नमस्कार,
योगाभ्यासाबाबत समाजाच्या निरनिराळ्या धारणा आहेत. एक वर्ग असा पाहिला आहे की ज्यांना योग ही ज्येष्ठ नागरिकांनी करण्याची गोष्ट आहे असं वाटतं. काहींना योग हा फक्त आध्यात्मिक प्रगतीसाठी करावा अशी इच्छा असते. काहींना शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग करावा असे वाटते. आनंदयात्री ग्रुपवर योगाबाबत बोलताना अशा तर्हेच्या मतमतांतरांवर चर्चा करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कारण आपला ग्रुप हा विशिष्ट उद्देशाने बनलेला आहे. येथे व्यसनमुक्तीच्या मार्गावर चालणारी आणि चालु इच्छिणारी मंडळी प्रामुख्याने आहेत. त्यांच्या सहचरी आणि कुटुंबिय आहेत. शिवाय व्यसन आणि व्यसनमुक्ती याबद्दल प्रामाणिकपणे जाणून घेण्याची इच्छा असणाराही एक वर्ग येथे आहे. त्यामुळे योगाबाबत बोलताना आपल्याला व्यसनमुक्तीचा धागा सोडता येणार नाही. अन्यथा ती एक सर्वसाधारण चर्चा ठरेल.
आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट येथे स्पष्ट कराविशी वाटते. योग हे प्रायोगिक विज्ञान आहे. त्यामुळे शूष्क चर्चा, वादविवाद यांना येथे जराही जागा नाही. योगाभ्यास ही “करण्याची” गोष्ट आहे. बोलण्याची नाही. शंका विचारायला हरकत नाही. पण त्यामागे योगाभ्यास करण्याच्या प्रयत्नांची जोड असावी अशी अपेक्षा आहे. शिवाय योगाभ्यास ही पुस्तके वाचून, टिव्ही पाहून किंवा योगाचे विडियोज पाहून करण्याची गोष्ट नाही अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. ती तशी का झाली आहे याची कारणे पुढील लेखनात येतीलच. त्यामुळे येथिल लेखनाने स्फूर्ती येऊन योगाभ्यास करावासा वाटला तरी तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा ही हात जोडून नम्र विनंती.
व्यसन हा संपूर्ण कुटुंबाचा आजार आहे असे म्हणतात. कारण व्यसन हे व्यसनी व्यक्तीच्या शरीरात असते आणि कुटुंबातील सदस्यांच्या मनात असते. व्यसनी माणसाच्या मनात व्यसन कसे मिळवावे याचा विचार सतत असतो. तर घरच्यांच्या मनात आता आपला माणुस व्यसन तर करत नसेल हे विचार सतत येत असतात. त्यामुळे व्यसनाने व्यसनी माणसाची प्रकृती बिघडते तर व्यसनी माणसाबद्दलच्या चिंतेने घरचे आजारी पडलेले असतात. आपली ही योगाबद्दलची लेखमाला या दोघांसाठी आहे हे कृपया लक्षात घ्यावे. सहचरींची प्रकृती चांगली असेल तरच त्या व्यसनी माणसाला त्यातून बाहेर येण्यासाठी मदत करु शकतील. त्यामुळे घरच्यांचेही आरोग्य चांगले असणे हे व्यसनमुक्तीसाठी आवश्यक आहे असे मला वाटते.
आमचे कुलदैवत देवी वज्रेश्वरी हीचे स्मरण करून, तिच्या पायावर डोके ठेवून या लेखमालेची सुरुवात करतो. ही लेखमाला आपणा सर्वांना उपयुक्त ठरेल अशी आशा वाटते.
अतुल ठाकुर
(येथिल लेखनाने स्फूर्ती येऊन योगाभ्यास करावासा वाटला तरी तो तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावा ही हात जोडून नम्र विनंती.)