नमस्कार,
काहीवेळा असे दिसते की आधी मनोविकारावर काम करावे लागते आणि मग व्यसनावर. अनुभवी समुपदेशक आधी काय हे ओळखु शकतात. कारण समोर दिसणारे व्यसन हे कुठल्यातरी मनोविकाराचे लक्षण असु शकते. माझ्या पाहण्यात अशी एक केस होती. तो मुलगा आईवर हात उगारु लागला होता. सर्वसाधारणपणे व्यसन हे तरुणवयात जडु लागते. अशावेळी शारिरीक दृष्ट्या आईवडील उताराला लागलेले असतात. पूर्वीसारखी मुलाला शिक्षा करता येत नाही. धाक उरलेलाच नसतो. या परिस्थितीत मुलगा जर हिंसक होऊ लागला तर आईवडील दोघांनाही आवरत नाही.
या मुलाला मामा वगैरे पुरुष नातेवाईक जवळपास जबरदस्तीने पाठपुरावा सभेला घेऊन आले होते. त्याला मुक्तांगणमध्ये दाखल करावे असे त्या सर्वांचे म्हणणे होते. आई बिचारी बाजुला भेदरून बसली होती. मुलगा मात्र अगदी बिनधास्त आणि नि:शंक बसला होता. त्याने स्वच्छपणे सांगितले की उपचारांची गरज आईलाच आहे. मला नाही. मला काहीही झालेले नाही. आपल्याला येथे उगाचच घेऊन आले आहेत असे त्याचे म्हणणे होते. हा मुलगा कॉलेज मध्येच सोडून घरी बसला होता आणि दिवसभर घरात बसून हा विड्या फूंकीत असे.
आईवर हात का उगारला असे विचारता हिन्दी चित्रपटाच्या कुठल्याशा हिरोचे नाव घेऊन तो म्हणाला की मी त्याच्यासारखा व्यायाम करीत होतो. तेव्हा आई मध्ये आली आणि तिला लागले. या मुलाला मुक्तांगणच्या आधी मानसोपचाराची गरज आहे असा निर्णय समुपदेशकाने दिला.
व्यसनात असलेली माणसे कशी भानावर नसतात याचे हे एक उदाहरण होते. व्यसनामुळे घरात आणखी काय घडतं याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर