यरत ठेवले. योग्य उपचार घेतले. योग, प्राणायाम तर त्या आजही करतात. शिवाय त्यांचा अत्यंत आवडता स्वयंपाक करून इतरांना तृप्त करण्याचा छंद सुरु आहेच. त्यांच्या मुलानेही आईच्या या गुणाचे तोंडभरून कौतूक केले. इतके सारे गुण असलेल्या रेखाताईंच्या आयुष्यात आलेला पार्किन्सन्स आता कायम अंग चोरून दूरच उभा असल्यास नवल ते काय?

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment