चन्दनम् शीतलम् लोके चंदनादपि चंद्रमा: |
चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधुसंगति: ||
चंदन हे जगतात शीतल म्हणून ओळखलं गेलं आहे. त्याहून शीतल असतो तो चंद्राचा प्रकाश. पण सज्जनांची संगती ही या दोन्हीहून शीतल असते असे या सुभाषितकाराला म्हणायचे आहे. अनेकांच्या विद्वत्तेचा लोकांना ताप होत असतो. पण ज्ञानदेवमहाराजांनी अशावेळी “मार्तंड जे तापहीन” अशी सज्जनांसाठी दिलेली उपमा आठवते. सूर्य आहे पण तापहीन आहे. शेवटी छाया आणि शीतलता ही प्रत्येकालाच हवीहवीशी वाटते आणि ती सज्जनांकडेच मिळते. त्यामुळे सत्संगतीचे महत्त्व अपार आहे.
व्यसनाच्या संदर्भात या सुभाषिताकडे पाहायचं झाल्यास आपल्या असं लक्षात येतं की व्यसनाच्या दरम्यान माणूस दुर्जनांच्या म्हणजेच तापदायक लोकांच्या संगतीत असतो. व्यसन सोडायचं झाल्यास त्याला या दुर्जनांचा सहवासही सोडावाच लागतो. अन्यथा ते माणसाला पुन्हा व्यसनाकडे खेचू लागतात. व्यसनमुक्तीसाठीदेखिल सत्संगती ही अत्यावश्यक आहे हेच आपण या सुभाषितातून घेऊयात.
अतुल ठाकुर