About Us

नमस्कार,

समाजशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी मुक्तांगणला जाण्यास सुरुवात केली आणि समाजशास्त्रासोबतच मानसशास्त्राचाही अभ्यास करण्याची उत्सुकता निर्माण झाली. आजवर मानसशास्त्र हे वाचनापुरतेच मर्यादित होते. पण आता व्यसन आणि व्यसनमुक्तीच्या निमित्ताने समुपदेशनाबद्दल बरीच माहिती मिळाली. पुढे समाजशास्त्रात पीएचडी झाल्यावर रीतसर मानसशास्त्रातही पदव्युत्तर पदवी मिळवली. निरनिराळे मनोविकार, त्याचा शरीर, मनावर, कुटुंबावर आणि एकंदर समाजावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणे सुरु झाले. समाजात याविषयी असलेले गैरसमजही लक्षात आले. चिंतारोग (Anxiety), नैराश्य (Depression) अशासारख्या माणसाला आतून पोखरुन काढणाऱ्या अनेक मानसिक आजारांची सविस्तर माहिती मिळू लागली. व्यसनमुक्ती बाहेरचे मानसशास्त्राचे जग दिसू लागले. त्यानंतर गेली अनेक वर्षे व्यसनमुक्ती या विषयावर लेखन केले. या लेखनाचा आम्हाला उपयोग होत असल्याची पोचपावती लोकांकडून मिळू लागली. त्यामुळे हे लेखन एकाच ठिकाणी असण्याची निकड भासू लागली. हे संकेतस्थळ हे त्याचेच फलित आहे.

येथिल माहिती ही व्यसनमुक्ती आणि निरनिराळे मनोविकार याबद्दल समाजाचे शिक्षण व्हावे यासाठी आहे. यासंदर्भात समस्या असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा असे मी आवर्जून सुचवेन. निव्वळ येथिल माहितीच्या आधारावर कुठलाही निर्णय घेऊ नये. या संकेतस्थळावरील माहिती ही तज्ञांच्या मार्गदर्शनाला पर्याय म्हणून दिलेली नाही. व्यसनमुक्ती काय किंवा कुठलाही मनोविकार काय, त्याबाबत तज्ञांच्या सल्ला घेणे ही पहिली पायरी असते असे माझे ठाम मत आहे. येथिल माहिती वाचून काही निर्णय घेतल्यास अथवा कृती केल्यास लेखक आणि हे संकेतस्थळ कुठल्याही परिणामांना जबाबदार असणार नाही. येथिल माहिती वाचून अनेकजण मला संपर्क साधत असतात. विशेषतः व्यसनमुक्तीसाठी अनेक भगिनींचे फोन येत असतात. त्यांच्यासाठी काही गोष्टी येथे सांगणे मला आवश्यक वाटते.

व्यसन हा एक चिवट आजार आहे. त्यावर उपाय म्हणजे समुपदेशन (काऊंसिलिंग), सायकियाट्रीस्टचा सल्ला, उपचारकेंद्रात दाखल होणे असे असतात. त्यासोबतच AA मिटिंग्ज, इतर संस्थांच्या पाठपुरावा सभांना नियमित हजेरी लावणे या गोष्टी करता येतात. दरवेळी उपचारकेंद्रात दाखल व्हावे लागतेच असे नाही. मात्र त्याबद्दल तज्ञ माणसाचा सल्ला घ्यावा लागतो. ज्यांना व्यसनाचा त्रास आहे त्यांनी उपचारांसाठी मनापासून तयार होणे गरजेचे असते. मी समुपदेशक (काऊंसिलर) आहे. डॉक्टर नाही. माझ्याकडे व्यसन बंद करण्याचे कुठलेही औषध नाही. व्यसन कायमचे बंद होईल अशी कुणीही गॅरेंटी देऊ शकत नाही. कारण ते सर्वस्वी व्यसनी माणसाच्या इच्छेवर अवलंबून असते. याउपर काही विचारायचे असेल तर मला 9987663774 या नंबरवर शनिवार रविवार सोडून ३ ते ४ च्या दरम्यान फोन करु शकता.

हे संकेतस्थळ हे फक्त व्यसनमुक्तीबद्दल नसून येथे सर्वप्रकारच्या मनोविकारांची माहिती प्रकाशित केली जाईल. आनंदघन या सदराखाली निरनिराळ्या मनोविकारांची माहिती येथे मिळेल. मैत्र हे सदर खास स्वमदत गटासाठी आहे. त्यात स्वमदतगटांची माहिती देण्यात येईल. व्यसनमुक्तीबद्दल तर माहिती असेलच. येथिल माहितीमुळे जर कुणाचे मनोविकारासंबंधी गैरसमज दूर झाले, कुणाला व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालण्यास प्रेरणा मिळाली तर हे संकेतस्थळ सुरु करण्याचे सार्थक झाले असे मी समजेन.

डॉ. अतुल ठाकुर
PhD (Sociology), M.A. (Psychology)