स्वमदत गट एक कल्पतरु – १

स्वमदत गट अथवा सपोर्ट ग्रूप हा अलिकडे गंभीर आजारांवरील उपचारांचा एक महत्वाचा भाग होऊ लागला आहे. तरीही याबाबत आपल्या समाजात पुरेशी जागरुकता नाही. सपोर्ट ग्रूप म्हटले म्हणजे काहींना फक्त AA म्हणजे व्यसनाधीन लोकांसाठी चालवल्या गेलेल्या अल्कॉहॉलिक ऍनॉनिमस सारख्या संस्थांच्या सभाच आठवतात. खरं सांगायचं तर ज्यांच्या घरात व्यसन असते त्यांनाही या माहित असतील असे सांगता येत नाही. मात्र आता आपल्याकडे अनेक गंभीर आजारांवर स्वमदतगट चालवले जातात. त्यांची माहिती असल्यास आपल्याला आजारांसाठी त्यांची मदत होऊ शकते. या लेखमालेत अशाच गटांची माहिती देण्याचा विचार आहे. त्यासोबत त्यांच्या वेबसाईटचा पत्ताही देण्यात येईल म्हणजे त्या ग्रूपची कुणाला जास्तीची माहिती हवी असल्यास अथवा त्यात सामिल व्हायचे असल्यास थेट संपर्क साधता येईल. सर्वप्रथम स्वमदतगट म्हणजे काय याची माहिती घेऊयात.

एखाद्या गंभीर आजाराचे रुग्ण आणि त्या रुग्णाचे काळजीवाहक एकत्र येऊन आपला गट स्थापन करतात. ज्या आजारासाठी ही मंडळी एकत्र आलेली असते त्याची सर्वांना माहिती व्हावी आणि त्याबाबतीतल्या उपचारांच्या माहितीचीदेखील देवाणघेवाण व्हावी म्हणून हा गट स्थापन झालेला असतो. हे स्वमदत गटाचे स्थूल स्वरुप म्हणता येईल. मात्र स्वमदतगटाचे कार्य याइतकेच मर्यादीत नसते. निरनिराळ्या स्वमदत गटात अनेक कार्यक्रम चाललेले असतात. आजाराप्रमाणे या गटांच्या कार्यपद्धतीचे स्वरुपही बदलले दिसते. उदाहरण द्यायचे झाल्यास पार्किन्सन्सचा आजार हा काही अपवाद वगळता पन्नाशी, साठीनंतर होतो. मुलं मोठी झालेली असतात. माणसाचे निवृत्तीचे वय झालेले असते. जोडीदारही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतो. या आजाराच्या रुग्णाच्या मागण्या वेगळ्या असतात. खासकरुन आजाराची लक्षणे आटोक्यात ठेवणे, आजाराच्या लक्षणांसहीत समाजात मिसळता येणे, आयुष्य उपभोगता येणे हे यांच्यासाठी आता महत्वाचे असते.

या उलट एपिलेप्सीसाठी चालवल्या जाणाऱ्या स्वमदतगटात विवाहमंडळ असण्याची शक्यता असते. कारण हा आजार तारुण्यातही होतो आणि या रुग्णांना विवाहाची समस्या भेडसावत असते. पांढरे डाग अथवा ज्याला विटिलायगो म्हटले जाते त्यासाठी चालवल्या जाणाऱ्या स्वमदत गटाचे स्वरुपही काहीसे भिन्न असू शकते. तेथे काही दुखत खुपत नसते तर असे डाग असलेल्या लोकांकडे जरा वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्यांना मानसिक त्रास असतो. शिवाय तरुण असल्यास विवाहाची समस्यादेखील असू शकते. अनेक स्वमदतगटांमध्ये अनेकदा रुग्ण, त्यांचे काळजीवाहक आणि ज्यांचा या आजाराशी कसलाच संबंध नाही पण ज्यांना हे काम आवडले आहे अशा माणसांचा देखील असे गट चालवण्यात फार मोठा वाटा असू शकतो. वैज्ञानिक माहितीचे निःशूल्क वितरण हा स्वमदत गटांचा पहिला फायदा आहे.

सर्व सदस्यांना त्या आजाराचा अनुभव असल्याने ही माहिती अनुभवातून आलेली असते. शिवाय गंभीर आजार असल्यावर आपल्या समाजातील भोंदू लोक अशांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात. कुठल्याही उपायाने एकदाचा आजार बरा होवो म्हणून माणसे अशा भोंदूंना बळी पडून अमाप पैसाही खर्च करत असतात. त्यामुळे स्वमदत गटातील माहिती मूल्यवान असते. शिवाय गट चालवणारे देखील ही माहिती पारखून घेत असतात. रुग्णांना स्वमदत गटामुळे आपले हक्काचे व्यासपीठ मिळते जेथे ते आपल्या आजाराबद्दल, त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मुक्तपणे बोलू शकतात, आपले मन हलके करु शकतात. सदस्यांना आजार माहित असल्याने हे म्हणणे अतिशय गंभीरपणे ऐकले जाते आणि त्याबद्दल स्वतःचेही अनुभव सांगितले जातात. हा स्वमदतगटाचा दुसरा महत्वाचा फायदा आहे.

बहुतेक स्वमदतगट हे निःशूल्कच चालवले जातात. त्यांचा खर्च हा देगण्यांवर भागत असतो. हे गट आजाराशी संबंधित निरनिराळ्या तज्ञांची व्याख्याने ठेवतात. तेथे प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम असतो. रुग्ण सदस्यांना आजाराबद्दल अद्ययावत ज्ञान मिळतंच शिवाय प्रश्न विचारुन स्वतःच्या शंकांचे निरसनही करून घेता येते. हा या गटांचा तिसरा महत्वाचा फायदा आहे. असे अनेक फायदे आपण स्वमदतगटांची माहिती घेताना जाणून घेणार आहोत. या क्षेत्रामध्ये रुग्णाला शुभार्थी आणि त्याच्या काळजीवाहकाला शुभंकर म्हणतात. पुढील लेखांमध्ये त्यांच्यासाठी आपण हेच शब्द वापरणार आहोत. या लेखमालेतील पहिला स्वमदतगट “पार्किन्सन्स मित्रमंडळ” हा पुणे येथून चालवला जाणार स्वमदत गट आहे. या गटाशी मी संबंधित असल्याने हा मी सुरुवातीला निवडला आहे. त्याबद्दल आपण पुढच्या लेखात चर्चा करुया.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment

You may also like...