You are here:
अस्वीकाराचा स्वीकार – डॉ. आनंद नाडकर्णी

आज पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विचार ऐकण्याचा योग आला. त्यांची पुस्तके वाचत असतो. पण प्रत्यक्ष त्या व्यक्तीकडून त्यांचे विचार ऐकण्याची मजा वेगळीच असते. मुक्तांगणच्या संघर्ष सन्मान पुरस्कारामध्ये डॉक्टरांना बोलताना ऐकले आहे. पण ते वेगळ्या भूमिकेत. येथे त्यांनाच प्रश्न विचारले जात होते. डॉक्टरसाहेबांच्या बोलण्यात सहजपणे एखादा अतिशय महत्वाचा मुद्दा येतो असा माझा अनुभव आहे. एकदा मुक्तांगणला ते बोलत असताना विलपॉवरपेक्षा विलिंगनेस महत्वाची हा मुद्दा त्यांनी मांडला होता. आज एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अस्वीकाराचा स्वीकार अशा शब्दप्रयोग केला. आणि तो शब्द माझ्या मनात रुतून बसला.

कुठलाही गंभीर आजार झाल्यावर दुःख होणं, हताश होणं, नैराश्य येणं, हे आपल्याच वाट्याला का आलं असं वाटणं हे नैसर्गिक आहे. माणुस कधीही आपल्याला आजार झाला आहे, आपल्या अनेक गोष्टींवर बंधने आली आहेत, अनेक गोष्टी करताना आपल्याला अडचणी येऊ शकतात हे स्वीकारत नाही. आणि ते साहजिकच आहे. हा अस्वीकार नैसर्गिक आहे हे आधी स्वीकारायला हवं. त्याच्याशी उगाचच टक्कर घेऊ नये. आपल्याला वाटणारे दुःख हे स्वाभाविक आहे याचा स्वीकार केल्यावर माणुस पुढची पायरी म्हणून त्यावर काय उपाय करता येईल याचा विचार करु लागतो. जर अस्वीकाराच्याच पायरीवर आपण राहिलो तर पुढची प्रगती होणार नाही. स्वीकार ही देखील एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. सुरुवातीला माणसे रडतखडतच वस्तुस्थितीचा स्वीकार करतात.

मात्र त्यावर नेहेमी विचार केल्यास हा स्वीकार अंगवळणी पडू शकतो. स्वीकार ही सातत्याने चालणारी एक प्रक्रिया आहे याकडे डॉक्टरसाहेबांनी आज लक्ष वेधले. तो दररोज गिरवावा लागतो. त्यानंतर त्यांनी आपल्यात चांगले काय आहे त्याकडे आपले लक्ष केंद्रित करावे असे त्यांनी सांगितले. वयाच्या नवव्या वर्षी पोलियो झालेल्या डॉक्टरसांहेबांना हे लक्षात आले की आजार फक्त आपल्या पायांना झाला आहे. आपले बाकी अवयव व्यवस्थित काम करताहेत. पोलियोमुळे खेळ खेळून मैदान गाजवता न आलेल्या डॉक्टरांनी चार खेळांमध्ये समालोचन करण्यात प्राविण्य मिळवले आणि कॉलेजच्या दिवसात मैदान गाजवले. स्वतःतील चांगले शोधून त्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या दुःखावर मात करण्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण होते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment