नमस्कार,
व्यसनापासून दूर राहिल्यावर काही दिवसांनी एका मुक्तांगण मित्राच्या मनात आले की आपला स्वतःवर किती ताबा आहे हे मित्रांना दाखवायचं. आणि त्यासाठी तो मित्रांबरोबर बारमध्ये जाऊन बसला. मित्र पितील आणि आपण दारुच्या थेंबालाही शिवायचं नाही असा त्याचा निश्चय होता. पण काही वेळातच त्याने घमेलेभर दारु रिचवली होती आणि तो जबरदस्त रिलॅप्सचा बळी झाला होता.
अतिआत्मविश्वास हा व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालणार्यांना अत्यंत धोकादायक असतो हे फक्त व्यसनी व्यक्तींनीच नव्हे तर त्यांच्या घरच्यांनीही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यसनी व्यक्तीला कधीही प्रयोग करु देउ नयेत आणि त्याच्या मनात असे विचार आल्यास तत्काळ समुपदेशकाची मदत घ्यावी. एकदा आपल्याला व्यसन लागले आणि त्यातून आपण बाहेर पडलो की एक खुणगाठ मनाशी बांधून ठेवावी. ती ही कि आता आपण आयुष्यात कधीही व्यसन करु शकणार नाही. थोडेही नाही, मर्यादेतही नाही, कसेही नाही. त्या वाटेला आपल्याला जाताच येणार नाही हे पक्के लक्षात ठेवावे.
व्यसनाचे विचार मनात आले म्हणजे काय काय उपाय करता येतील याची चर्चा आपण पुढे करुच. तोपर्यंत फक्त आजचा दिवस आपल्याला व्यसनमुक्त राहायचं आहे हे लक्षात ठेवा.
अतुल ठाकुर