नमस्कार,
आपल्या घरात व्यसन आहे आणि रोज तमाशा होत असतो हे कुणाला बाहेर सांगायला आवडेल? ही अत्यंत कठीण परिस्थिती असते. क्वचित जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत बोलता येते. बहुधा माहेरी आईवडिलांना ताण नको म्हणून स्त्रिया सांगत नाहीत आणि मनात कुढत राहतात.
अशावेळी बाहेर घरातली परिस्थिती कळु नये आणि आपली अब्रु जाऊ नये म्हणुन घरचे सर्वच धडपडत असतात. खरी परीस्थिती सांगण्याची सोय नसते.
घरातलं व्यसन बाहेर कळु नये म्हणून जे धडपडावं लागतं त्याचा प्रचंड ताण येऊ शकतो. मनातले सांगायला कुणी मिळत नाही आणि बाहेर कळु नये असेही वाटते अशा चमत्कारिक अवस्थेत कुटुंबातील माणसे अडकलेली असतात. व्यसनावर शास्त्रिय उपाय जोवर केले जात नाहीत तोवर AA मिटिंग किंवा स्वमदतगटासारखे पर्यायही समोर नसतात.
त्यातच अनेकदा व्यसनाचा जोर वाढतो. व्यसनी माणुस शारिरीक हिंसेपर्यंत उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे इकडे आड तिकडे विहिर अशी अवस्था निर्माण होते. या अवस्थेवर तत्काळ उपाय म्हणजे व्यसनमुक्तीसंबंधी एखाद्या स्वमदतगटात जाऊन तेथे आपले मन मोकळे करणे. अशीवेळी मानसोपचारतज्ञ अथवा समुपदेशकाचीही मदत घेता येईल.
अतुल ठाकुर