नमस्कार,
व्यसनमुक्तीकेंद्रात दाखल झाल्यावर माणसाने प्रामाणिकपणे उपचारांमध्ये भाग घेणे अपेक्षित असते. अनेकदा घरच्यांनी कष्ट करुन पैशांची जुळवाजुळव केलेली असते. कारण व्यसनामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावलेली असण्याची शक्यता असते. अशावेळी व्यवस्थित उपचार घेऊन, सांगितलेल्या उपायांप्रमाणे आचरण करून व्यसनमुक्तीच्या मार्गावर वाटचाल करु लागणे हाच एकमेव उत्तम मार्ग असतो.
पण इतक्या सरळ आणि सहज सुटेल तर ते व्यसन कसले? काहीवेळा व्यसनी माणसाने कसलेतरी खूळ डोक्यात घेतलेले असते. त्यामुळे व्यसनमुक्तीकेंद्रातही त्याच्याकडून असत्याचरण घडू शकते. उदाहरण द्यायचं झालं तर काही माणसे उपचारांमध्ये भाग घेतल्याचं फक्त नाटक करतात. पण त्यांचे मन त्यात नसते. आपल्याला येथे दाखल केले याचा राग त्यांच्या मनात असतो.
या अशा तर्हेने डूख धरून राहिलेल्या व्यक्ती एकदा येथून बाहेर पडलो की व्यसन करूनच दाखविन अशी गाठ मनात बांधून असतात आणि तसे ते करुनही दाखवतात. ही माणसे आपल्या असत्याचरणाने घरच्यांना फसवतात. उपचारकेंद्रात त्यांच्यावर मेहनत घेणार्या माणसांना फसवतात. पण खरं सांगायचं तर ही माणसे स्वतःलाच फसवत असतात. अशा वागण्याने त्याचं स्वतःचंही अतोनात नुकसान होणार असतं.
व्यसनमुक्तीच्या दरम्यान आणखी कशा तर्हेचं असत्याचरण घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचे आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर