अलिकडे व्यसनी व्यक्तींच्या कुटुंबाशी थेट बोलण्याची संधी मिळू लागली आहे. त्यामुळे व्यसन आणि व्यसनमुक्ती या दोन्ही गोष्टी किती गुंतागुंतीच्या आहेत हे नव्याने लक्षात येत आहे. आपल्याकडे काही तथाकथित सुविचार हे इतके कॉमन झालेत की कुणीही, कधीही, कुठल्याही प्रसंगी ते तोंडावर फेकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आयुष्यात तडजोड करावीच लागते, कुणीही परफेक्ट नसतं, आपल्याला पाहिजे ते नेहेमी मिळतंच असं नाही. वगैरे. धीर देण्यासाठी ही वाक्यं ठिकच आहेत. पण तडजोड म्हणून माणसे व्यसनात इतक्या टोकाला जातात की त्यांचं सारं आयुष्यच अपार दुःखाची एक मालिका बनून जातं. तडजोडीला येथे मर्यादाच नसते. आणि हे व्यसन आणि व्यसनमुक्ती दोन्हीला लागू आहे. व्यसनात तर भयंकर त्रास असतोच पण व्यसनमुक्त झाल्यावरदेखील जर माणसाने स्वभावदोषांवर काम केले नाही तर व्यसन फक्त बंद होतं बाकी वादविवाद, भांडणे, शिविगाळ हे सुरुच राहण्याची शक्यता असते. शिवाय मी व्यसन बंद केले हा अहंकार आणखी जोडीला येतो. सर्वप्रथम दारु पिण्याला असलेली समाजमान्यता हा मुद्दा महत्वाचा आहे. व्यसनाची सुरुवात इथून होते.
अनेक भगिनी फोनवर सांगतात की त्यांचे पती अनेक वर्षे दारु पीत आहेत. इतरांप्रमाणेच कधीतरी. अगदी कॉलेजपासून. मग अचानक प्रमाण वाढते. आणि इतके की हाताबाहेर जाते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात सोशल ड्रिंकिंग करणाऱ्यांपैकी व्यसनी कोण होणार याचे उत्तर आजदेखील विज्ञानाला सापडलेले नाही. त्यामुळे पहिला घोट घातक हे तत्व सर्वांसाठीच आहे हे मानणे भाग आहे. आता दुर्दैवाने प्रमाण वाढले की अगदी अनेक सुशिक्षितांमध्येही पहिली पायरी व्यसन लपवण्याची आणि दुसरी पायरी बाहेरची बाधा पाहण्याची असते. त्यात गंडे, दोरे, अंगारे, धुपारे, बुवा, बाबा, ज्योतिष, ग्रहशांती, तंत्र मंत्र, उपवास हे सारे येते. त्या दरम्यान व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याचे थांबत नाही. ती थांबेल या आशेवर घरचे सर्व उपाय करत असतात. त्या दरम्यान अनमोल वेळ वाया जातो आणि व्यसनाचा विळखा आणखी घट्ट बसतो.बरं व्यसन येतं ते सोबत सर्वतऱ्हेचे क्लेश घेऊनच.
त्यात पहिला फटका व्यसनी माणसाच्या तब्येतीला बसतो. उष्णतेचे विकार, पोटाचे, पचनाचे त्रास, यकृताचे विकार, अन्न न जाणं, वजन कमी होणं, इथून सुरुवात होते आणि माणसे अगदी मृत्यूच्या दारातही पोहोचतात. हे सुरु असताना बहुतेकदा व्यसनी माणसे भानावर नसतात. भानावर आल्यास आणाशपथा सुरु होतात. त्यात व्यसन करणारी माणसे सकाळी आपण आता कधीही व्यसनाला हात लावणार नाही अशी आपल्या लहान मुलांच्या नावे शपथ घेतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी झोकांड्या देत घरी परतात. तब्येतीवर उपाय करावेच लागतात. मग हॉस्पिटल, दवाखान्यांचे सत्र आणि त्याचे खर्च सुरु होतात. अनेकदा व्यसनी माणसांच्या व्यसनामुळे कामावर दांड्या सुरु असतात. मेमो मिळालेले असतात. धंदा असेल तर तो मंदावलेला असतो. त्यामुळे दवाखान्यात खर्च करणे कठीण होऊन बसते. यात सर्वात जीव मेटाकुटीला येत असेल तर व्यसन करणाऱ्याच्या पत्नीचा. म्हणजे सहचरीचा.
त्यातच तो प्रेमविवाह असला आणि जर पत्नीच्या घरचा विरोध पत्करुनही तिने या माणसाशी लग्न केलं असलं तर तिला या परिस्थितीत बहुधा माहेरचा दरवाजा बंदच होतो. नवरा व्यसन करुन तमाशा करत असेल तर बाहेर पडताना लाज वाटू लागते. ती नोकरी करत असेल तर कधीतरी कामाच्या जागी पती व्यसन करुन येईल या भीतीने तिचा जीव अर्धा होत असतो. सणासुदीला हृदयात धाकधूक असते की आजचा दिवस नीट पार पडेल की नाही. अनेकदा घरात व्यसन असल्यास नुसत्या वाचिकच नव्हे तर शारिरीक हिंसाचाराला बायकाच बळी पडत असतात. त्यात ती कमवत नसेल तर परिस्थिती आणखीनच अवघड होऊन बसते. व्यसनी नवऱ्याला सांभाळायचं, मुलाबाळांचं पाहायचं आणि घरातील ज्येष्ठांची सेवा करायची आणि त्यात संपूर्ण घर सावरायचं या धावपळीत बऱ्याच सहचरी आजारी पडू लागतात किंवा काहींना नैराश्य, चिंतारोगासारखे आजार जडतात. घरातील व्यसनामुळे घरातल्या ज्येष्ठांचीही प्रचंड कुचंबणा होत असते. त्यांचेही आजार त्या धसक्याने वाढतात. त्यानंतर कुतरओढ होते ती मुलांची.
व्यसन असलेल्या घरातील मुले ही अकाली प्रौढ होतात. त्यांचे लहानपण कोळपून जाते. जे पुन्हा त्यांच्या आयुष्यात कधीही येणार नसते. लहान मुलांच्या ट्रीप्स, गप्पाटप्पा, मित्र मैत्रिणी या गोष्टी या मुलांच्या आयुष्यात फारशा येत नसाव्यात. त्यांच्या आयुष्यात येते ती प्रचंड भीती. आज वडिल दारु पिऊन आले की काय तमाशा करणार ही चिंता. मारझोड करतील का ही भीती. ही मुले व्यसनी व्यक्तीपासून दुरावू लागतात. अनेक व्यसनमुक्त पालकांच्या मुलांचे शेयरींग मी ऐकले आहे. ही लहान मुले अगदी प्रौढांसारखी बोलतात. व्यसनाने त्यांचे बालपण कायमचे नाहीसे केलेले असते. अनेकांच्या कोवळ्या मनावर या व्यसनाचे काय भयानक परिणाम होत असतील याची कल्पनाही करवत नाही. (क्रमशः)
अतुल ठाकुर